पोस्तसांभार :: ओंकार ताम्हनकर
अशोकाचे लेख
अशोकाचे लेख म्हणजे काय? तर अशोकाने आपल्या आयुष्यात अख्या हिंदुस्थानाभर जे काही कोरून ठेवले ते म्हणजे अशोकाचे लेख.
अशोकाच्या लेखांचे साधारण खालील वर्ग पडतात.
१. स्तंभलेख, लघुस्तंभलेख
२. गिरिलेख, लघु गिरिलेख
३. कलिंगलेख
(याखेरीज भाब्रूलेख, गुहालेख, स्मारकलेख असे प्रकार आढळतात.)
यातील बहुतांश लेखांची भाषा मागधी असून अलंकार विरहित सोपी आहे. बहुतेक सर्व लेख ब्राह्मी लिपीत लिहिले गेले आहेत.
१. स्तंभलेख, लघुस्तंभलेख
अशोकाचे
स्तंभलेख दिल्ली, तोपरा, मीरत, अलाहाबाद, लौरीया अराराज, लौरीया नंदनगड,
राम पुरा, तरई नेपाळ(२ लेख), निग्लीव, सारनाथ, कौशांबी, सांची इत्यादी
ठिकाणी आहेत. एकूण मिळालेल्या स्तंभलेखांची संख्या ७ आणि ४(लघु स्तंभलेख)
मिळून ११ आहेत. हुएन त्सांग नावाच्या ६व्या शतकातील चिनी प्रवाशाने अशोकाचे
१६ स्तंभलेख असल्याचा उल्लेख केला आहे. या सोळापैकी वर उल्लेख
केल्याप्रमाणे ११ लेखांचा शोध लागला आहे. त्यातील २ स्तंभच चांगल्या
स्थितीत आहेत.
अशोकाच्या
परिवारापैकी आजपर्यंत त्याच्या फक्त एका राणी(कारुवाकी) आणि एका
मुलाचा(तीवर) उल्लेख आढळतो अलाहाबाद येथील स्तंभावर आढळतो. त्यात उल्लेख
आहे की,
"दुसरी राणी व तीवरची माता कारुवकी हिच्या प्रित्यर्थ करण्यात आले आहे.."
अशोकाचे
हे स्तंभलेख एकंदर प्रजेला उद्देशून आहेत. त्यात राज्यशासनाची तत्वे,
धर्माचरण, आत्मपरीक्षण, हिंसेसंबंधांचे नियम, धर्मानुराग, धर्मप्रचारार्थ
योजना इत्यादी भिन्न भिन्न विषय आले आहेत.
- स्तंभांचे वैशिष्ट्य -
I.
प्रत्येक स्तंभावरील लेखांची सुरवात "देवानां प्रिय प्रियदर्शी राजा"
अशीच होते. इथे कुठेही अशोकाचे नाव येत नाही. त्यामुळे एका लेखावर अशोकाचे
नाव सापडेपर्यंत संशोधकांना वाटत होते की हे लेख 'पियदस्सी'(प्रियदर्शी)
नावाच्या कोणा राजाचे आहेत.
II. अशोकाने किती स्तंभ बांधले हे आज समजत नाही परंतु जेवढे मिळालेले स्तंभ आहेत ते एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर आहेत.
III.
स्तंभांची उंची १० ते १२ मीटर आहे. प्रत्येक स्तंभाचे वजन साधारण ३० टन
पासून ५० टन पर्यंत आढळते. स्तंभांचा आकार गोलाकार आहे. हा आकार खालून वर
निमुळता होत गेलेला आहे.
IV.
सगळ्या स्तंभांसाठी वापरलेला दगड एकाच प्रकारचा आहे. हा दगड
उत्तरप्रदेशातील मिर्झापुर जिल्ह्यातील चुनार येथील डोंगरातून आढळतो. या
भागात अनेक स्तंभ सापडले आहेत यावरून स्तंभ बनविण्याचा कारखाना इकडेच असू
शकतो असा आपण तर्क लावू शकतो.
V. स्तंभांची निर्मिती पूर्णपणे भारतीय कलाकारांनी केलेली आहे.
२. गिरीलेख, लघु गिरिलेख
गिरिलेख म्हणजे आदेश. पर्वतांवर कोरून ठेवलेले लहानमोठे शिलालेख.
आजपर्यंत
अशोकाच्या गिरिलेखांपैकी १४ लेखांचा शोध लागला आहे. या १४ पैकी बहुतेक
लेख अशोकाच्या कारकिर्दीच्या १३व्या आणि १४व्या वर्षातील आहेत. हे
सापडलेले सर्व गिरिलेख मगध पासून खूप दूर आहेत. या गिरिलेखांतून अशोकाचा
धर्म व त्याची राज्यपद्धती यांच्या संबंधीची बरीच माहिती मिळते.
प्रथम गिरिलेखाचा शोध शाहबाजगडी येथे लागला. हे ठिकाण आजच्या पाकिस्तानच्या पेशावर प्रांताच्या पुढे युसफझाई येथे आहे.
इतर गिरिलेख गिरनार, कालसी, मानसेरा इत्यादी ठिकाणी मिळाले आहेत.
- लघु गिरिलेख
अशोकाचे
लघु गिरिलेख रुपनाथ, मस्की, ब्रह्मगिरी(२) इत्यादी ठिकाणी आहेत. इकडे
मस्की येथील लघु गिरिलेखाचा उल्लेख करावासा वाटतो कारण वर म्हटल्याप्रमाणे
संशोधकांना अशोक हे नाव ज्या पहिल्या आणि एकुलत्या एक लेखात सापडले आहे तो
लेख म्हणजे हा मस्कीचा लघु गिरीलेख.
याची सुरवात "देवानां पियस असोकस..." अशी होते. यावरून सम्राटाचे नाव पियदस्सी नसून असोक(अशोक) आहे हे संशोधकांना कळले.
३. कलिंगलेख
कलिंग म्हणजे सध्याचे ओडिसा प्रांत. आधी म्हटल्या प्रमाणे अशोकाने कलिंगयुद्धानंतर तेथे दोन लेख उभारले.
पहिला
कलिंगलेख कलिंग मधील तोसली जवळील जौगड या ठिकाणी सापडला. या लेखाला
'प्रांतीय अधिकाऱ्यांसाठी लेख' असे आपण म्हणू शकतो कारण यात नागरिकांना
न्यायाने वागवावे, त्यांच्यावर जोरजुलूम करू नये याबाबत बजावले आहे.
दुसरा
लेख हा तोसली जवळील धौली येथे सापडला. हा लेख सुद्धा अधिकाऱ्यांनाच
उद्देशून आहे पण या लेखास 'सीमांत लेख' असे आपण म्हणू शकतो कारण या लेखात
सरहद्दीवरील लोकांशी अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे वर्तन ठेवावे हे सांगितले
आहे.
सारनाथ येथील अशोकस्तंभ
नेपाळ तरई येथील अशोकस्तंभ


No comments:
Post a Comment