Thursday, 1 February 2024

हम्पी! विजयनगर साम्राज्याची राजधानी!!

 











हम्पी!
विजयनगर साम्राज्याची राजधानी!!
या प्रदेशाचा इतिहासाशी असलेला संबंध हा पार रामायणापर्यंत जाऊन पोहोचतो. सुग्रीवाची किष्किंधानगरी ती हीच असं मानलं जातं. अजूनही हनुमंताचं जन्मस्थान म्हणून इथला अंजनाद्री पर्वत दाखवला जातो.
पुढे, पुराणांव्यतिरिक्त प्रत्यक्ष लिखित इतिहासाची पानं आपण चाळून पाहतो तेव्हा सुरुवातीचे त्रोटक उल्लेख मिळतात ते मगधसम्राट अशोकाचे, इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातले. पुढे, बदामीच्या चालुक्य राजवंशात या प्रांताला वैभव प्राप्त होऊ लागलं. या वेळेस या भागाचा उल्लेख 'पंपापुरा' असा आढळतो. पंपा हे शिवपत्नी पार्वतीचं नाव. या शब्दाचं कन्नड रूप अथवा अपभ्रंश झाला हम्पा, अन त्याचंच पुढे आजचं रूप म्हणजे हम्पी!
दहाव्या शतकात हम्पीतलं प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिर कल्याणीच्या चालुक्यांनी बांधलं. अत्यंत विशाल, महाप्रचंड गोपुर असलेलं हे मंदिर, त्यासमोरचा बाजार अन जवळपास एक दीड किलोमीटरवर असलेला अवाढव्य नंदी हे त्याचं वैशिष्ट्य!
चालुक्यांच्या नंतर तेराव्या-चौदाव्या शतकात आलेले होयसळ राजे हे प्रामुख्याने शैव असल्याने त्यांनी इथे मोठ्या प्रमाणावर शिव-पार्वती-दुर्गा इत्यादी देवीदेवतांची मंदिरं बांधली. दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेत होयसळांवर आक्रमण केलं, अन पाठोपाठ आलेल्या महम्मद बिन तुघलकाने त्यांची राजधानी द्वारसमुद्र तथा हळेबिडू जिंकून घेतली. या साऱ्या धकाधकीत, काम्पिली नावाच्या लहानशा राज्यात असलेली ही हम्पी देखील आक्रमणाला बळी पडली.
पुढे, काही काळातच हक्क उर्फ हरिहर आणि बुक्क या दोघा भावांनी शृंगेरी-शारदा पिठाच्या शंकराचार्य असलेल्या विद्यारण्यस्वामींकडून आशीर्वाद घेऊन नव्या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली. असं म्हटलं जातं की हे दोघेही होयसळ साम्राज्याच्या सैन्यात होते. काही ठिकाणी हे काकतीय राजांकडे असल्याचंही म्हटलं आहे. असो, इ.स. १३३६ मध्ये या नव्या हिंदू साम्राज्याचा शुभारंभ झाला. देवराया, अच्युतराया वगैरे एकाहून एक प्रतापी राजांनी या विजयनगर साम्राज्याचा डंका उत्तरोत्तर निनादलाच, पण या साऱ्याचा कळस ठरला तो प्रसिद्ध सम्राट कृष्णदेवराया! आजही, हम्पीच्या हजारराम मंदिराला लागून असलेल्या खास महालांमध्ये असलेली जागा, कृष्णदेवरायाचा महाल, राजसभा वगैरे पाहता हे किती प्रचंड असेल याची कल्पना येते.
प्रत्येक मंदिर भव्य, त्याचे खांब निरनिराळ्या मूर्ती आणि कलाकुसरींनी नटलेले. बोट ठेवायला कुठेही जागा नाही. मूर्तींचे हावभाव असे, की जणू काही दगड जिवंत होऊन त्या सुरसुंदरी नाजूक पदन्यास करत नाचू लागतील, ते द्वारपाल आत जाण्यास अनुमती देतील, ते निरनिराळे वादक-नर्तक आपली कला सादर करू लागतील. बाबासाहेबांनी म्हटलंय तसं खरंच, या कलाकारांच्या हातात जादू होती. इथे कलाकारांनी दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, लाजयला लावलं!
दुर्दैवाने, १५६५ साली, तालिकोटा तथा राक्षसतागडी इथं विजयनगरचा अखेरचा सम्राट आलिया-रामरायाच्या विरोधात साऱ्या बहमनी सुलतानी सत्ता एकत्र आल्या आणि विजयनगरचा पराभव झाला. पुढचे जवळपास सहा महिने विजयनगरची ही वैभवशाली राजधानी जळत होती, लुटली जात होती! मुर्त्या फुटत होत्या, कला नष्ट होत होती.
पण किती नष्ट करतील? जवळपास सोळा चौरस मैल परिसरात पसरलेली ही वैभवशाली नगरी! जिथे जाऊ तिथे मंदिरं आणि कला. सुलतान कंटाळले, पण कला-मंदिरं संपली नाहीत. ती अजूनही आहेत. कितीही बघा, कितीही वेळ थांबा, मन भरत नाही. आत्ताच हे असं आहे, तेव्हा काय असेल हा विचार मनात येतो अन् मती गुंग होते.. शब्दच संपतात! खरच, शब्द अपुरे पडतात..
खाली काही मोजके फोटो देतो आहे, बाकी याहून कित्येक अजूनही कॅमेरात तसेच आहेत, सगळे देणं अशक्य आहे! हे स्क्रीनवर नाही, जाऊन अनुभवणं गरजेचं आहे. काय लिहू अजून?
- कौस्तुभ कस्तुरे

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...