Monday, 22 August 2022

शीख योद्धा सरदार 'हरिसिंह नलवा'

 

बलदंड शरीर यष्टी, करडी नजर, भारदस्त आवाज, शरीरातली चपळता, प्रचंड साहसी वृत्ती, जबरदस्त आत्मविश्वास, सळसळते रक्त, ही सगळी योद्धयाची लक्षणे……असे एक नाव म्हणजे "सरदार हरिसिंग नलवा"….!

योद्धा म्हटले की तो असाच असला पाहिजे, जो कोणत्याही शत्रूशी सहजपणे दोन हात करू शकतो ! ! !

युद्ध करण्यात पारंगत. कशाचीही तमा न बाळगता, समोर आलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असलेलाच उत्तम योद्धा म्हणून ओळखला जातो.

असे अनेक योद्धे या भारतमातेच्या उदरात जन्माला आले. लढाईत हार कधी त्यांना माहीतच नव्हती. युद्ध म्हटलं की त्यांना “चेव” चढतो आणि मग समोर कितीही बलाढ्य शत्रू असला तरी आगेकूच करून त्याला धूळ चारायची हेच त्यांचे ध्येय असतं.

भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली, काही राजे योद्धयांच्या कमतरतेमुळे कमजोर पडले. पण काही राजे ह्या महापराक्रमी योद्धयांमुळे सतत लढाया जिंकत राहिले.

बाजीराव पेशवा स्वतः लढाईत पुढे राहून सगळ्याच्या सगळ्या लढाया जिंकत गेले. हे आपल्याला माहितीच आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांकडे तर अशा महापराक्रमी योद्धयांची फौज होती. म्हणून तर अतिशय कमी सैन्य असतानाही महाराज बलाढ्य फौजांना सळो की पळो करु शकले. बाजी प्रभू पावनखिंडीत हजारोंच्या सैन्यासमोर भिंती सारखे आडवे आले.

चित्रस्त्रो

त : India. facts

प्रत्त्येक राज्यात वेगवेगळ्या राजांच्या सत्ता होत्या आणि असे अनेक योद्धे ह्या भारतभूमीच्या रक्षणासाठी लढले. काहींना नावलौकिक मिळाला पण काही आपल्याला आजही ज्ञात नाहीत. कारण लांब कुठेतरी लढत होते; पण लढत होते भारत भूमीच्याच रक्षणासाठी.

त्यातलाच एक महान योद्धा, ज्याचं नाव फार प्रसिद्ध झालं नाही. पण अफाट ताकदीच्या जोरावर त्याने शत्रूची अनेकवेळा पळता भुई थोडी करून टाकली.

नावाचा दराराच एवढा की शत्रूला घाम फुटायचा. शत्रू महा बलाढ्य, पण ह्या योध्याशी लढायला त्यांच्या अंगातली ताकदच निघून जायची. कोण होता हा भारत मातेचा जिगरबाज सुपुत्र….!

“हरिसिंह नलवा” त्याचं नाव…… जे नाव ऐकताच हजारोंच्या संखेने चालून येणाऱ्या शत्रूला ‘धडकीच’ भरायची.

“हरीसिंह नलवा” ह्याचा जन्म पंजाब मधल्या गुजरावाला ह्या गावात झाला. १७९१ साली वडील सरदार गुरदियालसिंह उप्पल आणि माता धरम कौर ह्यांच्यापोटी हा वीर जन्माला आला.

एकुलता एक सुपुत्र, म्हणून सगळ्यांचेच प्रेम ह्या पुत्राला लाभले. सगळ्यांचेच भरभरून प्रेम लाभलेला हा सुपुत्र आपल्या जन्मानंतर सातच वर्षात वडिलांच्या प्रेमाला पारखा झाला. १७९८ मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.

माता धरम कौर हिने ह्या तेजस्वी पुत्राचा पुढे अतिशय उत्तम रीतीने सांभाळ केला. वयाच्या दहाव्या वर्षी त्याला अमृतपान करून सच्चा शीख बनवला.

ह्या तरुणाला अस्त्र-शस्त्र, घोडेस्वारीचे शिक्षण मातेने देऊ केले आणि त्यात पारंगत केले. त्यासाठी लागणारी शारीरिक क्षमताही हरी सिंगने स्वतः मिळवली.

१८०५ मध्ये वसंतोत्सव समारोहात महाराजा रणजितसिंह यांनी “प्रतिभा की खोज” ह्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या समारोहात योगायोगाने हरीसिंह आपल्या जमिनीच्या वादातल्या न्यायासाठी महाराजा रणजीत सिंह यांच्या दरबारात पोहोचला.

चित्रस्रोत : पंजाब न्यूज़ ( समाचार )

ही बोलणी चालू असतांना हरी सिंहाने आपले वडील आणि आपले आजोबा हे महाराजा रंणजितसिंहांच्या पूर्वजांच्या म्हणजेच महासिंह आणि चेतरसिंह यांच्याकडे चाकरी करत होते अशी माहिती समोर बसलेल्या दरबारातल्या प्रमुखाला दिली.

त्यामुळे हरिसिंहाला त्या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळाली.

हरीसिंहाने त्या स्पर्धेत भालाफेक, तिरंदाजी, घोडेस्वारी,ह्यात आपल्या प्रतिभेचे सर्वोच्च प्रदर्शन केले, त्या स्पर्धेमुळे हरिसिंहाच्या प्रतिभेची सगळीकडून वाहवा झाली. इतक्या छोट्या वयात अशा सर्वोच्च प्रतिभेच्या प्रदर्शनामुळे महाराजा रणजितसिंह ही प्रभावित झाले.

त्यांनी हरिसिंहाला आपल्या पदरी खास सहाय्यक म्हणून नोकरी दिली.

महाराजा रणजितसिंहाना शिकार करण्याचा शौक होता. कधी कधी हरीसिंह सुद्धा महाराजांबरोबर जायचा. इतर अनेक सरदार सुद्धा बरोबर असायचे. एकदा असेच महाराज शिकारीला गेले होते. सगळा लवाजमाही सोबत होता. हरिसिंह सुद्धा बरोबर होताच.

जंगलामध्ये शिकार शोध चालू होती, आणि अचानक समोर एक मोठा वाघ सगळ्या लोकांवर चालून आला. तो अचानक उडी मारून समोर आला म्हणून सगळे घाबरून गेले.

काय करावे हे सुचण्याच्या आत वाघ अंगावर चालून आला. सगळ्यांचा थरकाप उडाला. आता वाघ आss वासून कोणाला तरी पंजात पकडणार एवढ्यात मोठ्या चपळाईने हरीसिंह पुढे झाला; आणि त्याने वाघाचा आsss वासलेला जबडा पकडूनच ठेवला.

चित्रस्त्रोत : scoop whoop

वाघावर स्वार होऊन त्याचा जबडा प्रचंड ताकद लावून फाडून टाकला……

ह्या प्रसंगाचे वर्णन करताना महाराजांनी नल राजाच्या शिकारीची हरिसिंहाच्या त्या प्रसंगाशी तुलना केली.

‘नल राजासारखाच तू सुद्धा पराक्रमी आहेस’ असं म्हणून पाठ थोपटली. त्या प्रसंगापासून लोक हरिसिंहाला “बाघमार नलवा” असे संबोधू लागले. म्हणून तो हरीसिंह नलवा म्हणून ओळखला जाऊ लागला.

हरीसिंग दोन तलवारी हातात घेऊन लढायचा. बेभान झालेल्या हरीसिंहच्या तलवारीच्या एक फटकाऱ्यात अनेक शत्रू सैनिक गारद व्हायचे. पुढे यायच्या ऐवजी शत्रुसैन्य मागे जायचे. हरीसिंह सहज विजयी व्हायचा.

१८३७ मध्ये महाराजा रणजितसिंहांच्या मुलाचा विवाह होणार होता. सगळ्या सरदारांना हजार राहायचे होते .पण जमरोद आणि पेशावर हे जास्त संवेदनशील होते. त्यामुळे हरीसिंहाचे विवाह समारंभाला हजर राहणे अफगाण शत्रूला फायद्याचे होते.

म्हणून हरीसिंहाने त्या समारंभाला जाण्याचे रहित केले पण तो पेशवरला थांबला.

शत्रू सैन्याला वाटले हरीसिंह तिकडे गेला. ते जमरोदवर चालून आले. त्यांच्याकडे अफाट सैन्य होते ह्याची कल्पना हरिसिंहाला होती. म्हणून त्याने आणखी कुमक मागवली होती. पण ती यायला उशीर होणार होता. जमरोदच्या युद्धाला सुरुवात झाली.

हरिसिंहाच्या प्रकृतीत थोडा बिघाड झाला होता पण त्याची पर्वा न करता तो तातडीने जमरोदला पोचला.

हरीसिंह आल्याची वार्ता कळताच शत्रू धास्तावला. पण दबावाखाली शत्रू सैन्य पुढे सरकायला लागले. हरीसिंह ८००च्या तुकडीने शत्रूवर चालून आला.

घनघोर युद्धाला सुरुवात झाली हरिसिंहांच्या सैन्याने मुसंडी मारली आणि कापाकापिला सुरवात झाली. ह्या कापाकापित एका शत्रू सैन्यातल्या शिपायाच्या तलवारीचा फटका पाठीमागून हरिसिंहाच्या मानेवर बसला.

हरीसिंहाला जबर मार लागला पण ज्याने फटका मारला त्याला हरिसिंहाच्या सरदाराने ताबडतोब कापून काढला.

चित्रस्रोत : Jagran Josh:

ह्या गर्दीत हरिसिंहाला बाजूला नेण्यात आले.

“पण मी घायाळ झालो आहे हे कोणालाही कळू देऊ नका.”

हरीसिंहाने साथीदारांना बजावून सांगितले. हरीसिंह जबर जखमी झाला होता. तेवढ्यात हरिसिंहाने मागावलेली सैनिकांची कुमक येऊन धडकली आणि हरिसिंहाने प्राण सोडले.

अफगाण सैन्य नेस्तनाबूत झाले. वाट फुटेल तिकडे पळून गेले. आणि हरीसिंहाच्या सैन्याचा विजय झाला.

अशा ह्या भारत भूमीच्या महान योध्याला शतश: प्रणाम…!!

स्त्रोत :

सिख योद्धा हरि सिंह नलवा के नाम का मतलब बाघ की हत्या करने वाला नहीं

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...