Monday, 18 April 2022

अश्मयुग भाग १४ मध्याश्मयुगाचा काळ

 

अश्मयुग

भाग १४

पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886

मध्याश्मयुगाचा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता कार्बन कालनिर्णयानुसार सिद्ध झाले आहे. उत्तराश्मयुगाचा आरंभ नूतनतम काळाच्या आरंभी (इ.स.पू. १०,०००) झाला. काही भागांत तो इ.स.पू. ७,००० इतका नजीकचाही असू शकेल. मध्य व उत्तर भारताच्या काही भागांत असणारे घनदाट जंगलांचे प्रदेश सोडल्यास, इतरत्र मानवाची वस्ती उघड्यावर नदीकाठाने होती. पण या दोन जंगलांच्या प्रदेशांत मात्र मानवी वस्ती प्रस्तरालये व गुहा यांतच होती. या प्रस्तरालयांतील चित्रकामही उत्तराश्मयुगीनच असण्याचा संभव आहे. या युगातील आयुधे, लघुअश्मास्त्रे याच सदरात जमा होतात व यांत मुख्यत्वे गारेच्या दगडाची किंचित लांबटशी पाती आहेत. त्यांपासून चाकूची पाती, चंद्रकोरी, टोचे ही आयुधे तयार करण्यात येत. ती आयुधे हाडे व काठ्या यांजबरोबर वापरण्यात येणारी, म्हणजे संयुक्त आयुधे होत. ⇨ लांघणज या गुजरातमधील ठिकाणाखेरीज अन्यत्र उत्तराश्मयुगीन स्थायिक वसाहतींचे अवशेष उपलब्ध नाहीत. शिकार, मच्छीमारी व प्राथमिक स्वरूपाची शेती हीच या काळातील उपजीविकेची मुख्य साधने होत. मृत्पात्रांचा वापरही सुरू झाला असावा. लांघणज याच ठिकाणी काही मानवी सांगाडे सापडले असून ते मिश्र वंशाचे आहेत. हातपाय पोटाशी ठेवून हे सांगाडे थडग्यांत पुरण्यात आले होते. या भागात पाणघोडे, अस्वले, हरणे, सांबरे, रानगाई असे प्राणी वावरत असत.

भारतातील नवाश्मयुग आणि ताम्रपाषाणयुग ही दोन्ही साधारण समकालीनच आहेत. नवाश्मयुगीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवशेषांतही तांब्याच्या वस्तू सापडतात. ताम्रपाषाणयुगीन समाजही नवाश्मयुगीनांप्रमाणेच शेतकी, पशुपालन यांवरच जगत असे. म्हणून या दोन स्वतंत्र अवस्था समजाव्यात किंवा कसे, यावर तज्ञांत एकमत नाही. तथापि घासून गुळगुळीत केलेल्या दगडी कुऱ्हाडी वा छिन्न्या यांसारखे आयुधप्रकार आणि इतर ठिकाणच्या नवाश्मयुगीनांशी असणारी साम्ये ध्यानात घेऊनच काही समाजांना नवाश्मयुगीन तर काहींना ताम्रपाषाणयुगीन संबोधण्यात येते. भारतातील ताम्रपाषाणयुगाचे तीन पृथक भाग पडतात. एक उत्तर व वायव्य भारतातील, दुसरा पूर्व भारतातील व तिसरा दक्षिण भारतातील. या सर्व संस्कृतीचा काळ इ.स.पू. दुसरे सहस्रक व त्याच्या थोडा पुढे मागे असा आहे. याला अपवाद फक्त बलुचिस्तानच्या सरहद्दीनजीकच्या ⇨कुल्ली, झॉब या संस्कृतींचा असून त्या संस्कृती इ.स.पू. चौथ्या सहस्रकातील आहेत. परंतु भारतातील इतर समाजांशी त्यांचा सलग संबंध अद्याप प्रस्थापित झालेला नसल्याने व पश्चिम आशियातील नवाश्मयुगीन संस्कृतींशी त्यांचा जास्त निकटचा संबंध स्पष्टपणे दिसत असल्याने, त्यांना त्या क्षेत्रातील संस्कृतीच्या शाखा समजणे अधिक उचित ठरेल.

उत्तर भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नवाश्मयुगीन संस्कृतीचा आढळ प्रामुख्याने काश्मीरमध्ये झेलमच्या खोऱ्यात झाला आहे. बूर्झाहोम येथील उत्खननांत गवसलेल्या अवशेषांवरून या समाजाच्या जीवनविकासाचे दोन टप्पे दिसतात. पहिल्यात, जमिनीत मोठाले खड्डे करून त्यांत वस्ती करण्यात येई. हे खड्डे सामान्यपणे तीन मी. व्यासाचे असून त्यांची खोली दीड ते चार मी. होती. यावर फांद्या व गवत यांचे छप्पर असावे. घासून धार लावलेली दगडी हत्यारे, हाडांचे टोचे, दाभण, राप्या व हातघडणीची मृत्पात्रे ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये होत. दुसऱ्या टप्प्यात, कच्च्या विटांची घरे बांधण्यात येऊ लागली. मृत्पात्रे घडविण्यासाठी चाकाचा वापर सुरू झाला. क्वचित तांब्याची हत्यारे सापडतात पण धातूच्या उपयोगाचे ज्ञान अगदी प्राथमिक स्वरूपाचे असावे. बी पेरण्याकरिता जमिनीत खळगे करण्यासाठी अणकुचीदार काठ्या वापरीत व त्या जोराने जमिनीत घुसाव्यात म्हणून त्यांभोवती दगडी कडी बसवीत. अशी वजने व दगडाचे विळ्यासारखे हत्यार सापडले आहे. यांवरून शेती करण्यात येई असा निष्कर्ष निघत असला, तरी हाडाच्या हत्यारांचे जे विविध प्रकार दिसतात त्यांवरून शिकारीलाच प्राधान्य असावे, असे दिसते. या काळातील काही थडग्यांत माणसांबरोबर कुत्रीही गाडलेली दिसतात. थडग्यातील सांगाड्यांवरून तेथील माणसांच्या वंशांची कल्पना येत नाही. जमिनीत खड्डे करून राहण्याची पद्धत व दगडी विळे यांवरून उत्तर भारतातील ही संस्कृती तत्कालीन चिनी नवाश्मयुगीन संस्कृतीशी संबद्ध असावी, असे मानता येते.

दुसरे क्षेत्र म्हणजे, ओरिसा, बिहार, आसाम या क्षेत्रांतील नवाश्मयुगीन संस्कृतीचे पूर्वक्षेत्र. गोल बुडाच्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या व मुख्यत: चौकोनी खांद्यांच्या दगडी कुऱ्हाडी ही येथे सापडणारी वैशिष्ट्यपूर्ण आयुधे होत. या क्षेत्रातील निरनिराळ्या ठिकाणची मृत्पात्रे भिन्न प्रकारांची आहेत. येथे झालेले संशोधन पूर्ण कल्पना देण्यास पुरेसे नसले, तरी त्यातील विशिष्ट आयुधांवरून या संस्कृतीचा अन्यत्र जोडता येतो.

तिसरे क्षेत्र दक्षिण भारतातील नवाश्मयुगीन संस्कृतीचे. हे क्षेत्र उत्तर कर्नाटक व वायव्य आंध्र प्रदेश यांचे मिळून होणारे असून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनने करण्यात आली आहेत. त्यांपैकी ⇨ ब्रह्मगिरी, पिकलीहाल, टेक्कलकोटा ही महत्त्वाची होत. तेथे गोल वा चौकोनी आकाराच्या कुडाच्या घरांतून मानवी वस्ती होती. क्वचित वस्तीसाठी उंच अशा टेकड्यांवरील सपाट भागांचा उपयोग केलेला दिसतो. पहिल्या कालखंडात हातघडणीची राखी मृत्पात्रे वापरीत. दुसऱ्या कालखंडातील मृत्पात्रे तांबूस काळसर रंगाची आहेत. कोठेकोठे रंगीत नक्षीकाम केलेली मृत्पात्रेही या कालखंडात वापरलेली दिसतात. घासून गुळगुळीत केलेल्या कुर्‍हाडी, छिन्न्या यांसारख्या हत्यारांबरोबर दगडी पात्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असे. दफनाची पद्धती अस्तित्वात असून मृताशेजारी त्याची आयुधे व भांडीही ठेवलेली आढळतात. या नवाश्मयुगीन संस्कृतीचा संबंध इतर भागांतील तत्सम संस्कृतींशी जोडण्याइतका प्रत्यक्ष पुरावा हाती नसला, तरी काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंवरून, वर उल्लेखिलेल्या वायव्य भारतातील संस्कृतीप्रमाणेच ह्याचाही संबंध पश्चिम आशियातील नवाश्मयुगीनांशी असावा असे दिसते. तथापि निश्चित संबंध जोडता आलेले नाहीत, हे मान्यच करावयास हवे. वरील तिन्ही क्षेत्रांत पशुपालन व शेतकी हीच उपजीवविकेची प्रमुख साधने होती.










संदर्भ : 1. Childe, Gordon, New Light on the Most Ancient East, London, 1958. 2. Clark, Grahame, World Prehistory–An Outline, Cambridge, 1961. 3. Clark,Grahame Piggott, Stuart, Prehistoric Societies, London, 1965. 4. Day, Michael M. Guide to Fossil Man, London, 1965. 5. Jacquetta, Hawkes Wooly, Leonard, Prehistory and the Beginnings of Civilization History of Mankind, Vol.1, London, 1963. 6. Leakey, L. S. B. Adam’s Ancestors, London, 1960. 7. Mate, M. S. Misra, V. N.Indian Prehistory, Poona, 1964, 1965. 8.Piggott, Stuart, Ed. The Dawn of Civilization, London, 1961. 9. Sankalia, H. D. Prehistory and Protohistory of India and Pakistan, Bambay, 1963. 10. Sankalia, H. D. Stone Age Tools, Poona, 1964. 11. Semenov, S. A. Trans. Thompson, M. W. Prehistoric Technology, London, 1964. 12. Singer, C.History of Technology, Vol. I, Oxford, 1954. 13. Stern Philip Van Doren, Prehistoric Europe, London, 1970.

देव, शां. भा. ढवळीकर, म. के.

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...