Saturday, 19 March 2022

श्रीराम मंदिर नगरदेवळे (भाग-1)

 

🚩













श्रीराम मंदिर नगरदेवळे (भाग-1) 🚩
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ असलेले नगरदेवळे ! तीस हजार लोकवस्तीचे गाव . आजूबाजूला बावन्न खेड्यांची वस्ती. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. जमीन सुपीक व पाण्याची मुबलकता त्यामुळे फळबागांची रेलचेल . सगळा महाराष्ट्र कोरडा झाला तरी येथील शेती पाण्यावाचून करपली असे कधीच झाले नाही. कितीही नैसर्गिक आपत्ती आली तरी त्यातून येथील शेती सुखरूप बचावली. शेतीने गावाला कधीच उपाशी राहू दिले नाही.
व्यापारी बाजारपेठ असल्याने दुय्यम व्यवसाय म्हणून लोक व्यापाराकडे वळले. शेतीपूरक व्यापार हाच मुख्य उद्योग ! गावाला धार्मिक परंपरा आहे तशी ऐतिहासिक परंपरा पण आहे .सरदार केरोजी पवार यांना छत्रपती राजाराम महाराज यांचे कडून "सेनाबारासहस्री " हा किताब व नगरदेवळे हे गाव जहागीरी म्हणून मिळाले तेव्हापासून गावाचे लष्करी महत्त्व वाढू लागले.
भडगाव परगण्यातील नगरदेवळे सह 16 गावांची जहागिरी त्यांना मिळाली. त्यांनी गावाच्या मध्यभागी गढीवजा वाडा बांधून घेतला. त्याच्या चार दिशांना भक्कम बुरुज बांधून कोट वळवला . तसेच गावाच्या बाहेर दिशांना नगरकोट बांधून गणपती दरवाजा, भडगाव दरवाजा व गाळण दरवाजा असे तीन दरवाजे यांनी गाव बंदिस्त केले.
वाड्याच्या आग्नेय दिशेला गाळण दरवाज्याजवळ श्रीमंत सरदार पवार महाराज यांनी श्रीराम मंदिराचे बांधकाम केले. या मंदिराचे बांधकाम नेमके केव्हा झाले हे निश्चित माहित नसले तरी मंदिराची स्थापत्यशैली पाहता सतराशे पन्नासच्या आसपास मंदिराचा कालखंड असावा असे वाटते. कारण पुण्यातील भवानी पेठेतील छत्रपती शाहू उर्फ जंगली महाराज यांचे समाधी मंदिर याच प्रकारचे आहे.
श्रीराम मंदिर आजही श्रीमंत सरदार पवार यांच्या खाजगीतील आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत सरदार शिवराव पवार उर्फ " मोठे महाराज " यांनी इ. सन 1935 च्या आसपास केला. या मंदिराच्या बाह्य कमानी पक्क्या विटा व चुन्यात बांधलेल्या आहेत. त्यावर मराठवाडा शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. मंदिरात प्रवेश करण्यासाठी चार फूट उंचीचा दरवाजा आहे. त्यामुळे आत वाकून जावे लागते. आत प्रवेश केल्यावर पुन्हा चार पायर्या उतरून मुख्य मंदिराकडे जावे लागायचे.
मुख्य मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पक्क्या दगडात मचवलेला होता. प्रदक्षिणा मार्ग बराच विस्तृत असून तिथे छोटेखानी पटांगण आहे. पंचवीस तीस लोक सहज बसतील अशी व्यवस्था आहे. कदाचित त्याकाळी छोटेखानी प्रवचन, भजन, कीर्तन हे राजघराण्यातील स्त्रियांसाठी व महिलांसाठी येथे होत असावे. मंदिरात प्रवेश करताना पुन्हा चार पायर्या वर चढून जावे लागत असे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गापासून मंदिराची उंची 30 फुटांपेक्षा अधिक आहे. मंदिर शिखरापर्यंतचे काम दगडी फरसबंदीत व शिखरावरील काम हे विटा व चुना यात केलेले आहे. शिखर अष्टकोनी आहे त्यावर कमळ पाकळ्यांची रचना केली असून सुंदर नक्षीकाम केलेले आहे. आठही दिशांना देवकोष्ठ रचना असुन गोलाकार कळस डोळ्यात भरून दिसतो.
मंदिराचे नाव श्री राम मंदिर असले तरी मंदिरात प्रवेश केल्यावर समोर विष्णू लक्ष्मी मूर्ती लक्ष वेधून घेते. गदा, पुष्प, शंख, चक्र धारण केलेली ही विष्णू मूर्ती विष्णू ध्रती या नावाने ओळखली जाते. विष्णू सोबत जी शक्ती असते तिला विष्णू सोबतच विशिष्ट नावाने ओळखले जाते. भारतीय मूर्तीशास्त्रात विष्णुमूर्ती 24 प्रकारच्या आहेत. विष्णूच्या हातातील आयुधांचा क्रम जसा असेल त्याप्रमाणे त्या मूर्तीचे व त्यासोबतच या शक्तीचे नामाभिधान असते. अशी माहिती प्रसिद्ध मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो.ब.देगलूरकर यांच्या पुस्तकात मिळते.
विष्णुमूर्ती पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडात कोरली आहे. पायथ्याशी जय विजय हात जोडून उभे आहेत. हनुमानाची दीड फूट उंचीची मूर्ती लक्ष्मीच्या पायाजवळ आहे. या मूर्तीवर रंगकाम नंतरच्या काळात केले असावे, कारण ऑइलपेंटचा रंग ठळकपणे जाणवतो. विष्णू व लक्ष्मी यांच्या नेत्रांचा आकार कमलनयन प्रकारातील आहे. मंदिरात अनेक प्रकारच्या मूर्ती नंतरच्या काळात आणून ठेवल्याचे जाणवते.
डाव्या बाजूला उजव्या सोंडेची गणेशमूर्ती लक्ष वेधून घेते . गणेशाच्या दोन्ही बाजूंना रिद्धी- सिद्धी गणरायावर चवर्या ढाळत आहेत. पायथ्याशी मूषक मोदक घेऊन गणरायाकडे पाहतो आहे. गणराय कमल पुष्पावर पद्मासनात विराजमानअसून चतुर्भुज आहे. पैकी डाव्या हातात पाश व पुष्प तर उजव्या हातात परशू व मोदक पात्र आहे. खांद्यावर सर्पराज जानवे बनून पहारा देत आहे. मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे. अशा दोन मूर्ती नगरदेवळयात आहेत. पैकी एक श्री विठ्ठल मंदिर संस्थान येथे आहे याच प्रकारची मूर्ती भडगाव येथील गणपती मंदिरात देखील आढळते .
पहिले बाजीराव पेशवा उत्तरेत मोहिमेवर आले असताना त्यांनी या मूर्तीची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. भडगाव येथील एक नगरदेवळे येथे दोन गणेश मूर्तींची स्थापना एकाच वेळेस झाल्याचे नाकारता येत नाही.
गणेश मूर्तीच्या शेजारी गोवर्धन गिरीधारी ही काळ्या बसाल्ट खडकापासून घडवलेली अप्रतिम मूर्ती आहे. मूर्तीच्या एका बाजूस गोप व दुसर्या बाजूस गोपिका असून सर्व गोपालांनी गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी काठ्यांचा टेकू दिलाय. श्रीकृष्णाने डाव्या हाताच्या केवळ करंगळीने गोवर्धन उचलल्याचे मूर्तीच्या कोरीवकामात साकारले आहे. मूर्तीच्या कोरीव कामातील तुकतुकीतपणा मूर्तिकारांचे प्रचंड परिश्रम दर्शवितो. मुकुटावरील मोरपिसांची नक्षी करताना कलावंताचे कसब पणाला लागले आहे.
डोक्यावरील गोवर्धन पर्वताचा वापर मेघडंबरी छत्रीसारखा केला आहे. आतले कोरीव काम करताना कमालीचा नाजूकपणा साधला आहे. गोवर्धन पर्वत साकारताना कलाकाराने कमाल केली आहे. दोन फूट लांबी-रुंदीचा क्षेत्रफळात सगळा गोवर्धन उतरण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. रासलीला करणारी गोपगोपी , त्यांच्या डोक्यावर असलेला वनक्षेत्रपाल, उजव्या अंगाला सवत्स धेनु, गुराखी, मोर, सिंह, बैल, कोल्हा, अजगर तर डाव्या अंगाला वानर सेना, रानगवा, वाघ, हरिण, खारुताई, मोर, हत्ती, माहूत यांच्यासोबत जंगलातील वृक्ष, पाने, फुले, फांद्या ही संपदा बारकाईने टिपली आहे.
हे सगळे बघताना मन थक्क होते. मूर्तिकारांच्या प्रचंड मेहनत तिला वारंवार प्रणाम करावासा वाटतो. हे तयार करण्याअगोदर कितीतरी आरेखने त्यांना कागदावर उतरवावी लागली असणार !
या मंदिरातील चौथी कलाकृती म्हणजे राधाकृष्ण मूर्ती ! या मूर्तीला सुबकपणा देताना मूर्तीकाराने अक्षरशः जीव ओतला आहे. वेणूनाद करताना हातांची ठेवण व पायांची त्रिभंगी मुद्रा यांचा अद्भुत समतोल साधला आहे. मूर्तीचे सौष्ठव, कमनीयता लाजवाब आहे. अर्ध पाय जमिनीवर ठेवताना गुडघ्यापासून पायाला दिलेला वाक, जमिनीला सरळ दिशेला दुमडलेली बोटे , मूर्तीत सजीवता निर्माण करतात. मुख्य पाषाणातून मूर्ती साकार करताना कलाकारांचे कसब पणाला लागले आहे.
कोरीव काम करताना हळूहळू चारही बाजूंनी मुख्य पाषाण बाजूला सारत फक्त मूर्तीच तेवढी बाकी ठेवली आहे. कमरेच्या दुशाल्याचे अग्रभाग धावते ठेवले आहेत. त्यामुळे मूर्तीत गतिमानता निर्माण झाली आहे. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे मूर्ती अधांतरी न राहता तिला मजबुती मिळाली आहे. या मूर्तीचे निर्माण कार्य पाहता अखंड पाषाण शिळेतून ही मूर्ती या ठिकाणीच घडवली गेली असणार. कारण या मूर्तीचा नाजूकपणा लक्षात घेता तिची ने आण करणे खूप जिकरीचे झाले असते.
मूर्तीच्या उजव्या बाजूला गोपिका चवरी ढाळत असून तिच्या पायाजवळ उभा असलेला गाईचा बछडा पायाभोवती लडीवाळपणे गिरकी घेतोय तर डाव्या बाजूला राधा आशीर्वाद देताना दाखवली आहे. राधेचा लाजरेपणा व चेहऱ्यावरील लज्जाभाव मूर्तीकाराने अचूक टिपला आहे. उजव्या बाजूने डोक्यावरील पदर पुढे ओढला आहे जेणेकरून कृष्णाने चोरून तिच्याकडे पाहू नये व तिची कृष्णाशी दृष्टादृष्ट होऊ नये. चेहर्यापेक्षा बाहेर आलेला पदर दर्शविण्यासाठी मूर्तिकारांनी तिथे उठाव दिला आहे. राधाकृष्ण मूर्तीच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव मुख्य विष्णू मूर्तीला देखील मागे टाकतात.
या मंदिरातील पाचवी मुर्ती ही गोविंद पुष्टी या प्रकारातील आहे. विष्णूच्या हाती असलेल्या आयुधांचा क्रम चक्र गदा पद्म शंख असा आहे त्यावरून विष्णूच्या चोवीस मुर्ती प्रकारांपैकी ही गोविंद पुष्टी या नावाने ओळखली जाते. विष्णूच्या गळ्यापर्यंत रुळणारे कुंतल केस मूर्ती सौंदर्य वाढवतात.
( क्रमशः )
भाग - 2 लवकरच !😊
🛑🌾© संजीव बावसकर
नगरदेवळे
जळगाव
9975281275
( हे सदर आपणांस कसे वाटले, लाईक करा, कमेंट करा,आवडल्यास असेच पाठवा. हक्क सुरक्षित .)

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...