Monday, 18 April 2022

मगध : प्राचीन भारतीय पहिले प्रबळ व बलाढ्य साम्राज्य राजा बिंबिसार

 मगध : प्राचीन भारतीय पहिले प्रबळ व बलाढ्य साम्राज्य 

राजा बिंबिसार (इ. स. पू. ५४३ ते ४९१) 

postsaambhr ::Dr Sitaram Ingole  



आधुनिक बिहारमधील पाटणा व गया परिसरात हे गणराज्य उदयास आले. 

वैदिक आर्याच्या काळात मगध प्रदेश वैदिक संस्कृतीच्या बाहेर होता. 

सोळा महाजनपदांत श्रेष्ठत्वाचा जो लढा झाला त्यात मगध विजयी झाले. मगधचे श्रेष्ठत्व व सार्वभौमत्व सर्व छोट्या-मोठ्या संतांनी मान्य केले होते. 

भारताच्या राजकीय इतिहासातील पहिले प्रबळ साम्राज्य म्हणून मगध पुढे आले. 

पुराणग्रंथ, जैन व बौद्ध ग्रंथातून मगध महाजनपदांचा इतिहास व मगधवर राज्य केलेल्या राजवंशांच्या वंशावळी दिल्या आहेत.

 जैन ग्रंथात मगधला पवित्र जनपद मानले आहे. मगधामध्ये जैन ज्ञान व जैनाचार यांचे रक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असे महावीर वर्धमानने म्हटले होते. 

मगधवर नंद वंशाचे राज्य येण्यापर्वी ८ राजवंश सत्तेवर आले होते असे पुराणात म्हटले आहे. 

त्यापैकी इतिहासाला ज्ञात वंश खालीलप्रमाणे आहेत.

१) ब्रहद्रथ वंश

२) हर्षक वंश 

३) शिशुनाग वंश (इ. स. पू. ५४३ ते ४२३

४) नंद वंश ( इ. स. पू. ४२३ ते ३२३)

५) मौर्य वंश (इ. स. पू. ३२३ ते इ. स. पू. १८७) श.


बलाढ्य राजकीय शक्ती म्हणून मगधचा उदय :

महाजनपदातील सत्तासंघर्षात यशस्वी होऊन मगधचे राज्य एक बलाढ्य राजकीय शक्ती म्हणून पुढे आले. 

त्याची कारणमीमांसा,

१)  मगधची भूमी सुपीक असल्याने अन्नधान्याचा तुटवडा भासला नाही. 

२) आर्थिक वैभवामुळे लोकसंख्या वाढली. त्यामुळे महाजनपदाच्या सत्तासंघर्षात आवश्यक असलेले सैनिक मगधला मिळू शकले. 

(3) मगध राज्यात लोखंडाचे साठे प्रचंड असल्याचे शस्त्रास्त्रांची अडचण भासली नाही. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी तेथे लोखंड उपलब्ध होते. 

४) मगधचे व्यापारावर वर्चस्व प्रस्थापित झाले होते. 

५) मगधला ब्रहद्रथ हर्षक, शिशुनाग, नंद व मौर्य या वंशांतील कर्तबगार राजांचे नेतृत्व लाभले म्हणूनच मगध एक बलाढ्य राजकीय सत्ता म्हणून पुढे आले.


१) ब्रहद्रथ वंश : 

कुरू वंशाचा राजा वसूने मगध राज्य जिंकून आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य ५ पुत्रांत विभागले गेले. 

पाच पुत्रांपैकी एक पुत्र ब्रहद्रथ याने मगधला स्वतंत्र राज्य स्थापन केले. तोच मगधचा संस्थापक मानला जातो.

 त्याच्याच नावावरून त्याच्या वंशाला 'ब्रहद्रथ वंश' असे नाव पडले. याच वंशात पुढे महाभारत काळात जरासंध हा शक्तिशाली सम्राट होऊन गेला. जरासंध हा एका युद्धात मारला गेला. त्यानंतर पुलिक वंश मगधवर सत्तेवर आला.


२) हर्षक वंश:

पुलिक वंशाचा राजा बालक हा दुबळा असल्याने त्याची हत्या भहिय या त्याच्या महत्त्वाकांक्षी सम्राटाने केली व आपला पुत्र बिंबिसार याला मगधच्या गादीवर बसवले.


राजा बिंबिसार (इ. स. पू. ५४३ ते ४९१) : 

राजा बिंबिसारच्या वडिलांचे नाव विविध ग्रंथांत वेगवेगळे दिले आहे. पुराणात त्याच्या वडिलांचे नाव हेमजित क्षेत्रोज होते असे पुराणात म्हटले आहे तर तिबेटी ग्रंथात 'महापद्म' असे नाव दिले आहे. 

बिंबिसार हा हर्षक वंशातील पहिला शक्तिशाली सम्राट होता. 

तो हर्षक वंशातील होता की शिशुनाग वंशातील होता हा इतिहासकारांतील वाद आहे. परंतु तो शिशुनाग वंशापूर्वीच होऊन गेल्यामुळे तो हर्षक वंशातील होता असे समजले जाते.


१) बिंबीसारचे वैवाहिक संबंध : 

बिंबीसारने कोसल, वैशाली, भद्र वगैरे देशांच्या राजकन्यांशी विवाह करून त्या सत्तांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले.

 'महावंश' या बौद्ध ग्रंथात त्याने ५०० विवाह केले अशी नोंद आहे. अर्थात, त्यात अतिशयोक्ती आहे. 

तरीही अनेक राजकुमारीशी विवाह करून साम्राज्यविस्तार करणे हे त्याच्या परराष्ट्र धोरणाचे सूत्र असावे. 

कोसलची कोसलदेवी, लिच्छवीची चेलना, मद्रदेशाची क्षेमा या राजकन्यांशी त्याचे झालेले विवाह विशेष महत्त्वाचे होते.

 कोसलचा राजा प्रसेनजित याने आपली बहीण कोसलदेवी हिला खर्चासाठी म्हणून काशी नगराचे उत्पन्न बिंबिसारला दिले होते. विदेहच्या राजकन्येशीही त्याचा विवाह झाला होता.


२) अंग राज्यावर ताबा: 

बिंबिसारने 'अंग' या राज्याचा राजा ब्रह्मदत्तचा पराभव करून अंग साम्राज्याचा काही भाग व अंगची राजधानी, हे शहर जिंकले व मगध साम्राज्यात समाविष्ट केले.

 चंपा हे त्या काळातील अत्यंत प्रसिद्ध व्यापारी केंद्र होते. अंग राज्याची प्राप्ती व काशीची प्राप्ती यामुळे मगधच्या संपूर्ण भारतावरील वर्चस्वाचा पाया घातला गेला असे मत डॉ. आर. के. मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.


३) बिंबिसार - जैन व बौद्ध धर्म: 

जैन व बौद्ध धर्माच्या साहित्यानुसार तो दोन्ही धर्माचा पुरस्कर्ता होता असे दिसते.

 उत्तराध्ययनसूत्रात बिंबिसार व महावीर वर्धमान या दोघांच्या भेटीचा उल्लेख केलेला आहे. बिंबीसारची एक पत्नी चेलना ही जैन धर्मअनुयायी होती व तिच्याच प्रभावामुळे तो जैन धर्माकडे आकर्षिला गेला. 

त्याने आपली पत्नी चेलनाबरोबर महावीराची पूजा केली व जैन धर्म स्वीकारला, अशी नोंद तत्कालीन जैन ग्रंथात आहे.

बौद्ध साहित्यात बिंबीसार हा बौद्ध होता असे म्हटले आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धाशी त्याचे स्नेहाचे संबंध होते. 

भगवान बुद्धाच्या मधुर वाणीचा व संन्याशी जीवनाचा प्रभाव बिंबिसारवर पडला होता. 

बुद्धाच्या निर्वाणप्राप्तीच्या अगोदर ८ वर्षे व निर्वाणप्राप्तीनंतर पुन्हा दोघांची भेट झाल्याची नोंद तत्कालीन बौद्ध साहित्यात आहे. 

बिंबिसारने बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याने आपला वैद्यक जीवक यास गौतम बुद्धाच्या वैद्यकीय चिकित्सेसाठी पाठवले होते. 

बिंबिसारने सर्व बौद्ध भिक्षूंना मगधच्या राज्यात गंगा पार करण्यासाठीचा कर (नौकाचालकाचे पैसे) माफ केला होता.

 बौद्ध धर्माचे उत्सव त्याने साजरे केले. रोगग्रस्त लोकांना भिक्षू होण्यास त्याने मज्जाव केला होता. 

बुद्धाच्या पायाच्या नखाच्या तुकड्यावर त्याने एक स्तूप बनवला होता. 

त्या स्तुपाची पूजा राजघराण्यांतील स्त्रिया करीत असत. बुद्ध जिवंत असतानाच बिंबिसारने बौद्ध धर्मप्रसारास चांगलीच मदत केली होती. 


४) बिंबिसारची प्रशासनव्यवस्था :

मगध राज्याला बिंबिसारने शक्तिशाली केले. बिंबिसारच्या काळात मगध साम्राज्यात ८०,००० गावे होती. 

बिंबिसारने आपल्या राज्याचे प्रांतात विभाजन करून प्रत्येक विभागाचा कारभार हा राजपुत्रांकडे सोपवला होता.

 राज्यकारभाराच्या सोयीसाठी विविध खाती होती. प्रत्येक खात्यावर स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जात.

 गावाचा कारभार हा ग्रामसमितीमार्फत चाले. न्यायादानासाठी स्वतंत्र न्यायादानाची व्यवस्था केली होती. गुन्हेगारास कठोर शासन केले जाई. अवयव विच्छेदन, जाहीर फटके मारणे, दंड, तुरुंगवास वगैरे स्वरूपाच्या शिक्षा दिल्या जात. 

बिंबीसारचा सर्व अधिकाऱ्यांवर वचक होता. सभाजक, व्यावहारिक आणि सेनानायक हे तीन प्रमुख अधिकारी होते.

 बिंबिसारने 'गिरीव्रज' हे नैसर्गिकृष्ट्या सुरक्षित स्थळ निवडून त्यास राजधानीचा दर्जा दिला. पण हे स्थळ गैरसोयीचे वाटल्यामुळे त्याने राजगृह येथे राजधानी हलविली. गौतम बुद्धाने नंतर राजगृहाला भेट दिली होती.


५) बिंबिसारचा अस्त : 

बिंबिसारचा अस्त किंवा मृत्यू याबद्दल निश्चित पुरावा उपलब्ध नाही. 

इ. स. पू. ४९३ मध्ये बिंबीसारचा पुत्र अजातशत्रू याने त्यास ठार केले असे बौद्ध मत आहे तर पुत्रांनी कैदत टाकल्याने जीवन असह्य झाल्याने त्याने आत्महत्या केली असे जैन मत आहे. 

बिंबिसारने ५० वर्षे राज्य केले होते. त्याच्या वृद्धापकाळात त्याच्या पुत्रात गादीसाठी वारसायुद्धे सुरू झाली. 

प्रत्येकाला त्यांच्या आजोळचा (कोसल, वैशाली, मद्र) पाठिंबा होता. 

त्या सर्व राजपुत्रांत अजातशत्रू हा पराक्रमी असल्याने तो वारसायुद्धात विजयी झाला.

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...