Showing posts with label सिंधू संस्कृती. Show all posts
Showing posts with label सिंधू संस्कृती. Show all posts

Monday, 18 April 2022

सिंधू संस्कृती- भाग 4

 


सिंधू संस्कृती- भाग 4

पोस्तसांभार ::Dr Sitaram Ingole 

सांस्कृतिक जीवन 

विद्या व वांड्मय

सिंधू संस्कृतीतील लोकांना लेखन कला अवगत होती .हे येथील मुद्रांवर सापडलेल्या 250 पेक्षा अधिक वर्णा वरून स्पष्ट होते. तरीपण या संस्कृतीतील लिपी ओळखणे अजून शक्य झाले नाही . संस्कृती विषयी वैदिक संस्कृती सारखे वेदवांड्मय वगैरे काहीच उपलब्ध नसल्यामुळे वांड्मयीन प्रगतीबद्दल माहिती मिळणे शक्य नाही.

कला

अनेक प्रकारच्या कलात्मक वस्तू येथील कलेची प्रगती दर्शवतात .विविध प्रकारच्या कोरीव मुद्रा कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल .मुद्रांवर मानव व प्राणी यांचे चित्रे कोरीत असत उदा. प्राण्यांमध्ये लांब पोळे असलेला बैल ,गेंडा ,वाघ, हत्ती, हरीण व मैस हे प्राणी असत. नर्तिकेची प्रतिमा आणि मानवाचा पुतळा शिल्पकलेची प्रगती दर्शवतात. या कलाकृती मध्ये जिवंतपणा, कृत्रिमता आणि कल्पकता पाहायला मिळते. कुभारांच्या, सुतारांच्या व सोनारांच्या कला या प्रगतीची साक्ष देतात.

स्थापत्य

एकाच प्रकारच्या साध्या इमारती बांधकामावरून स्थापत्य कलेत मात्र विशेष प्रगती झालेली दिसत नाही. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली एकही इमारत सापडली नाही. बांधकाम करताना कला सौंदर्य व श्रंगार यापेक्षा उपयोगिता व भव्यता ही गोष्ट केंद्रित केली गेली असावी. मोहेंजोदारो हरप्पा वगैरे घरांची योजना नगररचना, गृहरचना यावरून कारागीरात उत्कृष्ट स्थापत्य कला, बुद्धी होती. पण एकसारखेपणा प्रमाणबद्धता व उपयोगिता यांना बांधकामात महत्त्व असल्यामुळे त्यांच्या त्या प्रतिभेला वाव मिळाला नसावा असे संशोधकांना वाटते.

राजकीय जीवन

सिंधू संस्कृती मध्ये राजकीय जीवनाची निश्चित माहिती मिळत नाही. तरी पण एवढ्या सुव्यवस्थित वैभवशाली संस्कृतीत समाजाचे नियंत्रण ,नियमन व रक्षण करणारी उत्तम प्रशासन व्यवस्था असावी. याबद्दल कुठलाही शोध झालेला नाही. या प्रदेशात एक मोठे साम्राज्य असून हडप्पा व मोहेजोदारो ही नगरे त्यांच्या दोन राजधान्या असाव्यात असा तर्क संशोधकांनी बांधला. कारण प्राचीन काळात प्रत्येक संस्थांची साम्राज्याची दोन राजधान्या असत.सिंधू संस्कृतीत लहान-लहान नगर राज्यांचे अस्तित्व असावे असे संभवते . तसेच उत्खननात नगरात सापडलेल्या विशाल इमारतीवरून नगरांचा कारभार पाहण्यासाठी नगराधीपती असावा व त्या इमारतीत त्यांचे निवासस्थान व कार्यालय असावे . हे सर्व नगरे स्थानिक स्वायतत्ता असून नगरांचे संरक्षण करण्याचे कार्य नगराधीपतीकडे असावे व त्यासाठी त्याला मदतीसाठी अधिकारी वर्ग असावा. पण याठिकाणी नगरराज्य होती. साम्राज्य होते, लोकसत्ता होती हे सांगणे संशोधकांच्या मते कठीण आहे.

कालनिर्णय ( कालखंड )

सिंधू संस्कृतीचा निश्चित काळ सांगणे कठीण आहे. याबद्दल विविध संशोधकांची वेगवेगळी मते आहेत. त्यात डॉ. सर जॉन मार्शल यांच्या मते सिंधू संस्कृतीचा आरंभ इ.स. पूर्व 3250 नंतर झाला असावा.

मेसोपोटेमिया सापडलेल्या सिंधू संस्कृतीच्या मुद्रा वरून हाच काळ निश्चित होतो.  सिंधू संस्कृती सारख्या तीस मुद्रा ऊर, किश, उम्मा, लागाश, सुसा या ठिकाणी सापडल्या आहेत. या मुद्द्यांच्या आधारावर इतिहासकार "व्हिलर" सिंधू संस्कृतीचा काळ इ. स. पूर्व 2500 ते 1500 असा अंदाज दर्शवतात.

सिंधू संस्कृतीचा अंत आर्यांनी घडवून आणला असेल आणि ती आर्यापूर्वीची संस्कृती आहे हे निश्चित झाले तर सिंधू संस्कृतीचा काळ ऋग्वेदाच्या मदतीने ठरविता येईल. ऋग्वेदात आर्यांनी उंच भिंतीच्या नगरातील नगरवासी यांना पराभूत केले असे वर्णन आहे.हरप्पा मोहेंजोदारो येथील उत्खननात रस्त्यावर व घरात मानवांची हाडे भरपूर प्रमाणात आढळली. यावरून या रहिवाशांची ते पळत असताना रस्त्यावर व घरात कत्तल केली असावी .असे ऋग्वेदाच्या आधारे सिंधू संस्कृतीचा काळ इ. स.पूर्व 3000 ते 2000 हा निश्चित होतो. असे काही संशोधकांचे मत आहे

पण अलीकडे इ. स. पूर्व 2250 ते 1750(500 वर्षे ) हा काळ सर्वमान्य संशोधकांनी मान्य केलेला आहे.

सिंधू संस्कृतीचे निर्माते  (द्रविड, अनार्य)

या संस्कृतीत निवाशाची व निर्मात्यांची निश्चित माहिती मिळाली नाही, पण हरप्पा येथील उत्खननात चार प्रकारच्या मानववंशाची सांगाडे सापडलेले आहेत. त्यावरून येथे भूमध्यसागरी, प्रोटोऑस्ट्रेलाईड ,मंगोलियन व अल्पाईन अशा भिन्न वंशाचे लोक राहत होते. असे दिसते पण हराप्पा किंवा मोहेंजोदारो ही व्यापारी नगरी असल्यामुळे येथे देशी-विदेशी व्यापारी राहत असत यावरून या संस्कृतीच्या निर्मात्याची कल्पना करणे योग्य होईल असे काही संशोधकांना वाटते. पण या संस्कृतीचे द्रविड संस्कृतीशी बरेच साम्य आढळून येते. एके काळी सिंधू संस्कृती चा विस्तार सिंधू ,पंजाब व बलुचिस्तान पर्यंत झाला होता. त्या ठिकाणी लोक द्रविड भाषा आजही बोलतात. यावरून या संस्कृतीचे निर्माते द्रविड, अनार्य असावेत असे काहींना वाटते.

विनाशाची कारणे

आर्यांच्या आक्रमणामुळे ही संस्कृती नष्ट झाली असावी किंवा नद्यांनी वारंवार त्यांची पात्र बदलणे ,महापूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्ध या संस्कृतीचा विनाश झाला असे काही संशोधकांना वाटते. कारण अपुऱ्या पुराव्यामुळे याबाबतीत कोणालाही निश्चित मत व्यक्त करता येत नाही.

सिंधू संस्कृती -भाग 3

 सिंधू संस्कृती -भाग 3

पोस्तसांभार :Dr Sitaram Ingole 




धार्मिक जीवन

सिंधू संस्कृतीतील धार्मिक जीवनाबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही किंवा एकही मंदिर उत्खननात मिळालेले नाही .शिक्के मुद्रा मूर्ती या अवशेषांच्या द्वारे संशोधकांना धार्मिक जीवन सिंधू संस्कृती मध्ये मानव हा धार्मिक असावा व तो खालील देवतांच्या पूजा करत असावा.

सिंधू संस्कृतीतील देवता

मातृदेवता शक्ती

तेथे उत्खननात विपुल स्त्रीमूर्ती व मुद्रा मिळाल्या आहेत .बहुतेक त्या अर्धनग्न अवस्थेत असून त्यांच्या अंगावर दागिने आहेत. काहींच्या हातात दीपक आहेत .यावरून एखादी देवी या संस्कृतीतील आराध्य दैवत असावे असे संशोधकांना वाटते .देवीला नरबळी सुद्धा देण्यात येत असावा. त्यामुळे तेथे देवीची उपासना करीत असावेत.

पशुपती शिव

अनेक पुरुषआकृती उत्खननात सापडले आहेत. त्यापैकी एका मुद्रेवरील पुरुषआकृतीला एक डोके, दोन शिंगे व तीन तोंडे आहेत ,तो मांडी घालून ध्यानस्थ बसलेला आहे व त्याच्या सभोवती हत्ती ,वाघ , मैस ,गेंडा ,हरिण पाच प्राणी आहेत. योग मुद्रा वरून आणि सभोवतालच्या पशु वरून ही देवता योगिराज पशुपती असावी .असे मत डॉ. मार्शल यांनी मांडले आहे .तसेच प्रतिमेच्या डोक्यावर तीन तोंडाची, तीन नेत्र आणि डोके व त्याच्या बाजूला दोन शिंगे, यांचा त्रिशूळ करून ही देवता शंकर महादेव अथवा शिव असावी असेही प्रतिपादन करण्यात आले. पण शंकराजवळ पार्वती मात्र कुठेही आढळलेली नाही.

पशु पूजा

वृषभ (बैल ) नाग इत्यादी प्राण्यांची सुद्धा पूजा करण्यात येत असे.

वृक्ष पूजा

वड, पिंपळ इत्यादी वृक्षांची पूजा करीत असत.

लिंग पूजा

लिंग व योनी यांच्या आकाराच्या मिळालेल्या अनेक वस्तू वरून लिंग पूजेला धर्मात प्राधान्य होते असा निष्कर्ष संशोधकांनी काढला.

निसर्ग पूजा

सूर्य ,जल इत्यादी निसर्ग शक्तींची ही आराधना त्यावेळी करण्यात येत असावे.

मृतदेहांची व्यवस्था

मृत शरीराची व्यवस्था तीन प्रकारे लावण्यात आलेली होती.

 1.पूर्ण दफन यात मृताच्या नेहमीच्या उपयोगाच्या वस्तू सह प्रेत जमिनीत पुरले जात असावे.

2.अस्थी दफन यात अपघात पशु व युद्ध यामुळे ठार झालेल्या व्यक्तींची प्रेते पशु पक्षांनी खाल्ल्यावर त्यांची हाडे जमिनीत पुरत असावेत.

3.दहनानंतर असती व रक्षा दफन या पद्धतीत प्रेताचे दहन केल्यावर त्याची रक्षा वस्ती मृत्तिका कलशात भरून ती जमिनीत पुरत असत.

सिंधू धर्माचा हिंदू धर्मावर प्रभाव

सिंधू धर्मातील शक्ती ,शिव ,पशु ,लिंग ,वृक्ष ,सूर्य, इत्यादी देवता हिंदू धर्मातही आढळतात .तसेच सिंधू धर्मातील स्नानाचे महत्त्व बळी प्रथा प्रार्थना इत्यादी हिंदू धर्मातही आहेत. ग्रामीण भागातील लोकांच्या देवदेवता धार्मिक चालीरीती या सिंधू धर्मा सारख्याच आढळतात .यावरून सिंधू संस्कृतीतील धर्मीक जीवनाचा हिंदू धर्मावर महत्त्वाचा प्रभाव हा पडलेला दिसून येतो.

आर्थिक जीवन

सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती नगरे समृद्ध होती व नगरांना आर्थिक जीवनात प्राधान्य होते.

कृषी व पशुपालन

सिंधू व तिच्या उपनद्यांच्या परिसरातील गाळाची सुपीक जमीन ,विपुल जलपुरवठा आणि अनुकूल हवामान यामुळे शेती हा येथील निवास यांचा प्रमुख व्यवसाय बनला. गहू, तांदूळ, वाटाणा ,कापूस इत्यादी पिके काढीत व शेतीच्या कामासाठी पशूंचा उपयोग करण्यात येत होता. ्यासाठी गाई ,बैल, म्हैस ,हत्ती, उंट, मेंढ्या, बकर्‍या,  कुत्रे इत्यादी प्राणी पाळत होते व त्या प्राण्यांचा उपयोग शेतीसाठी, शिकारीसाठी व वाहतुकीसाठी करत होते व त्यांच्यापासून खत, दूध, मास ,कातडी, लोकर इत्यादी मिळवत असत. त्यावेळेस घोडा हा परिचित प्राणी होता पण त्याचा उपयोग कुठेही आढळला नाही.

उद्योग

उत्खननात सापडलेल्या विविध वस्तू वरून अनेक हस्तोद्योग चालत असत असे सिद्ध होते.

विणकाम

सिंधू संस्कृती कापूस व लोकर यांचे सूत व कापड तयार करणारा विणकाम वर्ग होता. तो रंगीबेरंगी कापड तयार करून इराण ग्रीस इत्यादी देशात सुद्धा निर्यात करत होता.

कुंभार काम

चक्रा च्या साह्याने विविध प्रकारचे मृत्तिका कुंभ व इतर मृत्तिका कृती तयार करण्याचे काम कुंभार करीत असे . मातीची भांडी चकचकीत बनवीत होते ,रंगवीत होते ,नक्षीदार करत होते. तसेच मातीची खेळणी इतर कला वस्तू सुद्धा त्या काळात कुंभारी कला म्हणून प्रगत होती.

सुतार काम

शेतीची उपकरणे, लाकडी खेळणी ,बैलगाडी, नौका इत्यादी बनवणारा सुतार वर्ग होता.

धातुकाम

सोने-चांदी इत्यादी धातूंचे अलंकार, शिक्के आणि इतर कलाकृती तयार करणारे सुवर्णकार त्या काळात होते याशिवाय पाथरवट, गवंडी हे सुद्धा व्यवसाय करणारे लोक होते.

व्यापार

सिंधू संस्कृती मध्ये भूमार्ग व समुद्रमार्ग यांनी वास्तूंचा व्यापार करण्यासाठी देश-विदेशात व्यापार करणारा व्यापारी वर्ग होता. त्याठिकाणी व्यापारी पेठा होत्या कश्मीर ,काठेवाड, राजपुताना ,दक्षिण भारत असा देशी व्यापार व अफगाणिस्तान ,इराण ,सुमेरिया, मेसोपोटेमिया, असा विदेशी व्यापार चालत असे. त्यासाठी बैल गाढव इत्यादी प्राण्यांचा वापर करत होते.

वजने व मापे समान

वस्तूंच्या देव देवी साठी उपयोगात आणलेली लहान-मोठी वजने व मापे सर्वत्र सारखी होती. यावरून व्यापारातील व्यापार्‍यांचा प्रामाणिकपणा व सचोटी यातून दिसून येते.

विनिमयसाधन

व्यापारी देश विदेशी व्यापार वस्तुविनिमय याच्या स्वरूपाचा करत होते. मौल्यवान धातूंच्या देशी विदेशी मुद्रा सुद्धा विनिमय साधन म्हणून वापर करण्यात येत होत्या .ह्या विदेशी मुद्रा  उत्खननामध्ये सापडल्या आहेत.



क्रमश,......

सिंधू संस्कृती -भाग 2

 सिंधू संस्कृती -भाग 2

पोस्तसांभार ::DR Sitaram Ingole




महास्नानगृह (The great bath)

मोहेंजोदारो तेथे एक विशाल जलाशय आहे. त्याची लांबी 40 फूट रुंदी 24 फूट खोली 8 फूट असून पक्या विटा व चुन्यात बांधलेले आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या असून पाणी बाहेर काढण्यासाठी तळमार्ग आहे. हे जलाशय सरकारी कर्मचाऱ्यांचे स्नानगृह असावे किंवा नगरातील श्रीमंत नरनारी यांचे जलविहार असावे किंवा ते सार्वजनिक महास्नानगृह असावे असे संशोधक अंदाज लावतात.

विशाल इमारती

मोहेंजोदारो च्या उत्तर भागात 242 * 112 फूट एवढ्या विशाल इमारतींचे भग्नावशेष सापडले आहेत. तिला अनेक मजले आहेत. ही इमारत नगराआधीपती निवासस्थान व त्यांचे कार्यालय असावे असे बांधकामावरून सांगण्यात येते.

गृहरचना

मोहेंजोदारो ची गृहरचना ही या संस्कृतीवर प्रकाश टाकते. येथील घरे पक्क्या विटांनी बांधलेले असून विटांची लांबी 51.25 सेंटीमीटर ,रुंदी 21.25 सेंटीमीटर व जाडी 5.6 सेंटीमीटर. विटा जोडण्यासाठी चिखल व चुना यांचे मिश्रण वापरण्यात आले. त्यावेळेस सिमेंटचा शोध लागला नव्हता भिंती ची रुंदी पाच फूट जाड होती.  भिंतीचे कोपरे रस्त्याच्या वळणावर अर्धगोलाकार होते.

गल्लीला लागून प्रत्येक घराला लहानसे प्रवेशद्वार होते. प्रत्येक घरात स्नानगृह व मोरी असे व पाणी मोरीत साचून तिथून नाली द्वारे मोठ्या नालीत सोडण्यात येत असे. विहिरींना पाणी लागत असल्यामुळे प्रत्येक घराला पाण्यासाठी विहीर होती. या विहिरी आजही हजारो वर्षानंतर चांगल्या अवस्थेत आहेत. यावरून त्याकाळचे बांधकाम कौशल्य किती चांगले होते हे यावरून सिद्ध होते. घरात एका बाजूला स्वयंपाकगृह असून तेथे मातीच्या चुली नसून विटांच्या चुली होत्या प्रत्येक घराला  दोन किंवा तीन मजले असत व मजल्यावर जाण्यासाठी विटांची जिने बांधलेले होते.

हराप्पा हे नगर मोहेंजोदारो पासून 564 किलोमीटर असून तेथील नगर रचना व गृहरचना सारखी आढळून आली. त्याच प्रकारे लोथल या ठिकाणी सुद्धा सारखीच संस्कृती आढळून आली. लोथल ला "मोहेंजोदारोची लघु प्रतिकृती"(miniature mohenjo-daro) असे ही म्हणतात.

सामाजिक जीवन

कुटुंब व स्त्री स्वातंत्र्य

पितृप्रधान कुटुंब पद्धती त्यावेळची असून अनेक पति व पत्नी करण्याची पद्धत अस्तित्वात असावी. चूल व मूल सांभाळण्याचे कार्य स्त्रियांकडे असले तरी स्त्रियांना बरेच स्वातंत्र्य व महत्त्व असावे असे अधिक प्रमाणात आढळलेल्या स्त्री मूर्तीवरून स्पष्ट होते. त्यावेळी स्त्रिया चार ते साडेचार फूट उंच व पुरुष साडेचार ते पाच फूट उंच असावेत असा संशोधकांनी दावा केलेला आहे.

आहार

त्यावेळी लोक गहू, जव, तांदूळ, वाटाणा इत्यादी द्विदल धान्य, दूध व त्यापासून बनणारे पदार्थ दही, लोणी, तूप वगैरे आणि मास, अंडी ,फळे व प्रासंगिक मद्य ह्या वस्तूंचा आहारात समावेश असावा.

पोशाख

उत्खननात सापडलेल्या सुया, मातीच्याच चात्या,शिक्के व पुतळ्यांचे पोशाख यांच्या आधारे, पुरुष गुडघ्यापर्यंत घट्ट धोतर किंवा पंचा डाव्या खांद्यावरून उजव्या काखे खालून शाली सारखे वस्त्र गुंडाळीत असेल व स्त्रिया गुडघ्यापर्यंत तंग लुंगी म्हणजे घागरा ,झगा ,स्कर्ट व शाली सारखे पण अरुंद लहानशा वस्त्राने खांद्यापर्यंत चा भाग झाकीत. सुती, लोकरी व रेशमी कपड्यांचे रंगीबेरंगी वस्त्रे वापरत असावीत.

अलंकार व सौंदर्यप्रसाधने

सोने,चांदी ,तांबे ,ब्रांझ,कथील ,शिंपले ,सुंदर दगड ,चिनी माती ,हिरे ,मोती , मणी इत्यादी विविध कलापूर्ण अलंकार वापरत असत .आकडे ,कर्णफुले , डूल ,नथ ,कंठमाला, कमर पट्टा, पैंजण, चाळ ,बाजूबंद ,बांगड्या ,अंगठ्या इत्यादी दागिने वापरण्याची हाऊस स्त्री आणि पुरुषांना सारखीच असावी.

स्त्रिया सौंदर्य प्रसाधन ना द्वारे शरीराला सजवीत असत त्यात रंग  रंगीबेरंगी रंगाने अंग गोंदणे, आकर्षक केशरचना करणे. स्त्री व पुरुष दोघेही वेणी घालीत.

मनोरंजन

तेथील लोक अनेक प्रकारचे मनोरंजन करीत असावेत असा एका तरुणीची ब्रांझ प्रतिमा तत्कालिन नृत्य कलेवर प्रकाश टाकते .त्या काळी स्त्रिया ह्या नृत्य कलेत अधिक निष्णात होत्या. नृत्य याबरोबर गायन-वादन द्वारा ही करमणूक होत असेल. त्याच प्रमाणे जुगार ,शिकार ,प्राण्यांच्या लढाया इत्यादी खेळ खेळून सुद्धा लोक आपली मनोरंजन करीत असावेत. उत्खननात खुळखुळे, शिट्ट्या इत्यादी प्रकारची लहान मुलांची मनोरंजनाची साधने मिळालेली आहेत.

अवजारे व उपकरणे

उत्खननात दगड, तांबे ,ब्रांझ यांची हत्यारे सापडलेली आहेत. त्यात चाकू , सुऱ्या, खंजीर ,तलवार ,भाला ,गदा, धनुष्यबाण, गोफण, मास, हुके ,कुऱ्हाड ,करवती, पटाशी, टाकी इत्यादी अवजारे सापडलेली आहेत . यापासून यांचा उपयोग शत्रूपासून रक्षण व प्राण्यांची शिकार यासाठी वापरीत असत.

क्रमश.......

सिंधू संस्कृती -भाग 1


 सिंधू संस्कृती -भाग 1

पोस्तसांभार :Dr Sitaram Ingole

सहस्त्रावधी वर्षाच्या अनुभवाने व सतत प्रयत्नाने मानवाने स्वतःची प्रगती केली . जुन्या पाषाणयुगातील भटके एकाकी व रानटी मानवी जीवन धातु युगात स्थायी सुसंघटित व सुसंस्कृत बनले. निरनिराळ्या प्रदेशात मानवाने आपल्या संस्कृती स्थापन, प्रस्थापित केल्या त्या कालांतराने नष्ट ही झाल्या . अशाच एका संस्कृतीचे भंगलेले अवशेष सापडले (सिंधू संस्कृती ).इसवी सन 1921 साली श्री. दयाराम सहानी यांनी हडप्पा व 1922 आली श्री. राखल दास बॅनर्जी यांनी मोहेंजोदारो चा शोध लावला. यानंतर ते संशोधन कार्य पुराणवस्तु खात्याचे प्रमुख सर जॉन मार्शल यांनी स्वतःकडे घेतले .सिंधू नदीच्या खोऱ्यात एका नव्या संस्कृतीचा शोध लागला, असे पत्रकाद्वारे 1924 साली प्रसिद्ध केले. ही वार्ता जगातील अनेक संशोधकाना कळताच या संस्कृतीचा अभ्यास करू लागले .मार्शलनेही या संस्कृतीवर आपले अभ्यासपूर्ण तीन ग्रंथ प्रसिद्ध केले.

सिंधू संस्कृती नामकरण

सिंधू नदीच्या परिसरात ही संस्कृती विकसित झाल्याने ह्याला सिंधू संस्कृती असे म्हणत होते किंवा सिंधू खोरे संस्कृती, साईंधव संस्कृती ,साईंधवी संस्कृती असेही नामकरण केलेले आहे. सिंधू संस्कृती वैदिक संस्कृतीच्या पूर्वीची आहे.‍ हे बर्याच संशोधकांनी सिद्ध केले आहे .सिंधू संस्कृतीच्याही पूर्वीची संस्कृती घग्गर नदीच्या परिसरात 1950 आली आढळून आली तिचे पद्धतशीर उत्खनन 1961 पासून सुरू झाले.

सिंधू संस्कृतीचा विस्तृत विस्तार

या संस्कृतीचे भग्नावशेष पंजाब ,सिंध ,काठेवाड ,राजपूताना व बलुचिस्थान एवढ्या विस्तृत प्रदेशात सापडले आहेत. मोहेंजोदारो व हरप्पा व्यतिरिक्त चनहूदारो, अमरी, रूपार,नाल ,लोहूमजोदारो, अलीमुराद, झूकार , झांगर ,लोथल वगैरे 40 पेक्षा जास्त नगरे उत्खननात सापडली आहेत.

लेखी पुराव्यांचा अभाव

अनेक वस्तू ,उपकरणे ,अवजारे, मुद्रा ,सांगाडे, खेळणी वगैरे च्या आधारे सिंधू संस्कृतीची माहिती मिळते. पण लिखित पुराव्यांच्या अभावी या संस्कृतीचे पूर्ण ज्ञान होऊ शकले नाही .अनेक शिक्क्यावर जे काही लिहिले आहे ते अजूनही ओळखले गेले नाही. त्यामुळे केवळ भौतिक साधनांचा आधार घेऊन या संस्कृतीचा सर्वसाधारणपणे संशोधकांनी अभ्यास केलेला आहे.

सिंधू संस्कृतीची योजनाबद्ध नगररचना व गृहरचना

येथील उत्खननात आढळलेल्या हराप्पा (हडप्पा) व मोहेंजोदारो या दोन प्रमुख नगरांची नगररचना व गृहरचना बहुतेक सारखीच आहे. मोहेंजोदारो या स्थानिक शब्दाचा अर्थ" मृतांची टेकडी "असा होतो. हे नगर सिंध प्रांतात 'लारखाना ' जिल्ह्यात आहे . याच्या उत्तरेस हराप्पा 564 किलोमीटर 350 मैल अंतरावर आहे. या नगराचे आत्तापर्यंत जमिनीत एकाखाली एक असे सात थर आढळून आलेले आहेत .त्यानंतर पाणी लागल्यामुळे उत्खनन बंद झाले. तरी नीरावशेष जमीन अजूनही लागली नाही .यावरून हे नगर सात वेळा बांधले व नष्ट झाले असा निष्कर्ष संशोधक लावतात.

नगररचना

नगररचना करताना याठिकाणी सौंदर्यापेक्षा उपयुक्ततेकडे अधिक लक्ष दिले गेले होते .नगरातील रस्ते पूर्व-पश्चिम ,उत्तर-दक्षिण असे पसरलेले आहेत .त्याची रुंदी 2.7 मिटर ते 10.3 मिटर पर्यंत 9 ते 34 फुटापर्यंत आहे. मुख्य रस्ते ,उप रस्ते, गल्ल्या असे रस्त्याचे तीन वर्ग मांडले असावेत .रस्ते सरळ असून त्यावर दिवाबत्तीची व्यवस्था होती रस्त्याला समांतर नाल्या आहेत. नाल्या 22.5 सेंटीमीटर ते 45 सेंटिमीटर रुंद व 30 ते 62 सेंटीमीटर खोल आहेत. घरातील पाणी एका लहान नाली द्वारे प्रमुख नालीत येत असे व त्या प्रमुख नाल्या मोठ्या नालीला जोडल्या जाऊन ते घाण पाणी नदीत सोडले जात असे. मोठ्या नाल्याo दगडांनी व लहान नाल्या विटांनी पक्क्या बांधलेल्या आहे .त्या साफ करण्यासाठी विटांच्या झाकणाची छिद्रे आहेत .अशाप्रकारे नगरभर नाल्यांचे जाळे पसरलेले आढळून आले .अशीही सांडपाण्याची आरोग्यपूर्ण उत्कृष्ट व्यवस्था ,जगातील प्राचीन संस्कृती अद्वितीय होती असा संशोधकांचा दावा आहे.


क्रमशः...,.

Thursday, 14 April 2022

प्राचीन नागरी सभ्यता - सिंधू संस्कृती

 प्राचीन नागरी सभ्यता - सिंधू संस्कृती

पोस्त सांभार ::रवींद्र गुजर 

सिंधू संस्कृती ही एक सुधारलेली नागरी सभ्यता होती. तिचा विस्तार प्रचंड झालेला होता. नवनवीन स्थळांवर अद्यापही उत्खनन व संशोधन सुरू आहे. या सिंधू संस्कृतीविषयी सांगत आहेत पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असलेले ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... आपल्या ‘किमया’ या सदरातून...
............
सन १९२०-२१मधील गोष्ट. (सध्याच्या पाकिस्तानातील) लाहोर-मुलतान रेल्वेचे काम चालू होते. जमीन खणताना काही विशिष्ट आकाराच्या असंख्य पक्क्या विटा बाहेर येऊ लागल्या. तिथले प्रमुख अधिकारी ‘जागरूक’ असल्यामुळे त्यांनी काम थांबवले आणि पद्धतशीर शोध सुरू केला अन् काय महान आश्चर्य! अद्याप ओळख नसलेली, भारताची एक प्राचीन संस्कृती उजेडात आली. हडप्पा आणि मोहेंजोदडो (मोहेंजोदारो) ही शहरे जगासमोर प्रकट झाली. सिंधू नदीच्या आसपास ती ठिकाणे असल्यामुळे ‘सिंधू संस्कृती’ किंवा ‘हडप्पा’ (हराप्पा) असे नाव पुढे रूढ झाले. भारताला फार प्राचीन इतिहास नाही, हा पाश्चात्यांचा भ्रम दूर झाला. 
सुरुवातीच्या उत्खननात सर जॉन मार्शल, मॉर्टिमर व्हीलर हे ब्रिटिश संशोधक आणि राखालदास बॅनर्जी, दयाराम साहनी, माधवस्वरूप वत्स हे भारतीय सहभागी झाले होते. सन १९२३पर्यंत त्या भागात मोठ्या प्रमाणावर काम झाले. त्यापूर्वी जवळपासच्या खेड्यांमधील नागरिक आपल्या घरांच्या बांधकामांसाठी तिथल्या सहज उपलब्ध होणाऱ्या भक्कम विटा वापरत होते, असे नंतर लक्षात आले. महत्त्वाची पुरातत्त्वीय स्थळे म्हणून ती सर्व जाहीर झाल्यानंतर तिथला ऱ्हास आणि नाश थांबला. त्या वेळच्या वायव्य भारतामधील सिंधू संस्कृतीची नवनवी स्थाने उत्खननांद्वारे सापडत गेली. सध्याच्या भारतात स्वातंत्र्यापूर्वी फार काम झाले नव्हते. परंतु आजमितीला सिंधू संस्कृतीच्या स्पष्ट खुणा दाखवणारी स्थाने पाकिस्तानापेक्षा आपल्याकडे अधिक आहेत. सुरुवातीला या संस्कृतीचा इतिहासपूर्व काळ (त्या वेळी मिळालेल्या पुराव्यांवरून) इ. स. पूर्व २५०० ते १७०० मानला जात होता. आज तो आणखी किमान २००० वर्षे मागे जातो, असे स्पष्ट झाले आहे.
हडप्पा आणि मोहेंजोदडो ही त्या काळी शहरी वस्ती होती. शहराभोवताली संरक्षक भिंती होत्या. विशेष म्हणजे, उत्खननात एकाखाली एक असे वस्तीच्या खुणा दाखवणारे ५-६ थर सापडले. मातीच्या भांड्यांची खापरे आणि मातीच्याच लहान-मोठ्या मूर्ती (खेळणी) या गोष्टी सिंधू संस्कृतीच्या निदर्शक मानल्या जातात. मोहेंजोदडोमध्ये मिळालेल्या ठळक वस्तू/वास्तू म्हणजे सार्वजनिक विशाल स्नानगृह (तलाव), प्रमाणबद्ध इमारती, सांडपाण्याची व्यवस्था, तसेच युनिकॉर्न (एकशिंगी प्राणी) व पशुपतीच्या मुद्रा, वजनमापे इत्यादी. खोलवर खणत जाताना पाणी लागल्यामुळे उत्खनन होऊ शकले नाही. अजूनही तिथला महत्त्वाचा भूभाग ‘अंधारा’त राहिलेला आहे.
गुजरातमधील कच्छच्या रणविभागात ‘धोलाविरा’ नावाचे (हडप्पा, मोहेंजोदडोएवढेच मोठे) शहर उजेडात आले. १९९०पासून तिथे पद्धतशीर उत्खनन सुरू झाले. तिथे अनेक दगडी वास्तू सुस्थितीत आढळल्या. घराघरात पाणी पोहोचविणारी जमिनीखालील आधुनिक पुरवठ्याची जाळी, हे तिथले आणखी एक वैशिष्ट्य. त्यावरून तिथे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते, हे लक्षात येते. ‘सिंधू लिपी’ हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. नंतरच्या काळातील ब्राह्मी आणि देवनागरी लिपींची ही जननी! त्या लिपीच्या ३००हून अधिक खुणा (अक्षरे) आहेत. काही जणांनी ती वाचण्यात यश मिळाल्याचा दावा केला आहे. परंतु अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही. बघू या भविष्यात त्याचे श्रेय कोणाला मिळणार आहे! विशेष म्हणजे धोलविरामध्ये सिंधू लिपीतील एक दगडी फलक मिळालेला आहे.

गुजरातमध्ये साबरमती नदीजवळ ‘लोथल’ हे सिंधू संस्कृतीचे प्रसिद्ध स्थळ आहे. समुद्रमार्गे व्यापाराचे ते एक प्रमुख ठिकाण होते. आज समुद्र जरी तिथून लांब असला, तरी त्या काळात बोटी आतपर्यंत येत असणार, अशा बंदरसदृश जागा लोथलमध्ये आढळल्या आहेत. मणी बनवण्याचा कारखानाही तिथे सापडला. हडप्पाएवढेच राखीगढी आणि तिथल्या संस्कृतीचे संशोधन महत्त्वाचे आहे. तसेच, पाकिस्तान, बलुचिस्तान, अफगाणिस्तानातही नवनवीन स्थळे उजेडात येत आहेत. बऱ्याच ठिकाणी सिंधूपूर्व आणि उत्तरसिंधू संस्कृतीचे पुरावे हाती येत आहेत.

नर्तिका
भारताच्या इतिहासात कालनिर्णय हा फारच जटिल प्रश्न बनलेला आहे. सिंधूकालाबरोबरच वैदिक आणि महाभारताचा काळ प्रश्नचिन्ह निर्माण करतो. सिंधू संस्कृतीच्या नाशाला ‘आर्यांचे आक्रमण’ कारणीभूत होते, हा ब्रिटिशांचा सिद्धांत आता खोटा ठरला आहे. आर्यांचे आणि वेदरचनेचे स्थान सरस्वती नदीच्या किनाऱ्याजवळ होते. तसे उल्लेख वेदांमध्ये जागोजाग आढळतात. एकेकाळची सिंधू नदी दुष्काळ आणि हवामानातील बदल यांमुळे गायब झाली. आज ‘घग्गर’ नावाने तिचे प्रवाह काही काही ठिकाणी आढळतात. डॉ. वाकणकर यांनी अथक परिश्रमातून सिंधूच्या हिमालयातील उगमस्थानापासून पश्चिम समुद्रात ती विलीन होईपर्यंतचा संपूर्ण मार्ग (प्रवाह) शोधून काढला. अर्थात सरस्वती ही सिंधू नदीइतकीच महत्त्वाची असून, सिंधू संस्कृतीला ‘सरस्वती संस्कृती’ मानणारे काही संशोधक आहेत.

आधुनिक पुराव्यांवरून सिंधू संस्कृतीचा काळ (काही स्थळांच्या संदर्भात) इ. स. पूर्व ६०००पर्यंत मागे जातो. इजिप्त आणि मेसोपोटेमियाची सभ्यतासुद्धा इतकी जुनी नाही. ब्राँझ धातूचा वापर त्या काळात झाला. म्हणून त्याला ‘ब्राँझ एज’ संस्कृती मानले जाते. त्याची व्याप्ती वायव्य बृहत्तर भारत ते खाली दक्षिणेपर्यंत सुमारे दोन लाख चौरस किलोमीटर होती. शहरांची भरभराट होत गेली, तसतशी ती पूर्व आणि दक्षिणेकडे पसरत गेली. तिचे अस्तित्व भारतभूमीतून नाहीसे कसे झाले, याबाबत अद्याप एकवाक्यता नाही. नदीचे पूर, दुष्काळ आणि प्रतिकूल हवामान ही त्याची कारणे असावीत. सिंधू लिपी किमान इ. स. पू. ३०००पासून अस्तित्वात होती. संस्कृती आणि लिपीवर जगभरातील पुरातत्त्वज्ञ संशोधन करत आहेत. पाकिस्तानातील मुख्य स्थळांना भेट देण्याची परवानगी भारतीयांना सहजासहजी मिळत नाही. ‘ती आमचीच प्राचीन संस्कृती आहे,’ असे ते मानतात! आता संशोधनात रेडिओकार्बन कालमापन आणि सॅटेलाइटवरून केलेले चित्रीकरण खूप उपयोगी पडत आहे. इथपर्यंत आपण सिंधू संस्कृतीचा थोडक्यात आढावा घेतला. आता पुन्हा एकदा सगळ्या इतिहासाचे अवलोकन करू.

सिंधू संस्कृतीचे कल्पनाचित्र
सन १८२३मध्ये भारतात प्रवासी म्हणून आलेल्या चार्ल्स मॅसन या व्यक्तीला आगळ्यावेगळ्या विटांचे ढीग आढळले. त्याला ते जुन्या किल्ल्याचे अवशेष वाटले. त्यानंतर तीस वर्षांनी, १८५६मध्ये लोहमार्ग बांधणाऱ्या अभियंत्यांना तशाच आणखी काही विटा सापडल्या. त्यांनी त्यांचा आपल्या कामात उपयोग करून घेतला. लुप्त सिंधू संस्कृतीचा शोध अशा रीतीने प्रथम त्या लोकांना लागला. १९२०नंतर हडप्पा आणि मोहेंजोदडोत व्यवस्थित उत्खनन सुरू झाले. हवाई चित्रणाद्वारे जमिनीखालील वास्तूंचाही शोध लागू शकतो. पडक्या वास्तू, खापरे, जनावरांची हाडे आणि वनस्पतींच्या बिया या पुरातत्त्वाच्या अभ्यासात खूप उपयोगी ठरतात. काळानुसार त्यांची विभागणी केली जाते. उत्खनन फार काळजीपूर्वक करावे लागते. कारण ‘खालच्या पुराव्यां’चा नाश होण्याची शक्यता असते. पुरातत्त्वाच्या संशोधनात इतिहास, भूविज्ञान, रसायन, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, संगणक आदी अनेक विषयांमधील तज्ज्ञांची आवश्यकता असते. संपूर्ण जगात, पुण्यातील डेक्कन कॉलेज हे असे एकमेव ठिकाण आहे, की जिथे या सर्व विषयांचे विभाग एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे तिथे संशोधन वेगाने होऊ शकते.

मोहेंजोदडोचा शब्दश: अर्थ ‘मृतांचा (दफनांचा) ढिगारा’ असा होता; परंतु तिथे प्रत्यक्ष दफनभूमी सापडलेली नाही. सध्याच्या सिंधू (धग्गर) नदीपासून ते ठिकाण पाच किलोमीटरवर आहे. पाच-सहा हजार वर्षांपूर्वी नदी शहराजवळ असू शकते. जुन्या वस्त्यांच्या थरांवर नवीन शहराची बांधणी झालेली दिसते. आधीची वस्ती महापुरांमुळे नष्ट झाली असण्याची शक्यता आहे. हडप्पा हे मोहेंजोदडोच्या ईशान्येला ६०० किलोमीटरवर आहे. नदी आणि जमिनीवरून चालणाऱ्या व्यापाराला हडप्पा हे जवळचे सोयीचे स्थान होते. आज ते शहर जवळजवळ पूर्णपणे नष्ट झालेले आहे. गव्हासारखी धान्ये साठवण्यासाठी मोठमोठी कोठारे तिथे सापडली. हडप्पात दोन दफनभूमी आढळल्या. शस्त्रे आणि अन्य अवजारे बनविण्यासाठी लागणाऱ्या तांबे निर्मितीच्या भट्ट्या तिथे होत्या. मोहेंजोदडोत दफनभूमी सापडली नसली, तरी ३९ रहस्यमय सांगाडे एका जागी मिळाले. कदाचित एखाद्या हल्ल्यात ते लोक मरण पावले असावेत किंवा रोगाच्या साथीत त्यांचा बळी गेला असावा.

पशुपती मुद्रा
मोहेंजोदडोत साधारण तीन हजार घरे होती. दर तीन घरांपैकी किमान एका घरात स्वत:ची पाण्याची विहीर होती. घराची रचना आयताकृती असून, मधल्या भागात मोकळी जागा असे. पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची जमिनीअंतर्गत उत्तम व्यवस्था होती. शहरातील रस्ते, बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे एकमेकांना समांतर आणि ९० अंशांत काटणारे होते. ते प्रशस्त होते. सार्वजनिक स्नानासाठी तलाव होते आणि नद्यांमधून देशांतर्गत व्यापार चालत असे. हडप्पा लोकवस्ती ५० हजारांपर्यंत असावी. सिंधू लिपीवरून असे म्हणता येते, की लिहिण्याची कला लोकांना अवगत असावी. वजन-मापे अत्यंत काटेकोर (प्रमाणबद्ध) होती. शेतीमुळे तिथली अर्थव्यवस्था स्थिर झालेली होती. गहू, तांदूळ, विविध भाज्या, फळे आणि कापूस यांचे पीक घेतले जाई. बैलांसह अनेक प्राणी पाळले जात. लापिस लाझुली आणि कार्नेलियन या मौल्यवान खड्यांची निर्यात होई.

पुरोहितपुरोहित
मानवी आणि प्राण्यांची चित्रे असलेल्या स्टिएटाइट दगडाच्या असंख्य मुद्रा उत्खननात जागोजाग सापडल्या आहेत. पशुपती, एकशिंगी प्राणी, नर्तिका आणि पुरोहित यांच्या मुद्रा व मूर्ती जगप्रसिद्ध झालेल्या आहेत. भाजलेल्या मातीची खेळणी खूप मिळालेली आहेत. मुद्रांवर अनाकलनीय सिंधू लिपीतील एक-दोन ओळींचे लेख आहेत. भौमितिक आकारही कोरलेले आहेत.

अशा प्रकारे सिंधू संस्कृती ही एक सुधारलेली नागरी सभ्यता होती. तिचा विस्तार प्रचंड झालेला होता. नैसर्गिक कारणांमुळे तिचा अस्त झाला असावा. त्यानंतर तिथले लोक सर्व दिशांना विखुरले असावेत. नवनवीन स्थळांवर अद्यापही उत्खनन व संशोधन सुरू आहे. सिंधू लिपीची उकल झाली, तर त्या वेळचे लोक आणि त्यांचा निश्चित काल यावर प्रकाश पडू शकेल. आपण त्याची वाट पाहू या. 



रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

+

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...