Sunday, 3 April 2022

चक्रवर्ती सम्राट अशोक (भाग ४)

 



चक्रवर्ती सम्राट अशोक
पोस्तसांभार :: ओंकार ताम्हनकर
अशोकाचा कलिंगविजय आणि युद्धानंतरची परिस्थिती.
आधीच्या भागात पाहिल्या प्रमाणे इ.स. पूर्व २६९ साली बिंदूसाराच्या मृत्यूनंतर ४ वर्षांनी अशोकाचा विधिवत राज्याभिषेक झाला.
अशोकाच्या शासनकाळातील सुरवातीच्या वर्षात काय झाले याबाबत कोणताही ठोस पुरावा मिळत नाही.
. देवानां प्रियस्य अशोकस्य.
कलिंग युद्धापूर्वी ९ वर्षाच्या शासनकाळात विशेष अशी काही घटना घडलेली दिसत नाही.(९ वर्ष ही २६९ साली राज्याभिषेक झाल्यापासून. बिंदूसाराच्या मृत्यूपासून बघायची झाली तर १३ वर्ष.) फक्त या काळात कधीतरी अशोकाने स्वतःस 'देवानां पिय पियदस्सी राजा' ही पदवी लावून घेतली. याचा अर्थ देवांना प्रिय असलेल्या प्रियदर्शी राजा असा होतो.
अशोकाला समकालीन असणाऱ्या पतंजलीने या पदाचा अर्थ चिरंजीव, आयुष्यमान, श्रीमान असा सांगितला आहे.
. कलिंग देश
अशोक सम्राट बनल्यापासून त्याने केलेल्या साम्राज्यविस्ताराचा जो पहिला आणि शेवटचा उल्लेख मिळतो तो म्हणजे कलिंग युद्ध. (त्याने इतर काही भाग जोडलेले उल्लेख आहेत पण त्या दंतकथा आहेत.)
कलिंग राज्य हिंदुस्तानाच्या पूर्व भागात ओरिसाच्या जवळ होते. पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेस पूर्वघाट, दक्षिणेस गोदावरी नदी आणि उत्तरेस महानदी अशा त्याच्या सीमा होत्या.
कलिंगच दुसरं नाव 'स्त्रि-कलिंग' असेही होते. राज्याची राजधानी 'राजपूर'(बौद्ध ग्रंथानुसार सिंहपूर) होती. लोकांची धर्मनिष्ठा, शौर्य, शिल्प, वाणिज्य यांसाठी हा देश प्रसिद्ध होता.
. कलिंग युद्ध व भयंकर प्राणहानी.
चंद्रगुप्ताला, बिंदूसाराला जे जमले नाही असा कलिंग वर विजय अशोकाने मिळवून दाखवला. ही गोष्ट अशोकाच्या राज्यरोहणापासून १३ वर्षांनी म्हणजे इ. स. पूर्व २६१ रोजी घडली.
अशोकाने लिहून घेतलेल्या एका गिरिलेखात युद्धाचा असा उल्लेख आहे की,
"देवांचा प्रिय राजा याने राज्याभिषेकाला ८ वर्षे होऊन गेल्यावर कलिंग देश जिंकला. तेव्हा दीड लाख लोक कैद करण्यात आले, एक लक्ष लोकांना मारण्यात आले आणि या संख्येच्या अनेक पट लोक प्राणास मुकले."
यात 'लोकांना मारण्यात आले' म्हणजे युद्धादरम्यान मारण्यात आलेले सैनिक,लोकं.
'अनेक पट लोक प्राणास मुकले' म्हणजे कदाचित युद्धा नंतरच्या परिणामांना बळी पडलेले लोक. परिणाम म्हणजे दुष्काळ, महामारी, साथीचे रोग.
व्हिन्सेंट स्मिथ याबद्दल म्हणतो की,
"His(ashoka's) arms were successful and the kingdom(kalinga) was annexed to the empire."
म्हणजे, अशोक विजयी झाला आणि कलिंग देश मगध साम्राज्याला जोडला गेला.
. युद्धाचे परिणाम.
कलिंग येथील प्राणहानीमुळे अशोकाच्या मनावर विलक्षण परिमाण घडला व त्यामुळे त्याच्या चरित्राबरोबरच हिंदुस्तानाच्या इतिहासात परिवर्तन घडून आले.
या बाबतीत व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो,
"The horrors which must accompany war, even successful war, made a deep impression on the heart of the victorious monarch."
थोडक्यात, युध्दासोबतच झालेल्या प्रचंड हानिमुळे युद्ध जिंकूनही विजयी सम्राट अशोकाचे मन द्रवले.
कलिंग युद्धाचे ३ परिणाम झाले.
-- पहिला परिणाम - पुढील आयुष्यात अशोकाने युद्धाचे नाव काढले नाही.
-- दुसरा परिणाम - प्रजेला भोगावे लागणारे अत्याचार, जुलूम बंद व्हावेत यासाठी अशोकाने सक्तीचे हुकूम सोडले.
-- तिसरा परिणाम - अशोकाचा बौद्ध धर्म स्वीकार.
. दुसऱ्या परिणामाविषयी थोडी अजून माहिती.
आज कलिंग प्रदेशात जौगाडधौली या ठिकाणी अशोकाचे २ शिलालेख सापडले आहेत. कलिंग राज्य खालसा केल्यावर आपल्या हातून धोर अन्याय घडला अशी टोचणी अशोकाच्या मनात लागून राहिल्यामुळे यापुढेतरी आपल्या अंमलाखाली कलिंग प्रजेला सुख लागावे व अधिकारी वर्गाकडून त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत म्हणून त्याने कलिंग प्रांतासाठी जास्त सवलतीची अशी शासन पद्धती योजून तिच्या संबंधाचे हुकूमवजा दोन गिरिलेख जौगाड व धौली या ठिकाणी जाहीर केले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी त्याच प्रदेशातील पुरी तालुक्यातील तोसली या ठिकाणी त्याने राजप्रतिनिधी नेमला होता.
१.जौगाड येथील शिलालेख.
२.धौली येथील शिलालेख
(पुढील भागात त्याच्या बौद्ध धर्माचा स्वीकार आणि त्याने केलेल्या धर्मयात्रेबद्दल माहिती असेल.)

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...