पोस्तसांभार :: ओंकार ताम्हनकर
अशोकाचा परिवार आणि मृत्यू
- अशोकाचा परिवार
अशोकाच्या परिवारसंबंधात त्याच्या शिलालेख, स्तंभलेख तसेच बौद्धग्रंथांतून फार थोडी माहिती मिळते.
I. अशोकाच्या राण्या.
साधनांतून असे कळू शकते की अशोकाला ५ राण्या होत्या.
१.देवी
- बौद्ध ग्रंथात असा उल्लेख येतो की उजैनी मध्ये राजप्रतिनिधी असताना
अशोकाचा श्रेष्ठी जातीच्या 'देवी उर्फ विदिशा महादेवी शक्यकुमारी' नावाच्या
एका स्त्रीशी प्रेमसंबंध होता आणि त्यांना एक संतती सुद्धा होती.
२. असंधीमित्रा - ही अशोकाची पट्टराणी होती.
३. कारुवाकी - अशोकाच्या एका लेखात त्याची 'दुसरी राणी' कारुवाकीचा उल्लेख येतो.
४. पद्मावती.
५. तिष्यारक्षिता.
II.अशोकाचे पुत्र आणि कन्या.
- पुत्र
१. महेंद्र(महिंद) - देवी चा मुलगा. अशोकाने याला बौद्ध धर्मप्रसारासाठी लंकेत पाठविले. (व्हिन्सेंट स्मिथ महिंद्राला अशोकाचा भाऊ मानतो.)
महेंद्र अशोकाचा मुलगा होता की भाऊ हे आपण स्पष्ट सांगू शकत नाही. परंतु या संबंधी आपण तर्क लावू शकतो. ते असे,
अ)
महेंद्र जर पहिला मुलगा म्हणजेच भावी सम्राट असता तर अशोकाने त्याला
राज्यात ठेवण्याऐवजी लांब लंकेत धर्माच्या कामाला का पाठवले असते? त्यासाठी
दुसऱ्या कोणा राजकुमाराला का पाठविले नाही? अशोकाने जरी बौद्ध धर्म
स्वीकारून कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला असला तरी एका राजाने आपल्या
राज्याचं रक्षण केलं पाहिजे आणि त्यासाठी शस्त्र उचलावं लागलं तरी
उचलायचं हे तो जाणून होता. त्यामुळे अशोक राज्याच्या युवराजाला
राज्याबाहेर पाठवेल असं वाटत नाही. व्हिन्सेंट स्मिथ यांचेही असेच विचार
आहेत की महेंद्र हा मुलगा नसून भाऊ असावा.
ब)
काही इतिहासकार मानतात की महेंद्र हा मुलगाच असावा. कारण अशोकाच्या
साम्राज्याचे ४ मोठे भाग होते. तक्षशिला, उजैनी, सुवर्णगिरी, तोसली.
चंद्रगुप्ताच्या काळापासून अशा मोठ्या विभागावर राजप्रतिनिधी म्हणून
युवराजांना पाठविण्यात येत असे. महेंद्र धरून अशोकाचे ४ पुत्र होतात व
अशोकाच्या काळात राज्याचेही ४ मोठे भाग होते त्यामुळे महेंद्र हा अशोकाचा
मुलगाच असावा असं काही इतिहासकारांचे मत आहे.
२. तीवर.
हा
कारुवाकी या अशोकाच्या दुसऱ्या राणीचा मुलगा होता. 'द्वितीया देवी
तीवरमाता कारुवाकी' असा एक लेखात उल्लेख येतो यावरून तीवर नावाचा मुलगा
होता हे समजते.
३. कुणाल
पद्मावती राणीचा मुलगा. याच्या २ मुलांनी दशरथ आणि सांप्रतिने अशोकानंतर राज्यकारभार पाहिला.
४. जलौक
- कन्या
१. संघमित्रा - महेंद्र बरोबर ही सुद्धा लंकेत बौद्ध धर्म प्रसाराला गेली.
२. चारुमती
- ही देवपाल नावाच्या नवऱ्याबरोबर नेपाळ मध्ये देवपाटन ला गेली आणि तिथेच
वारली.तिच्या स्मरणार्थ अशोकाने तिकडे ४ स्तूप बांधले असं म्हणतात.
(इकडे
आपण एक लक्षात घेतले पाहिजे की अशोकाची राणी कारुवाकी आणि तिचा मुलगा
तीवर या दोघांचाच फक्त अशोकस्तंभांत, लेखांत वगैरे उल्लेख येतो. बाकी
सगळ्यांचा उल्लेख बौद्ध ग्रंथांतून आणि दंतकथांतून येतो.)
- अशोकाचा मृत्यू.
अशोकाचे अखेरचे दिवस व मृत्यू यांविषयी अशोकाच्या कोणत्याही लेखात उल्लेख येत नाही. जो उल्लेख येतो तो बौद्ध ग्रंथांतून येतो.
बौद्ध ग्रंथांनुसार अशोकाचा मृत्यू वार्धक्याने झाला.
बौद्ध
ग्रंथांमध्ये अशी कथा येते की, एकदा अशोक आपले गुरू आचार्य उपगुप्त
यांच्याबरोबर चर्चा करत असताना त्याला कळले की जगात सर्वात जास्त दान
करणारा माणूस आपण नाही. त्यामुळे त्याने १०० कोटी सुवर्णमुद्रा दान
करण्याचा निर्णय घेतला. हे दान सरकारी खजिन्यातून जाऊ लागले. राजा एवढे
खर्च करतोय आणि ते पण सरकारी खजिन्यातून! हे पाहून अनेक मंत्री बिथरले आणि
अशोकाचा नातू सांप्रतीकडे(कुणालचा मुलगा) गेले. आणि नंतर सांप्रतिच्या
आज्ञेवरून हे दान थांबवण्यात आले. गेलेल्या पैशांची परतफेड होण्यासाठी
मंत्र्यांनी अशोकाला अप्रत्यक्षरीत्या छळण्यास सुरवात केली. उदाहरणार्थ,
अशोक नेहमी सोन्याच्या ताटातून जेवायचा. हळू हळू त्याला चांदीच्या ताटातून
आणि मग मृत्तिकापात्रांतून जेवण जाऊ लागले. तरी बौद्ध धर्म स्वीकारलेला
अशोक काहीच बोलला नाही. आणि मग पुढे त्याचा मृत्यू झाला.
अशोकानंतर
मगध राज्य त्याच्या २ नातवंडांत, दशरथ आणि सांप्रती यांच्यात वाटले गेले
आणि पुढे ५० वर्षांतच मौर्य साम्राज्याचा शेवट झाला.

No comments:
Post a Comment