Sunday, 3 April 2022

चक्रवर्ती सम्राट अशोक (भाग ५)

 


चक्रवर्ती सम्राट अशोक (भाग ५)
पोस्तसांभार :: ओंकार ताम्हनकर
बौद्ध धर्म स्वीकार, धर्मयात्रा आणि धर्मप्रसार.
. अशोकाचा बौद्धधर्माचा स्वीकार.
अशोकाच्या वेळी बौद्ध धर्म त्याच्या शुद्ध स्वरूपात होता आणि निरनिराळ्या धर्मप्रचारकांकडून तो उपदेशिला जात होता. मगधराज्यात असा कोणताही प्रदेश नव्हता जेथे बौद्ध भिक्षूंचा व धर्मप्रचारकांचा प्रवेश झाला नव्हता. त्यामुळे कलिंगयुध्दाच्या आधी अशोकाची बौद्ध धर्माशी ओळखच झाली नव्हती असं आपण म्हणू शकत नाही. पुढे कलिंगयुद्धावेळी विजयानंतर झालेल्या प्राणहानीमुळे अनुतप्त झालेल्या अंतःकरणाला शांती देण्यासाठी भूतदयाप्रधान बौद्ध धर्मासारखा धर्मच अत्यंत योग्य असल्यामुळे अशोकाच्या मनावर या धर्माची छाप पडली आणि त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
बौद्ध धर्माचा स्वीकार करणं म्हणजे आता कधीच शस्त्र धरायचं नाही असं नक्कीच नव्हतं. शेवटी अशोक एक राजा होता. आपल्या राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवणं हे बौद्ध धर्म स्वीकारण्याऐवढंच महत्वाचं होतं हे त्याला नक्कीच माहीत असेल.
व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो की,
"All that we know about his life indicates that once he had begun to devote himself to the love, protection and teaching of the law of Piety, or dharma, he never again allowed himself to be tempted by ambition into an unprovoked war."(Page 26)
म्हणजेच, त्याच्या आयुष्याबद्दल आपल्याला जे काही माहित आहे ते हे दर्शविते की जेव्हा त्याने प्रेम, संरक्षण, धर्म आणि धर्मातील शिकवणीस स्वत: ला समर्पित केले, तेव्हा त्याने स्वतःस कधीही बिनआगळिकीच्या युद्धाची महत्वाकांक्षा बाळगण्याची परवानगी दिली नाही.
पुरावे नसले तरी आपण असे म्हणू शकतो की कलिंगयुद्ध हे त्याच्या आयुष्यातील पाहिलं युद्ध नाही तर शेवटचं युद्ध होतं.
वर म्हटल्याप्रमाणे कलिंगयुद्धापूर्वी सुद्धा अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. ते साल इ.स. पूर्व २६५ होतं म्हणजे युद्धापूर्वी साधारण अडीच वर्ष आधी. परंतु त्या वेळची बौद्ध धर्मविषयीची अशोकाची आस्था विशेष नसावी. कलिंग युद्धाने त्याचे मन वळविले.
बौद्ध ग्रंथ आणि दंतकथा बघितल्या तर 'उपगुप्त' नावाचा आचार्य आणि 'श्रमण निग्रोध' नावाच्या अधिकाऱ्याच्या मदतीने अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यासंबंधी ३ मोठे निर्णय घेतले.
I. हिंदू धर्मातील वर्ण व्यवस्था काढून टाकली.
II. प्राणी जीवनाच्या पावित्र्याचा आदर केला.
III. पालक, वडीलधाऱ्या माणसांचा आदर करण्याच्या श्रद्धेला फार मोठे स्थान दिले.
. धर्मयात्रा
स्तंभ आणि शिलालेखांतून दिसून येतं की अशोकाने त्याची धर्म यात्रा इ.स. पूर्व २४९ रोजी म्हणजे राज्याभिषेकानंतर २१व्या वर्षी आणि कलिंग युद्धानंतर साधारण १२ वर्षांनी सुरू केली.
I. सर्वप्रथम त्याने नेपाळ मधील तराई प्रांतातील बौद्ध जन्मस्थानाचे दर्शन घेतले.
II. नेपाळ तराई येथीलच कपिलवस्तू(तिलौरा कोट) यालाही भेट दिली. बुद्धाचे बालपण ज्या स्थानी गेले ते स्थान.
III. बोधी वृक्ष असलेले गया.
IV. ऋषीपट्टण/सारनाथ.
V. श्रावस्ती (बौद्ध ज्या ठिकाणी दीर्घ काळ राहिला ते स्थान.) हे सध्या औंध प्रांतातील राप्ती नदीच्या काठी असलेले सहात-महात असावे असं व्हिन्सेंत स्मिथ म्हणतो. (पान - 41)
VI. बुद्धाचे मदुत्युस्थान कुशीनगर.
. धर्मप्रसार
अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसाराचे काम फार नेटाने केले. त्याने अगदी जंगली लोकांपासून मगध राज्यातील दूरदूरच्या प्रांतात आणि त्याच बरोबर आशिया, युरोप व उत्तर आफ्रिका वगैरे खंडात धर्म प्रसार केला.
A. भारताबाहेरील धर्मप्रसार
I. सीरियाच्या बादशहकडे आणि पश्चिम आशियात.
II. टॉलेमी फिलाडेफस, इजिप्तच्या शाहच्या प्रदेशात.
III. उत्तर आफ्रिकेतील राजा मॅगस याच्या प्रदेशात.
IV. मेसिडोनियात.
B. भारतातील धर्मप्रसार
देश (भाग) - धर्मप्रचारकाचे नाव
I. काश्मीर - मज्झन्तिक
II. गांधार - मज्झन्तिक
III. महिश्मंडल(म्हैसूर) - महादेव
IV. वनवासी(उत्तर कन्नड) - रक्षित
V. अपरांतक(उत्तर कोंकण) - योन धर्मरक्षित
VI. महाराष्ट्र - महा धर्मरक्षित
VII. योन(सरहद्द प्रांत) - महारक्षित
VIII. हिमवंत(हिमालय) - कश्यप, सहदेव
IX. सुवर्णभूमी(पेगु आणि मूलमेन)- सोन आणि उत्तर
X. सिंहलद्वीप (लंका) - महेंद्र (मुलगा)
अशोकाचा हा बौद्ध धर्मप्रसार अतिशय यशस्वी झाला होता हे व्हिन्सेंट स्मिथ, जनरल कनींगहॅम सारखे पाश्चात्य इतिहास संशोधकही मान्य करतात.
ते म्हणतात की सम्राट अशोकामुळेच बौद्ध धर्माचा विस्तार प्रत्यक्षित आणि अप्रत्यक्षितरीत्या भारत, सिलोन प्रमाणेच बर्मा, कंबोडिया, चायना, कोरिया, जपान, मंगोलिया, तिबेट सारख्या देशांत झाला.

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...