Tuesday, 30 May 2023

प्राचीन भारतातील १२ साम्राज्य भाग ७

 


प्राचीन भारतातील १२ साम्राज्य
भाग ७
१२. राजेंद्र चोलाः राजराजाचा हा मुलगा. आपल्या पित्याप्रमाणेच राज्य वाढवणे आणि उत्तमपणे चालवणे हे काम त्याने केले. भारताच्या पूर्वेकडे राज्य वाढवण्याचे तसेच सेन वंशाचे साम्राज्य पूर्वेत स्थापन करण्याचे श्रेय याला जाते. ३४० विद्यार्थी आणि १४ शिक्षक असलेली वेदिक शिक्षण संस्था याने सुरु केली होती. गंगाईकोंडा चोलापूरम ही त्याची राजधानी होती. या ठिकाणी काही देवळे आणि महाल त्याने बांधले. त्याच्या राज्यात शेतीसाठी पाण्याची सिंचनव्यवस्था होती.
अशा तर्‍हेने प्राचीन भारताने जवळपास १५०० वर्ष अनेक जाती आणि वंशाच्या राजवटी बघितल्या. धार्मिक सामंजस्य, उत्तम प्रशासन, कुशल नेतृत्व आणि साहित्य, कला, शास्त्र यांचा विकास या काळात भारताने बघितला. आज भारतातील अनेक धर्म, पंथ, भाषा आणि चालीरीती यांचे मूळ वरील सर्व राज्यकर्त्याच्या काळात रोवले गेले. ती मूळे एवढी खोलवर गेली की पुढील मुगल आणि ब्रिटिश काळातपण आपली संस्कृती पुसली गेली नाही.

प्राचीन भारतातील १२ साम्राज्य भाग ५

 



प्राचीन भारतातील १२ साम्राज्य
भाग ५
८. चंद्रगुप्त दुसरा (३७५ एडी - ४१४ एडी): हा समुद्रगुप्ताचा मुलगा. त्याच्या शौर्य आणि पराक्रमामुळे तो विक्रमादित्य म्हणून ओळखला जाऊ लागला. बंगाल आणि पूर्वेकडील अनेक राज्यांचा त्याने पराभव केला. प्रसिद्ध कवी कालिदास हा त्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. त्याचे राज्य एक समद्ध राज्य मानले जाते. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो.
९. हर्षवर्धन (६०६ एडी - ६४७ एडी): अतिशय बुद्धीमान राजा आणि शूर योद्धा. यानेदेखील आजूबाजुची राज्ये जिंकत आपले साम्राज्य वाढवले. हिंदू आणि बौद्ध असे दोन्ही धर्म तो पाळत असे. नालंदा विद्यापिठाची भरभराट याच्या काळात झाली.

प्राचीन भारतातील १२ साम्राज्य भाग ४

 



प्राचीन भारतातील १२ साम्राज्य
भाग ४
६. रुद्रदमन (१३० एडी- १५० एडी): मौर्य साम्राज्याचा अस्त होत असतांना शकांनी आपले राज्य स्थापित करायला सुरवात केली. यांच्यातील रुद्रदमन याची कारकिर्द लक्षात राहण्यासारखी.पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि सौराष्ट्रापर्यंत याचे राज्य पसरलेहोते. अनेक क्षत्रप राज्ये आणि एक महाक्षत्रप असे त्याच्या राज्याचे स्वरुप होते. उज्जैनीचा महाक्षत्रप म्हणजे रुद्रदमन, याने गौतमीपुत्र सतकरणी याचा दोनदा पराभव केला पण शेवटी त्याच्याच मुलीशी लग्न करुन हे वैर संपवले. त्याने स्वतःच्या खर्चाने सुदर्शन तळ्यावर धरण बांधले. त्याने अशी शपथ घेतली होती की युद्धाशिवाय इतर वेळी तो कोणाला जीवे मारणार नाही, ही शपथ त्याने शेवटपर्यंत पाळली असे म्हणतात.
७. समुद्रगुप्त (३३५ एडी - ३७५ एडी): अनेक लढाया लढून याने भारतातील दक्षिण, उत्तर येथील अनेक राज्ये पराजित केली आणि आपले साम्राज्य उभे केले. समुद्रावर अधिपत्य गाजवून त्या पलिकडे आपले राज्य वाढावे अशी त्याची इच्छा होती. हिमाचलपासून कृष्णा नदीपर्यंत त्याचे राज्य पसरले होते. हिंदू धर्माचा पालनकर्ता असूनपण त्याने इतर धर्मांना संरक्षण दिले.

प्राचीन भारतातील १२ साम्राज्य भाग ३

 



प्राचीन भारतातील १२ साम्राज्य
भाग ३
४. गौतमीपुत्र सतकरणी (७० एडी - ९५ एडी): प्राचीन भारतात एव्हाना बुद्ध आणि जैन धर्म सर्वदूर पसरला असतांना सातवाहनांचे दक्षिणेतील हिंदू राज्य लक्ष वेधून घेते. २०० बीसी ते २५० एडी असा त्यांचा काळ होता. हिंदू धर्माची पुनःस्थापना यांच्याकरवी झाली. यांच्यात गौतमीपुत्र सतकरणी याचा काळ विशेष लक्षात राहतो. याने शक, यवन, पालव राजांचा पराभव करत आपले राज्य कृष्णेच्या खोर्‍यापासून काठियावाडपर्यंत, बेररपासून कोकणपर्यंत वाढवले. बुद्ध आणि जैन धर्मीयांना त्याने संरक्षण दिल्याने अनेक स्तुप, लेणी त्याच्या राज्यात उभी राहिली.
५. कनिष्क (साधारण ७८एडी -१०१ एडी): कुशाण वंशातील प्रसिद्ध राजा. भारताच्या वायव्य भागात याचे राज्य होते, आजचे पेशावर राजधानी. क्षत्रपी राज्याच्या स्थापनेचं श्रेय याला जातं. भारतीय, ग्रीक आणि इराणी धर्मांना तो मानत असे पण पुढे यानेही बौद्ध धर्म स्वीकारला. याने कला, साहित्य यांच्या वाढीला प्रोत्साहन दिले. त्याच्या काळातील अश्वघोष, नागार्जुन आणि वसुमित्र हे कवी आणि तत्वज्ञानी प्रसिद्ध आहेत.

प्राचीन भारतातील १२ साम्राज्य भाग २

 



प्राचीन भारतातील १२ साम्राज्य
भाग २
२. चंद्रगुप्त मौर्य (३२१ बीसी - २९८ बीसी): इतिहासकार असं मानतात की चंद्रगुप्त मौर्य हा खर्‍या अर्थाने भारताचा पहिला सम्राट होता. धनानंदाचा पराभव करत, नंद साम्राज्य संपवत हा राजा झाला. आर्य चाणाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने त्याचे साम्राज्य वाढवले. उत्तरेकडे इराणची सीमा, पूर्वेकडे बंगालपर्यंत आणि दक्षिणेत दख्खनच्या पठारापर्यंत त्याचे राज्य पसरले होते. याचे सैन्यदल प्रचंड मोठे होते. त्याचे गुप्तहेर खातं एकदम प्रभावी होतं. केंद्र आणि राज्य सरकार अशी त्याच्या राज्याची पद्धत होती. ग्रीक साहित्याप्रमाणे अलेक्झांडर आणि चंद्रगुप्त याची भेट झाली होती.
३. सम्राट अशोक (२७३ बीसी - २३९ बीसी): हा चंद्रगुप्ताचा नातू आणि बिंदुसाराचा मुलगा. बुद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी याने अतिशय रक्तरंजित लढाया करत आपले साम्राज्य मजबूत केले.कलिंग देशाबरोबरच्या युद्धात भरपूर जीवितहानी झाली आणि यानंतर त्याने बुद्ध धर्माचा स्वीकार आणि प्रचार केला. अनेक लोकोपयोगी कामे त्याने या काळात केली. बुद्ध धर्म भारताच्या सीमेबाहेर नेण्याचे श्रेय याला जाते.

प्राचीन भारतातील १२ साम्राज्य भाग १

 


प्राचीन भारतातील १२ साम्राज्य
भाग १
भारताचा प्राचीन इतिहास सिंधु संस्कृतीच्याही आधीपासून अस्तितवात आहे. सिंधू संस्कृती साधारण ३००० बीसी एवढी जुनी म्हणजेच साधारण ५,००० वर्ष जूनी आहे. त्या आधीही आपल्याकडे वेगवेगळ्या संस्कृती होत्या यात शंका नाही. त्या काळी भारतीय उपमहाद्वीप आणि आजूबाजूच्या प्रदेशात अनेक राजे, महाराजे, राण्यांचे राज्य होते. ६००बीसी च्या आसपास पहिल्या साम्राज्याच्या खूणा आपण इतिहासात पाहू शकतो. हरांक्य आणि त्यापाठोपाठ आलेले नंद साम्राज्य व नंतरचे मौर्य साम्राज्य. आपापसात लढून, आपल्या राज्याला दुसरी राज्ये जोडत ही बलाढ्य साम्राज्यं उभी राहिली, पण भारतात कधीही कोणाही एका राजाचा एकछत्री अंमल नव्हता. गंगा नदीच्या मैदानी प्रदेशातील जनपदं, महाजनपदं, दक्षिणेतील राज्ये कधीही एकसंध नव्हती.
प्राचीन भारतातील या साम्राज्यांनी भारत घडवला एवढं निश्चित. या प्राचीन भारतातील १२ साम्राज्यांविषयी थोडी माहिती.
१. बिंबिसार आणि अजातशत्रू (५५१बीसी ते ५१९ बीसी): बिंबिसार हा पहिला राजा होता ज्याने आजूबाजूची राज्ये जिंकत मगध साम्राज्याचा पाया रचला. ८०,००० गावे आणि जनपदे त्याच्या राज्यात होती. त्याचा मुलगा अजातशत्रू याने आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत हे काम पुढे सुरु ठेवलं. त्याने वैशाली राज्याच्या लिच्छावी वंशाचा केलेला पराभव सर्वज्ञात आहे.

Wednesday, 25 January 2023

खारबाब कोट ,भिवंडी

 








खारबाब कोट ,भिवंडी 

लेखन ::सुनील आनंदा सणस

प्राचीन काळी कल्याण हे महत्त्वाचे बंदर होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडीमार्गे जहाजांची ये जा चालत असे. ह्या जलमार्गावर घोडबंदर,नागला बंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदराचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी उल्हास खाडीच्या दक्षिणेला घोडबंदर, नागला बंदर गायमुख व ओवळे कोट हे चार किल्ले बांधले गेले तर उल्हास खाडीच्या उत्तरेला नागले, खारबाव, फिरंगाकोट, कांबे कोट हे छोटे छोटे कोट बांधले गेले. वसई खाडी व उल्हास नदी यांच्या बेचक्यात एका छोट्याशा टेकडीवर खारबाव कोट बांधला गेला. वसई खाडी व उल्हास नदीचे रक्षण करण्यासाठी खडीच्या मुखाशी पोर्तुगीजांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. वसई- चिंचोटी- अंजुर फाटा भिवंडी मार्गवरून खारबाव गावात जाता येते. खारबव छोट्याशा टेकडीवर वसलेला असून या कोटा विषयी स्थानिकांना किल्ला म्हणून काहीही माहिती नाही. खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र या किल्ल्यात वसलेलं असून या केंद्राची चौकशी केल्यास सहज किल्ल्यात पोहोचता येते अथवा दूरवरून दिसणारी खारबाव गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी देखील याच किल्ल्याच्या आवारात आहे. ही कोण लक्षात ठेवल्यास सहजपणे किल्ल्यात जाता येते. खरबव किल्ल्याचा आकार साधारणपणे चौकोनी असून आज याचा केवळ एक बुरुज आणि तटबंदीची भिंत काही प्रमाणात शिल्लक आहे.येथील स्थानिकांशी बोलताना कळते की आरोग्य केंद्राची पुनर्बांधणी करेपर्यंत काही वर्षांपूर्वी या किल्ल्याचा अजून एक बुरुज व बरीशी पडिक तटबंदी शाबूत होती पण आरोग्य केंद्राचे नवीन काम करताना पाडण्यात आली. कोटाचा आजही शिल्लक असलेला बुरुज दुमजली असून त्यात आत शिरण्यासाठी एक छोटासा दरवाजा आहे. बुरुजावर तोफा बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. खारबाव कोटाचा केवळ इतकाच अवशेष शिल्लक असल्याने त्याची निगा राखली आहे पण बुरुजाच्या भिंतीवर ती झाडे वाढीस लागली आहेत ज्यांची मुळे बुरुजाच्या भिंतीमध्ये खोलवर रुजत चाललेली आहेत. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड, चिकट माती, चुना यांचा वापर केलेला दिसतो. या कोटाच्या आकारमानावरून येथे जकातीचे व टेहळणीचे ठण्या प्रशासकीय चौकी व सैन्य व रसद यांची देखील व्यवस्था असावी. सदर कोट छोटे खाणी असून पंधरा मिनिटात पाहता येतो. पोटाच्या तटबंदी बाहेर जरी मरीचे मंदिर आहे. आज जरी किल्ला पूर्णपणे अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान आणि वसई खाडी व उल्हास नदीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहता येते. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरुज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसविले. साधारणत सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या या तेहळणी वजा कोटाचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठ्या कोटांना रसद पुरवणे हा होता. इसवी सन 1739 मध्ये मराठ्यांच्या वसई मोहिमे त खारबाव, काबे,फिरंगी पाडा हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजांचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. किल्ला पाहण्याच्या हेतूने येथे येणाऱ्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्त्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी...
माहिती साभार - सुरेश निंबाळकर

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...