Monday, 18 April 2022

अश्मयुग भाग १२ अलंकरण, कला

 

अश्मयुग

भाग १२ 

पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886

अलंकरण, कला इ. : उपजीविका कष्टसाध्य आणि एकूण जीवन अस्थिर असले, तरी मानवाची उपजत सौंदर्यदृष्टी व अभिरुची निरनिराळ्या प्रकाराने व्यक्त झालेली दिसते. त्यांतला सगळ्यांत महत्त्वाचा प्रकार म्हणजे अलंकरण. आपले शरीर सुशोभित करण्याची तीव्र इच्छा मानवाला सतत आहे. यासाठी चित्रविचित्र रंगांचे विलेपन ही सगळ्यात आरंभीची पायरी होय. अश्मयुगातील काही सांगाडेही गेरूने रंगविलेले आहेत. त्यांवरून अश्मयुगीन माणूस अंगाला रंग लावीत असावा, असा कयास करता येतो. दुसरा प्रकार म्हणजे, प्राण्यांची हाडे, दात, नखे किंवा वाळक्या बिया यांना भोके पाडून त्यांच्या माळा करून गळ्यात घालणे हा होता. आंतराश्मयुगीन अवशेषांत असे ताइतासारखे वापरलेले दात व हाडे खूप सापडतात. तिसरा प्रकार म्हणजे रंगीत वा चमकदार दगड घेऊन त्यांचे मणी, लोलक आणि ताईत तयार करणे व त्यांच्या माळा अंगाभोवती गुंडाळणे हा होता. चंद्रकोरीच्या, कुऱ्हाडीच्या किंवा पक्ष्याच्या आकाराचे ताईत सापडतात. पण बहुतेक ताईत हे तोड्याच्याच स्वरूपाचे समजावयास हवेत. नवाश्मयुगात दगडी मणी आणि ताईत यांचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. अलंकारांकडे इतके लक्ष होते, की वस्त्रप्रावरणाकडे विशेष लक्ष देण्याची अश्मयुगीन माणसाला जरूरच भासली नसावी, इतका पुरावा मिळतो. अश्मयुगातील वस्त्रांचे प्रत्येक्ष अवशेष उपलब्ध नाहीत. माणसाचे पहिले चित्र उत्तरपुराणाश्मयुगातीलच पाहावयास मिळते. या चित्रणातून तो सहसा वस्रहीनच दिसतो. क्वचित काही मूर्तींवर (पूर्व यूरोप) केसाळ असे कपडे दाखविले आहेत. त्यावरून अतिशीत प्रदेशात जनावरांची कातडी लपेटून घेण्यात येत, पण इतरत्र वस्त्रांची जरूर भासत नव्हती. ही वस्त्रे शिवण्यासाठी वा ती बांधून घेण्यासाठी उपयोगी असे भोके पाडण्याचे दगडी टोचे व हाडांची दाभणे अवशेषांत मिळतात. जनावरांच्या केसांचा (लोकरीचा) कपड्यासाठी विणून उपयोग करीत किंवा काय, ते सांगता येत नाही.

गवताचे व अंबाडीसारख्या वनस्पतीचे धागे एकत्र विणून दोर तयार करीत. या दोरांचा उपयोग धन्युष्यांसाठी किंवा मासेमारीची जाळी विवण्यासाठी होत असे. सूत कातण्यास आरंभ नवाश्मयुगातच झाला. अवशेषांत चातीची, मातीची वा दगडी चाके मिळाली आहेत. तसेच मातीवर उमटलेले कापडाचे ठसे पॅलेस्टाइन व ईजिप्त येथील काही अवशेषांत मिळाले आहेत. इतरत्र अद्यापही चामड्याचेच कपडे वापरात असावेत. या अवशेषांतील मृत्पात्रांवर घागरा व जाकीट किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे काढलेली आढळतात. त्यांना गुंड्याही लावल्या आहेत. विणकाम व शिवण यांविषयीची अधिक माहिती नाही.

या प्रदीर्घ काळातील चित्रकला व मूर्तिकला यांचे अनेक नमुने आज उपलब्ध आहेत. यूरोप, आफ्रिका व आशिया हा तिन्ही खंडांत ते सापडतात. यांपैकी यूरोपात व आफ्रिकेत पूर्वपुराणाश्मयुगापासून थेट नवाश्मयुगापर्यंतच्या कलाकृती आहेत, तर आशियात सामान्यपणे आंतराश्मयुगीन कलाच दिसते. खुद्द नवाश्मयुगातील कलाकृतींचे प्रकार व त्यांची परंपरा पूर्णत्वे भिन्न आहे. पूर्वपुराणाश्मयुगातील चित्रकलेचे सर्वोत्तम नमुने फ्रान्स व स्पेन देशांतील गुहांतून सापडले आहेत. ही चित्रे गुहांत खूपच खोलवर, अगदी आतल्या भागांत काढलेली आहेत. उत्तरपुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतील चित्रे जवळपास उघड्यावर असणाऱ्या दरडी व प्रस्तर यांवरच काढली आहेत. चित्रांच्या बाह्याकृती टोकदार दगडाने कोरून, पृष्ठभागावर उमटविलेल्या आहेत. यानंतर या आकृतींवर कुंचले किंवा फवारे यांनी रंग भरलेले आहेत. कुंचले बांबूच्या पट्ट्या किंवा काठ्यांची टोके ठेचून तयार कलेले असावेत. बहुतेक रंग नैसर्गिक रीत्या मिळतात तसेच वापरलेले आहेत. त्यांत मिश्रणाने बदल करण्याचा यत्न केलेला दिसत नाही. रंग देताना वर्ण्यविषयांनी अनुरूप असे स्वाभाविक रंग दिलेले आहेत. कित्येक वेळा रंग देण्याआधी खोदकाम करून आकृतीला उठाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वचित माती थापून त्यातून उठावाची चित्रे केली आहेत. भोवताली वावरणारे गवे, रानरेडे, हरिणे, घोडे अशांसारखे प्राणी, प्राण्यांच्या शिकारींचे प्रसंग, नाच करणारे स्त्रीपुरुष, धार्मिक विधी करणारा पुरोहित हे प्रमुख चित्रविषय होत. स्पेनमधील काही गुहांतून वर्तुळे, चौकटी व तजन्य भौमितिक आकृत्या रेखाटल्या आहेत. उत्तरपुराणाश्मयुग आणि आंतराश्मयुग यांमध्ये रंगीत चित्रांऐवजी दगडाचा पृष्ठभाग खरवडून किंवा टाकी लावण्यासारखा ठोकून बाह्यकृती उमटविण्यात येत असे. अशा चित्रांना बहुधा रंग दिलेला नाही. मूर्तिकलेचे नमुने उत्तरपुराणाश्मयुगीनच आहेत. त्यांत हाडे, शिंगे व दगड यांवरील कोरीव कामाचा समावेश करता येतो. भालाफेकी काठ्या, पुरोहिताच्या हातातील दंड, यांवर अत्यंत वास्तवपूर्ण उत्थित शिल्पे खोदली आहेत. जनावरांच्या डोक्याच्या आकाराचे हाडांचे काही ताईतही मिळाले आहेत. दगडी कामांत स्त्रीमूर्ती मुख्य असून त्या अर्धाकृतीच्या व पूर्णाकृतीच्या स्वरूपांत आहेत. स्थूल शरीराच्या या मूर्तीचे नितंब, स्तन व जघनप्रदेश विस्तृत दाखविले आहेत. स्त्रीच्या जननकार्याकडे लक्ष वेधविण्याचा कलाकाराचा प्रमुख हेतू असावा. म्हणून यांना सामान्यपणे ‘स्त्रीमूर्ती’ म्हणत असले, तरी ‘मातृकामूर्ती’ म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. नवाश्मयुगातील अवशेषांत चित्रकलेचे नमुने नाहीत. या कालखंडाच्या उत्तरार्धात मृत्पात्रांवर काढण्यात आलेल्या नक्षीत वेलपत्त्या, पशुपक्षी, भौमितिक आकृत्या अशा विविध आकृत्या असल्या, तरी या कामाचा चित्रकलेत समावेश करणे योग्य ठरणार नाही. मातीच्या भाजून केलेल्या आणि हाडाच्या मूर्ती, यांतील प्राणिमूर्ती व स्त्रीमूर्ती विशेष चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. यांतील स्त्रीमूर्ती मातृका-परंपरेतीलच आहेत. पूर्वीप्रमाणे या मूर्तीचे डोकेही केवळ एका गोळ्याने दाखवितात आणि नाकडोळेही कोरलेले नसतात.

पूर्वपुराणाश्मयुगातील कलाकृती म्हणजे आपल्या भोवताली दिसणार्‍या वस्तूंची केवळ नक्कल व प्रतिकृती नव्हे त्यांत निरनिराळे प्रसंग व परिस्थिती कल्पिली आहे. माणसाच्या प्रतिभाविलासाचा हा सर्वप्राचीन आविष्कार होय. विशेषत: गुहेतील चित्रकाम या दृष्टीने अत्यंत लक्षणीय समजावे लागते. मानवी बुद्धी व मन यांची एक वेगळीच झेप त्यांतून प्रतीत होते. परंतु या सगळ्या कलाकृती सौंदर्यनिर्मितीच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या नाहीत हे निश्चित. त्यांत काही धार्मिक समजुती व कल्पना अंतर्भूत असाव्यात. किंबहुना पुराणाश्मयुगकालीन धार्मिक कल्पना आणि समजुती यांच्या माहितीचे मुख्य साधन म्हणजेच तत्कालीन चित्रकला होय [→प्रागैतिहासिक कला].





No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...