Wednesday, 15 June 2022

'दारा शिकोह, द मॅन हू वूड बी किंग'

 

वारसायुद्धात औरंगजेबाने केलेले दारा शुकोहचे हाल आणि हत्येचे ऐतिहासिक पुराव्यांतील वर्णन -
शाहजहान बादशहासमोर जेव्हा त्याच्या मुलाचं डोकं कापून ठेवलं गेलं...
रेहान फजल
बीबीसी प्रतिनिधी
22 जानेवारी 2021
=================================
या तख़्त या ताबूत' म्हणजे सिंहासन किंवा थडगं, ही फार्सी म्हण मुघल राजघराण्यांच्या संदर्भात वेळोवेळी वापरली जाते.
मुघलकालीन इतिहासाची पानं चाळताना आपल्याला दिसतं की, शाहजहान बादशहाने ख़ुस्रो व शहरयार या स्वतःच्या दोन भावांना मारून टाकण्याचे आदेश दिले होतेच, शिवाय 1628 साली सत्तेवर आल्यानंतर त्याने त्याच्या दोन पुतण्यांचा व चुलतभावांचाही काटा काढला.
शाहजहान बादशहाचेचे वडील जहांगीर यांनी त्यांचा छोटा भाऊ दान्यालाचं जीवन संपवलं होतं.
ही परंपरा शाहजहान बादशहानंतरही सुरू राहिली. त्यांचा मुलगा औरंगजेब याने स्वतःचा मोठा भाऊ दारा शिकोह याचं मुंडकं छाटून भारतातील सिंहासन काबीज केलं.
शाहजहान बादशहाचा सर्वांत लाडका व सर्वांत मोठा मुलगा असलेला








दारा शिकोह नक्की कसा होता?
'दारा शिकोह, द मॅन हू वूड बी किंग' या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक अविक चंदा यांना मी हाच प्रश्न विचारला.
त्यावर अविक म्हणाले, "दारा शिकोहचं व्यक्तिमत्व बहुआयामी आणि गुंतागुंतीचं होतं. एकीकडे तो अतिशय स्नेहशील, विचारवंत, प्रतिभावान कवी, अभ्यासक, उच्च दर्जाचा धर्मपंडित, सूफी पंथाबाबत व ललित कलांबाबत ज्ञान असलेला शहज़ादा होता, तर दुसऱ्या बाजूला प्रशासन आणि सैनिकी बाबींमध्ये त्याला काहीच रुची नव्हती. तो दुबळ्या स्वभावाचा होता; लोकांबाबतची त्याची समजूतही मर्यादित होती."
शाहजहानने दारा शिकोहला सैनिकी मोहिमांपासून दूर ठेवलं
शाहजहानचं दारावर इतकं प्रेम होतं की, तो आपल्या या मुलाला सैनिकी मोहिमांवर पाठवायला कायमच कचरायचा. दारा सतत आपल्या समोर दरबारात राहील, असा शाहजहानचा प्रयत्न असे.
अवीक चंदा म्हणतात, "जेमतेम सोळा वर्षं वय असलेल्या औरंगजेबाला सैनिकी मोहिमांवर पाठवण्यात शाहजहान यांना काहीच अडचण वाटत नसे. औरंगजेब दक्षिणेतील एका मोठ्या सैनिकी मोहिमेचं नेतृत्व करत होता. तसंच मुराद बख़्श याला गुजरातेत पाठवण्यात आलं आणि शाहशुजाला बंगालकडे पाठवण्यात आलं. पण शाहजहान यांनी आपला सर्वांत लाडका मुलगा दारा याला दरबारातच ठेवलं. तो आपल्या नजरेआड होऊ नये, अशी तजवीज शाहजहानने केली होती. याचा परिणाम असा झाला की, दारा शिकोहला युद्धाचाही अनुभव मिळाला नाही आणि राजकीय कारभाराचाही अनुभव मिळाला नाही. शाहजहान दारा शिकोहला स्वतःचा उत्तराधिकारी बनवण्यासाठी एका पायावर तयार होता. किंबहुना त्यासाठी त्याने दरबारामध्ये खास योजनाही आखली होती. दारा शिकोहला त्याने सिंहासनाजवळ बसवलं आणि 'शाह बुलंद इक़बाल' अशी उपाधी दिली. आपल्यानंतर तोच गादीवर बसेल, अशी घोषणा त्याने केली."
शहज़ादा म्हणून दारा शिकोहला शाही तिजोरीतून दोन लाख रूपये दिले गेले. त्याला रोज एक हजार रुपये इतका दैनंदिन भत्ता दिला जात असे.
हत्तींच्या लढतीमध्ये औरंगजेबाने दाखवलेलं शौर्य
28 मे 1633 रोजी एक अतिशय नाट्यमय घटना घडली. तिचा परिणाम पुढे अनेक वर्षांनी दिसून आला.
शाहजहानला हत्तींची लढत बघायचा नाद होता. सुधाकर आणि सुरत-सुंदर यांच्यातील लढत बघायला तो सज्जातून खाली आला होता.
लढतीदरम्यान सुरत-सुंदर हा हत्ती मैदान सोडून पळायला लागला, तेव्हा सुधाकर चिडून त्याच्या पाठीमागे धावायला लागला. हा सगळा गदारोळ बघणारे लोक इतस्ततः धावायला लागले.
हत्तीने औरंगजेबावर हल्ला केला. तेव्हा घोड्यावर स्वार असलेल्या 14 वर्षीय औरंगजेबाने स्वतःच्या घोड्याला पळण्यापासून थोपवलं, आणि हत्ती त्यांच्या जवळ आल्यानंतर भाल्याने त्याच्या माथ्यावर जोरदार वार केला.
दरम्यान काही सैनिक धावत तिथे पोचले आणि त्याने शाहजहानच्या चारही बाजूने कडं केलं. हत्तीला घाबरवण्यासाठी फटाके वाजवण्यात आले, पण हत्तीने सोंडेने औरंगजेबाच्या घोड्याला खाली पाडलं.
घोडा कोसळायच्या आधीच औरंगजेबाने त्याच्यावरून खाली उडी मारून हत्तीशी लढण्यासाठी स्वतःची तलवार बाहेर काढली होती. त्याच वेळी शहज़ादा शुज़ाने मागून येऊन हत्तीवर वार केला.
हत्तीने त्याच्या घोड्यावर इतक्या जोरात डोकं आदळलं की शुज़ासुद्धा घोड्यावरून खाली पडला. त्याच वेळी तिथे उपस्थित राजा जसवंत सिंह आणि इतर काही शाही सैनिक आपापल्या घोड्यांवरून घटनास्थळी पोचले. चारही बाजूंनी आरडाओरड सुरू झाल्यावर सुधाकर तिथून पळून गेला. त्यानंतर औरंगजेबाला बादशहासमोर आणण्यात आलं तेव्हा त्याने या मुलाला आलिंगन दिलं.
अवीक चंदा सांगतात त्यानुसार, या घटनेनंतर समारंभपूर्वक औरंगजेबाला 'बहादूर' अशी उपाधी बहाल करण्यात आली. त्याची सुवर्णतुला करून ते सोनं त्यालाच भेट देण्यात आलं. या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान दारा शिकोह तिथेच उभा होता, पण त्याने हत्ती काबूत आणण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. कालांतराने हिंदुस्थानची गादी कोण सांभाळणार आहे, याचा हा एक प्रारंभिक संकेतच होता. "दारा थोड्या वेळाने घटनास्थळी पोचला. इच्छा असूनही तत्काळ तिथे पोचणं त्याला शक्य नव्हतं. जाणीवपूर्वक तो मागेच राहिला, त्यामुळे औरंगजेबाला कौतुक कमवायची संधी मिळाली असं म्हणणं गैर होईल," असं इतिहासकार राना सफ़वी म्हणतात.
मुघल इतिहासातील सर्वांत महागडा विवाहसोहळा
नादिरा बानो आणि दारा शिकोह यांच्यातील विवाह मुघल इतिहासातील सर्वांत महागडा विवाहसोहळा असल्याचं म्हटलं जातं.
त्याच वेळी इंग्लंडहून भारतात फिरस्तीसाठी आलेल्या पीटर मँडीने नमूद केल्यानुसार, या विवाहासाठी त्या काळात 32 लाख रुपये खर्च झाले होते, त्यातील 16 लाख रुपये दाराची मोठी बहीण जहाँआरा बेगमने दिले होते.
अवीक चंदा म्हणतात, "बादशाह आणि मोठी बहीण जहाँआरा या दोघांचंही दारावर सर्वाधिक प्रेम होतं. त्या वेळी त्यांची आई मुमताज़ महलचं निधन झालेलं होतं आणि जहाँआरा बेगम बादशाह बेगम झालेली होती. पत्नीच्या निधनानंतर पहिल्यांदाच शाहजहान एखाद्या सार्वजनिक समारंभात सहभागी होणार होता. हे लग्न 1 फेब्रुवारी 1633 रोजी झालं आणि 8 फेब्रुवारीपर्यंत पंगती उठत राहिल्या. याच दरम्यान रात्री इतके फटाके उडवण्यात आले आणि इतकी रोषणाई करण्यात आली की रात्रीच उजाडल्यासारखा भास व्हायला लागला होता. लग्नाच्या दिवशी वधून घातलेल्या जोड्यांचीच किंमत आठ लाख रुपये होती, असंही सांगितलं जातं."
दाराने कंदाहारवर चढाई केली
दारा शिकोहची सार्वजनिक प्रतिमा दुर्बल योद्धा आणि अकार्यक्षम प्रशासक अशी होती. पण तो कधीच युद्धात सहभागी झाला नाही, असं नाही.
कंदाहार मोहिमेवर तो स्वतःच्या इच्छेने लढायला गेला होता, पण तिथे त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.
अवीक चंदा म्हणतात, "औरंगजेब कंदाहारहून अपयशी होऊन परतला, तेव्हा दारा शिकोहने स्वतःहून तिथल्या मोहिमेचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली. शाहजहानने त्यावरही सहमती दर्शवली. लाहोरला गेल्यानंतर दाराने 70 हजार लोकांचं एक दल तयार केलं, त्यात 110 मुस्लीम आणि 58 राजपूत सेनापती होते.
या फौजेत 230 हत्ती, 6000 जमीन खोदणारे, 500 भिश्ती आणि मोठ्या संख्येने तांत्रिक, जादूगार नि वेगवेगळ्या प्रकारचे मौलाना व साधू यांचा समावेश होता. दाराने सेनापत्तींचा सल्ला घेण्याऐवजी या तांत्रिकांचा व ज्योतिषींचा सल्ला घेऊन हल्ल्याचा दिवस निश्चित केला. या लोकांवर त्यांनी बराच पैसाही खर्च केला.
दुसरीकडे फार्सी सैनिकांनी बचावाची सक्षम योजना आखलेली होती. त्यामुळे कित्येक दिवस वेढा टाकूनही दाराच्या पदरी अपयशच पडलं, आणि रिकाम्या हातांनी त्याला दिल्लीकडे माघारी यावं लागलं."
औरंगजेबाकडून पराभव
शाहजहान आजारी पडल्यानंतर त्यांच्या पश्चात गादीवर कोण बसणार, यावरून झालेल्या लढाईमध्ये औरंगजेबाने दारा शिकोहचा पराभव केला.
पाकिस्तानातील नाटककार शाहिद नदीम यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबाने दाराला हरवलं तेव्हाच भारत व पाकिस्तान यांच्या फाळणीचं बी रोवलं गेलं. या लढाईमध्ये औरंगजेब एका मोठ्या हत्तीवर स्वार होता. त्याच्या पाठी धनुष्यबाण घेतलेले 15,000 घोडेस्वार होते.
औरंगजेबाच्या उजव्या बाजूला त्याचा मुलगा सुलतान मोहम्मद आणि सावत्रभाऊ मीर बाबा होता. सुलतान मोहम्मदच्या शेजारी नजाबत खाँ यांची तुकडी होती. या व्यतिरिक्त आणखी 15,000 सैनिक मुराद बख्शच्या नेतृत्वाखाली होते. मुरादसुद्धा हत्तीवर बसलेला होता. त्याच्या अगदी पाठीच त्याचा छोटा मुलगा बसलेला होता.
अवीक चंदा म्हणतात, "सुरुवातीला दोन्ही फौजांमध्ये तुल्यबळ लढाई जुंपली, किंबहुना दारा थोडा वरचढ होता. पण तेवढ्यात औरंगजेबाने स्वतःच्या नेतृत्वक्षमतेची चुणूक दाखवली. त्याने त्याच्या हत्तीचे चारही पाय साखळ्यांनी बांधून घेतले, जेणेकरून हत्ती मागेही जाणार नाही आणि पुढेही जाणार नाही. मग तो ओरडून म्हणाला, 'मरदानी, दिलावराँ-ए-बहादुर! वक्त अस्त!' म्हणजे 'शूरवीरांनो, आपली ताकद दाखवायची हीच वेळ आहे'. हात वर करून त्याने मोठ्या आवाजात 'या खुदा! या खुदा! माझी तुझ्यावर श्रद्धा आहे! हरण्यापेक्षा मेलो तरी बेहत्तर."
हत्तीपासून दूर होणं महागात पडलं...
अवीक चंदा पुढे सांगतात, "तेव्हाच खलीलउल्लाह खाँने दाराला सांगितलं की, 'आपण आता जिंकत आलेले आहेत. पण तुम्ही उंच हत्तीवर का बसलायंत? स्वतःचा जीव धोक्यात का घालताय?
एखादा बाण किंवा गोळी हौद्यातून पलीकडे जाऊन तुम्हाला लागली, तर त्यानंतर काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकता. ख़ुदासाठी तुम्ही हत्तीवरून खाली उतरा आणि घोड्यावर स्वार होऊन लढा.' दाराने हा सल्ला मान्य केला. हत्तीवर दारा बसलेला हौदा आता रिकामा झाल्याचं बाकीच्या सैनिकांनी पाहिलं, तेव्हा त्यातून अफवांचं पेव फुटलं.
हौदा रिकामा होता आणि दारा कुठे दिसत नव्हता. म्हणजे दाराला शत्रूने पकडलं असेल किंवा लढाईत त्याचा मृत्यू झाला की काय, असं सैनिकांना वाटू लागलं. त्यामुळे सैनिकी एवढे घाबरले की ते माघारी फिरायला लागले, आणि थोड्याच वेळात औरंगजेबाच्या सैनिकांनी दाराच्या फौजेचा धुव्वा उडवला."
या लढाईचं अतिशय सूक्ष्म वर्णन इटालियन इतिहासकार निकोलाओ मनुची यांनी 'स्तोरिया दो मोगोर' या त्यांच्या पुस्तकात केलं आहे.
मनुची लिहितात, "दाराच्या फौजेत व्यावसायिक सैनिक नव्हते. त्यातले बरेच लोक न्हावी, खाटीक किंवा सर्वसाधारण मजूर होते. दाराने धुळीच्या लोटांमधून स्वतःचा घोडा पुढे दामटला. आपलं साहस दिसावं यासाठी त्याने नगारे वाजवणं सुरूच ठेवायचा आदेश दिला. शत्रू अजूनही थोडा दूर असल्याचं त्याने पाहिलं. तिकडून काही हल्ला होत नव्हता आणि गोळ्याही मारल्या जात नव्हत्या. म्हणून दारा त्याच्या सैनिकांसह पुढेच जात राहिला.
ते औरंगजेबाच्या सैनिकांच्या टप्प्यात आल्यावर तत्काळ त्यांच्यावर तोफांचा, बंदुकांचा आणि उंटांच्या पाठीवर लावलेल्या फिरत्या बंदुकांचा मारा सुरू झाला. या अचानक सुरू झालेल्या आक्रमक हल्ल्याला तोंड देण्यासाठी दारा व त्यांचे सैनिक तयार नव्हते."
मनुची पुढे लिहितात, "हळूहळू औरंगजेबाच्या सैन्याचे गोळे दाराच्या सैनिकांची मुंडकी नि धड उडवायला लागले, तेव्हा दाराने आपल्याही तोफा पुढे काढायचा आदेश दिला. पण पुढे कूच करण्याच्या नादात आपल्या सैनिकांनी तोफा मागेच ठेवून दिल्याचं त्याला सांगण्यात आलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली."
लपतछपत चोरासारखा आग्र्याच्या किल्ल्यात पोचला
या लढाईतील दाराच्या पराभवाचं तपशीलवार वर्णन विख्यात इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी औरंगजेबाच्या चरित्रात केलं आहे.
सरकार लिहितात, "घोड्यावरून चार ते पाच मैल धावून झाल्यानंतर दारा शिकोह आराम करण्यासाठी एका झाडाखाली बसला. औरंगजेबाचे सैनिक त्याचा पाठलाग करत नव्हते, पण दारा शिकोह मागे वळून पाहायचा तेव्हा प्रत्येक वेळी त्याला औरंगजेबाच्या सैनिकांच्या ढोलांचा आवाज ऐकू येत होता.
डोक्यावरचं कवच काढून ठेवायचा प्रयत्न त्याने केला, कवचामुळे त्याच्या डोक्याची सालपटं निघत होती. पण तो इतका थकून गेला होता की त्याला स्वतःचे हात डोक्यापर्यंतही घेऊन जाता येत नव्हते."
सरकार पुढे लिहितात, "शेवटी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान दारा काही घोडेस्वारांसह लपतछपत चोरासारखा आग्र्यातील किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोचला. त्यांचे घोडे पूर्णतः थकून गेले होते आणि सैनिकांच्या हातात मशाली नव्हत्या. सगळ्या शहरात स्मशानशांतता पसरलेली होती. मूकपणे दारा घोड्यावरून खाली उतरला आणि आपल्या घरात जाऊन त्याने दार बंद करून घेतलं. दारा शिकोह मुघल बादशाहीची लढाई हरला होता."
मलिक जीवनच्या कपटाने दारा शिकोह पकडला गेला
आग्र्याहून पळून गेल्यानंतर दारा आधी दिल्लीला गेला, तिथून तो पंजाबला आणि मग अफगाणिस्तानात गेला. तिथे मलिक जीवनने कपट करून त्याला पकडलं आणि औरंगजेबाच्या सैन्यातील सरदारांच्या हवाली केलं. मग त्याला दिल्लीला आणण्यात आलं आणि अतिशय मानहानीकारकरित्या दिल्लीच्या रस्त्यांवरून त्याची धिंड काढली गेली.
अवीक चंदा सांगतात, "रोमन सेनाधिकारी ज्यांचा पराभव करत त्यांना घेऊन येत आणि सर्वांसमोर त्यांची धिंड काढत, तसंच औरंगजेबाने दारा शिकोहला वागवलं. आग्रा व दिल्लीतील जनतेमध्ये दारा शिकोहची लोकप्रियता बरीच मोठी होती. त्यामुळे त्यांच्या समोर दाराला अपमानित करून औरंगजेब दाखवून देऊ पाहत होता की, केवळ लोकांचं प्रेम मिळाल्याने काही कोणी भारताचा बादशाह होण्याचं स्वप्न पाहू नये."
छोट्या हत्तिणीवर बसवून दिल्लीच्या रस्त्यांवरून धिंड काढली
दाराच्या या जाहीर अपमानाचं वर्णन फ्रेंच इतिहासकार फ्राँसुआ बर्नियर यांनी 'ट्रॅव्हल्स इन द मुघल इंडिया' या पुस्तकात केलं आहे.
बर्नियर लिहितात, "दाराला एका छोट्या हत्तिणीच्या पाठीवर, छप्पर नसलेल्या हौद्यामध्ये बसवण्यात आलं. त्याच्या पाठी दुसऱ्या एका हत्तीवर त्याचा 14 वर्षांचा मुलगा सिफीर शिकोह बसलेला होता. त्या पाठी औरंगजेबाचा गुलाम नजरबेग नंगी तलवार घेऊन चालत होता.
दाराने पळून जायचा प्रयत्न केला, किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला, तर तत्काळ त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करावं, असा आदेश नजरबेगला देण्यात आला होता. जगातील सर्वांत श्रीमंत राजघराण्याचा वारस फाटक्या कपड्यांमध्ये स्वतःच्याच प्रजेसमोर अपमानित होत होता. त्याच्या डोक्यावर बेरंगी पागोटं बांधलेलं होतं आणि त्याच्या गळ्यात कोणताही दागिना नव्हता.".
बर्नियर पुढे लिहितात, "दाराच्या पायांना साखळ्या बांधलेल्या होत्या, पण त्याचे हात मोकळे होते. ऑगस्टच्या तळपत्या उन्हात या वेषामध्ये त्याला दिल्लीतल्या रस्त्यांवरून फिरवलं जात होतं. इथे कोणे एकेकाळी त्याच्या नावाची तुतारी फुंकली जात होती.
धिंड काढली जात असताना एक क्षणभरही त्याने डोळे वर करून पाहिलं नाही. तुटलेल्या फांदीसारखा तो बसून राहिला. त्याची ही अवस्था बघून दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांचे डोळे भरून आले."
भिकाऱ्याच्या दिशेने शाल फेकली
दारा शुकोहची अशा तऱ्हेने धिंड काढली जात असताना त्याच्या कानावर एका भिकाऱ्याचा आवाज पडला.
अवीक चंदा सांगतात, "भिकारी जोरजोरात ओरडत होता, 'ऐ दारा, एके काळी तू या भूमीचा मालक होतास. तू या रस्त्यावरून जाताना मला काही ना काही देऊन पुढे जायचास. आज तुझ्याकडे मला देण्यासारखं काही नाही.'
हे ऐकल्यावर दाराने आपल्या खांद्यापाशी हात नेला, आणि त्यावर पांघरलेली शाल उचलून त्या भिकाऱ्याच्या दिशेने फेकली. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ही गोष्ट औरंगजेबाला सांगितली. धिंड संपल्यावर दारा आणि त्याचा मुलगा सिफीर यांना तुरुंगाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं."
मुंडकं छाटलं
त्यानंतर दुसऱ्या दिवशीच औरंगजेबाने दरबारात निर्णय घेतला की, दारा शिकोहला देहदंड दिला जावा. इस्लामविरोधी वागल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. औरंगजेबाने 4,000 घोडेस्वारांना दिल्लीबाहेर पिटाळलं आणि दाराला ग्वाल्हेरच्या तुरुंगात पाठवलं जातंय अशी अफवा पसरवली. त्याच संध्याकाळी औरंगजेबाने नजरबेगला बोलावून घेतलं आणि दारा शिकोहचं छाटलेलं मुंडकं पाहण्याची इच्छा बोलून दाखवली.
अवीक चंदा सांगतात, "नजरबेग आणि त्यांचे साथीदार मकबूला, महरम, मशहूर, फरात आणि फतह बहादूर चाकुसुरे घेऊन खिजराबादमधील महालात गेले. तिथे दारा आणि त्याचा मुलगा रात्रीच्या जेवणासाठी स्वतः डाळ शिजवत होते.
त्यांच्या खाण्यात विष घातलेलं असेल, अशी भीती असल्यामुळे ते स्वतः जेवण तयार करत होते. आपण सिफीरला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत, अशी घोषणा नजरबेगने केली. सिफीर रडायला लागला आणि दाराने आपल्या मुलाला छातीशी कवटाळून धरलं. नजरबेग नि त्याच्या साथीदारांनी जबरदस्तीने दारापासून मुलाला बाजूला खेचलं आणि दुसऱ्या खोलीत नेलं."
अवीक चंदा पुढे सांगतात, "दाराने आधीच एक छोटा चाकू स्वतःच्या उशीमध्ये लपवून ठेवलेला होता. तो चाकू काढून दारा शिकोहने नजरबेगच्या एका सहकाऱ्यावर पूर्ण ताकदीनिशी प्रहार केला. पण मारेकऱ्यांनी त्याचे दोन्ही हात वरच्यावर धरले आणि त्याला गुढग्यांवर बसायला लावलं, मग त्याचं शीर जमिनीला लावलं आणि नजरबेगने स्वतःच्या तलवारीने त्याचं मुंडकं धडापासून वेगळं केलं."
छाटलेलं मुंडकं औरंगजेबाला सादर
दारा शिकोहचं छाटलेलं मुंडकं औरंगजेबासमोर सादर करण्यात आलं. त्या वेळी तो त्याच्या किल्ल्याच्या बागेत बसला होता. मुंडकं पाहिल्यानंतर औरंगजेबाने आदेश दिला की, मुंडक्याला लागलेलं रक्त साफ करून एका तबकातून ते घेऊन यावं.
अवीक चंदा सांगतात, "तत्काळ तिथे मशाली आणि कंदील लावण्यात आले. ते मुंडकं आपल्या भावाचंच आहे, याची खातरजमा खुद्द औरंगजेबाला करता यावी, यासाठी प्रकाश पाडण्यात आला. औरंगजेब इथेच थांबला नाही. दुसऱ्या दिवशी, 31 ऑगस्ट 1659 रोजी त्याने आदेश दिला की, मुंडकं छाटून उरलेलं दारा शिकोहचं धड हत्तीवर ठेवावं आणि जिवंतपणी त्याची धिंड काढली त्याच रस्त्यांवरून त्या धडाची धिंड काढावी.
हे दृश्य पाहिल्यावर दिल्लीवासीयांच्या अंगावर काटा आला आणि बायका घरात जाऊन रडायला लागल्या. दाराचं हे मुंडकं छाटलेलं धड 'हुमायूं का मकबरा' परिसरामध्ये दफन करण्यात आलं."
औरंगजेबाने शाहजहानचं मन मोडलं
यानंतर औरंगजेबाने आग्र्यातील किल्ल्यात कैद असलेले त्याचे वडील शाहजहान याच्याकडे एक भेटवस्तू पाठवली.
इटालियन इतिहासकार निकोलाओ मनुची यांनी 'स्टोरिया दो मोगोर' या त्यांच्या पुस्तकात लिहिल्यानुसार, "आलमगीरने त्याचा सहायक ऐतबार खाँ याच्या हस्ते शाहजहानकडे एक पत्र पाठवलं.
त्या पत्राच्या लिफाफ्यावर लिहिलं होतं- 'औरंगजेब, तुमचा मुलगा, तुमच्या सेवेत हे तबक पाठवतो आहे, तुम्ही ही भेट कधीच विसरू शकणार नाही.' पत्र मिळाल्यावर वृद्ध शाहजहाँ म्हणाला, 'खुदा कृपेने माझा मुलगा अजून माझी आठवण काढतोय.' तेवढ्यात झाकलेलं तबक त्याच्या समोर ठेवण्यात आलं.
त्याचं झाकण शाहजहानने बाजूला केलं तेव्हा तो किंचाळला, कारण त्यात त्याचा सर्वांत थोरला मुलगा दारा शिकोहचं छाटलेलं मुंडकं ठेवलं होतं."
क्रौर्याची परिसीमा
मनुची पुढे लिहितात, "हे दृश्य पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या बायका मोठमोठ्याने शोक करायला लागल्या, ऊर बडवून घेऊ लागल्या आणि दागदागिने उतरवून टाकले. शाहजहानला इतकी जोरदार चक्कर आली की त्याला तिथून दुसरीकडे घेऊन जावं लागलं.
दाराचं बाकीचं धड 'हुमायूं का मकबरा' परिसरात दफन करण्यात आलं होतं, पण औरंगजेबाच्या हुकुमानुसार दाराचं शीर ताजमहालाच्या अंगणात गाडण्यात आलं. शाहजहान जेव्हा-जेव्हा त्याच्या बेगमच्या मकबऱ्याकडे बघेल, तेव्हा त्याच्या सर्वांत थोरल्या मुलाचं शीरही तिथेच जमिनीत सडत पडलंय याची जाणीव त्याला होईल, यासाठी औरंगजेबाने हा आदेश दिला होता."

Monday, 18 April 2022

चंद्रगुप्त मौर्य : मौर्यसाम्राज्याचा संस्थापक

 चंद्रगुप्त मौर्य : मौर्यसाम्राज्याचा संस्थापक 

 (इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू.२९८)

postsaambhar ::Dt Sitaram Ingole

  


इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू. १८७ ( मौर्य कालखंड) या काळात मौर्य घराण्याचे राज्य होते. 

मौर्य वंशाच्या स्थापनेने भारतात एक नवे युग सुरू झाले. संपूर्ण भारत हा मौर्यांच्या अधिपत्याखाली आल्याने भारताचे राजकीय ऐक्य निर्माण झाले. 

मौर्यांचे एकछत्री साम्राज्य विशेषतः संपूर्ण उत्तर भारतावर प्रस्थापित झाले. मौर्यपूर्व काळात भारतात राजकीय अस्थैर्य, गोंधळ, सत्तास्पर्धा होती. 

मौर्यपूर्व काळात मगधवर शिशुनाग वंश, नंद वंश यांनी राज्य केले होते. मगध येथे मौर्य घराण्याची सत्ता प्रस्थापित होऊन भारतात नवे राजकीय व सांस्कृतिक जीवनच सुरू झाले. 

डॉ. व्ही. ए. स्मिथ म्हणतात.

 "The advent of the Mauryan dynasty makes the passage from darkness to light.".

मौर्यांनी संपूर्ण देशात एक आदर्श अशी "मुलकी" व्यवस्था सुरू केली. कित्येक शतकांनंतर व राजवंशांच्या उदयास्तानंतरही मौर्यानी निर्माण केलेली शासन व्यवस्थाच कायम होती. 

मौर्य कालखंडात व्यापार, उद्योगधंदे, वाङ्मय, कला आदींची प्रगती झाली. 

डॉ. आंबेडकरांनी "मौर्य कालखंड स्वातंत्र्य, श्रेष्ठत्व व वैभव यांचा विचार करता भारताच्या इतिहासातील एकमेव कालखंड होय असे म्हटले आहे."


चंद्रगुप्त मौर्य :

 पूर्वचरित्र:

 कुलाविषयी भिन्न मते :

 चंद्रगुप्तमौर्य हा मौर्यसाम्राज्याचा संस्थापक होय.

 चंद्रगुप्त मौर्य हा कोण होता, मौर्य कुळ क्षत्रिय होते की शूद्र होते, मौर्य व नंदांचा संबंध काय इ. प्रश्नांची उत्तरे तत्कालीन ग्रंथांत भिन्न भिन्न आहेत. 

जैन व बौद्ध साहित्यानुसार तो क्षत्रिय होता तर ब्राह्मण ग्रंथानुसार तो शूद्र होता. चंद्रगुप्त हा शूद्र कुळातील होता हे खालील ग्रंथांत दाखवले आहे.

१) हिंदू – विष्णू पुराणात व तत्कालीन समजुतीप्रमाणे चंद्रगुप्त मौर्य हा नंदवंशातील शेवटच्या सम्राटाच्या (धनानंद) मुरा नांमक दासीचा पुत्र होय. म्हणून मुरा या शब्दावरून मौर्य हा शब्द बनला. पण मुरावरून मौर्य ही उत्पत्ती पाणिनीच्या व्याकरणाप्रमाणे अयोग्य आहे.

विशाखादत्त याने लिहिलेल्या 'मुद्राराक्षस' या नाटकात चंद्रगुप्त हा एक दासीपुत्र होता. धनानंद या शेवटच्या नंद राजाच्या 'मुरा' नावाच्या दासीपासून झालेला होता. 'मुरा' या आईच्या नावावरूनच चंद्रगुप्ताच्या घराण्याला मौर्य हे नाव पडले व चंद्रगुप्तानेच चाणक्य या धनानंदाकडून अपमानित झालेल्या राजनीतिज्ञाच्या मदतीने मौर्य वंशाची स्थापना केली असे कथानक आहे. तत्कालीन ग्रंथ म्हणून हा पुरावा महत्त्वाचा ठरतो.

२) जैन - जैन परंपरेप्रमाणे चंद्रगुप्त हा एक ग्रामप्रमुखाच्या मुलीचा मुलगा होय. या गावात मोर पाळणारे लोक राहात होते. त्यामुळे 'मयूरपोषक' या शब्दावरून मौर्य हा शब्द बनला असावा. 

एका स्मारकावरून असे स्पष्ट दिसते की, मौर्यवंशाची संबंध मयुरांशी अवश्य असावा. 

सांची येथील मूर्तिमध्ये व नंदरगड येथील अशोकाच्या स्तंभात मोरांची चित्रे आढळली आहेत. तसेच पाटलीपुत्र येथील बागेत पाळीव मोर ठेवण्यात आले होते.

३) बौद्ध - महावंशानुसार चंद्रगुप्त खट्टीय गोत्राचा वंशज असून मौर्य नावाने प्रसिद्ध होता. 

दिव्यावदानानुसारही चंद्रगुप्ताचा पुत्र बिंदुसार क्षत्रिय होता. असे आहे. महापरिनिभाणसुत्त या ग्रंथांत चंद्रगुप्त क्षत्रिय होता हे सिद्ध केले आहे. 

त्यात म्हटले आहे की. चंद्रगुप्ताचे वंशज क्षत्रिय असून इ.स.पू.  सहाव्या शतकात ते नेपाळ तराईमध्ये पिप्पलीवन नामक प्रदेशाचे सत्ताधीश होते. नंतर हा प्रदेश मगध साम्राज्यात विलीन करण्यात आल्यामुळे मौर्यवंशाची वाताहात झाली असावी.

 'दिव्यावदान' व 'महावंश' या बौद्ध ग्रंथांत चंद्रगुप्त हा क्षत्रिय होता असे म्हटले आहे.

४) ग्रीक: ग्रीक ग्रंथात चंद्रगुप्त हा क्षत्रिय होता असे म्हटले आहे. 

५) सोमदेवकृत 'कथासरित्सागर' मध्ये चुद्रगुप्त नंदाचा पुत्र होता. तो दासीपुत्र किंवा शूद्र मातेपासून उत्पन्न झाला नव्हता. मगधच्या राजसत्तेचा तो वंशपरंपरेने अधिकारीच होता असे म्हटले आहे.

 वरील नोंदी व इतिहासकारांनी काढलेले निष्कर्ष यांच्या आधारे चंद्रगुप्त हा क्षत्रिय कुळातील होता हे मान्य झाले आहे.

चंद्रगुप्ताच्या प्रारंभिक जीवनाबद्दलची माहिती उपलब्ध नाही. ‘मोरीय’ टोळीत चंद्रगुप्ताचा जन्म झाला असे बौद्ध परंपरा मानते. या टोळीप्रमुखाचा तो पुत्र होता.

 टोळीयुद्धात त्याचे वडील वारल्याने त्याच्या आईने छोट्या चंद्रगुप्तसह पाटलीपुत्र येथे आश्रय घेतला. 

चंद्रगुप्त हा अत्यंत हुशार व राजलक्षणी होता. तो स्वत:च्या अंगच्या गुणांमुळे नंदांच्या लष्करात एका साध्या शिपायापासून ते सेनापतीपदापर्यंत पोहोचला. 

धनानंद हा नंद राजा अतिशय जुलमी व संपत्तीचा लोभी होता. त्याने प्रजेवर प्रचंड कर लादले होते. जनतेचा तो छळ करी. जनतेला त्याची सत्ता नको होती. 

चंद्रगुप्ताने धनानंदाच्या सत्तेचा शेवट करण्याचे ठरवले; परंतु नंदाची सत्ता उलथवून टाकण्याचा त्याचा कट अयशस्वी ठरला. त्यानंतर तो पंजाबात पळून गेला. त्यानंतर तो कदाचित अलेक्झांडरच्या लष्करात भरती झाला असावा किंवा ग्रीकांच्या युद्धपद्धतीचा त्याने अभ्यास केला असावा.

नंद वंश : प्राचीन भारतीय पहिले प्रबळ व बलाढ्य साम्राज्य मगध

 

नंद वंश : प्राचीन भारतीय पहिले प्रबळ व बलाढ्य साम्राज्य मगध 

महापद्मानंद आणि धनानंद

 ( इ. स. पू. ४२३ ते ३२३)



नंद वंशाचा संस्थापक कोण याबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. 

काही इतिहासकारांनी 'उग्रसेन' हा नंद वंशाचा संस्थापक होय असे म्हटले आहे तर काहीनी 'महापद्मानंद' हा नंद वंशाचा संस्थापक आहे असे म्हटले आहे.

 इतिहासकारांच्या मते उग्रसेन व महापद्यानंद ही दोन्ही नावे एकाच शासकाची असून उग्रसेन मगधच्या गादीवर आल्यानंतर महापद्यानंद या नावाने ओळखला जाऊ लागला.

नंद राजांचे वर्णव्यवस्थेतील स्थान कोणते याबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत. 

जैन व बौद्ध साहित्यात नंद राजे कुलहीन होते असे म्हटले आहे. पुराणातही नंद वंशाचा संस्थापक कुलहीन होता असे म्हटले आहे. 

परंतु मुद्राराक्षस व कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नंद राजे क्षत्रिय आहेत असे म्हटले आहे.


नंदांच्या इतिहासाची साधने : 

१) पुराणग्रंथात नंदांची वंशावळ दिली आहे.

२) 'परिशिष्ट पर्व' या जैन ग्रंथात नंदाविषयी माहिती आढळते. 

3) आवश्यक सूत्र, महावंशटिका, महाबोधी वंश, बौद्ध ग्रंथातून नंदांच्या इतिहासाचे धागेदोरे सापडतात. या ग्रंथात नंदांच्या ९ राजांची नावे आली आहेत. 

४) 'कथासरित्सागर' या ग्रंथातही नंदांच्या इतिहासाची माहिती आली आहे. 

(५) कलिंगच्या खारवेलने कोरलेल्या हत्तीगुंफा शिलालेखातून व मैंसूर येथील काही शिलालेखातून नंदांच्या इतिहासाची अप्रत्यक्ष माहिती मिळते. 

६) क्युरोटियस या ग्रीक इतिहासकाराच्या लिखाणातून नंद राजांचे संदर्भ आले आहेत.


महापद्यानंद:

 राजा कलाशोक याच्या पत्नीचे दरबारातील एका नाभिकाशी संबंध होते. या नाभिकापासून झालेला पुत्र म्हणजे महापद्मनंद होय. 

आपल्या पुत्रास गादी मिळावी म्हणून राजा कलाशोकचा खून त्याच्या पत्नीनेच केला. अशा प्रकारे महापद्मनंद हा गादीवर आला.

 पुराणग्रंथात महापद्मनंदाचा उल्लेख 'सर्वक्षत्रियांतक', "एक राट' अशा शब्दांत आला आहे. 

महापद्मनंद हा कुलहीन असला तरी तो पराक्रमी व विस्तारवादी राजा होता. त्याने अनेक क्षत्रिय राजांचा पराभव केला. त्यामध्ये कुरु, पांचाल, कलिंग, अश्मक, मिथिला, शूरसेन आदी क्षत्रिय सम्राटांचा समावेश होतो. 

क्षत्रियांचा पराभव करून क्षत्रियांची पारंपरिक राजकीय वर्चस्वाची परंपराच त्याने तोडली असे मत डॉ. आर. के. मुखर्जी यांनी मांडले आहे. 

त्याने चतुरंग सेनेची उभारणी केली होती.

 त्याच्या लष्करात दोन लक्ष पायदळ, २०,०००  अश्वदल, ३००३ गजदल व २००० रथदल होते असे ग्रीक इतिहासकारांनी म्हटले आहे. 

अर्थात, ही संख्या विश्वासार्ह वाटत नाही. तरीही प्रचंड लष्करी शक्ती त्याने उभी केली असावी म्हणूनच त्यास अनेक क्षत्रिय राजांचा पराभव करणे शक्य झाले. 

महापद्मनंद हा एकूण २५ वर्षे सत्तेवर होता. पुराणग्रंथांमधून त्याच्या प्रचंड सामर्थ्याचे वर्णन आले आहे. 

महापद्मनंदाचे राज्य दक्षिण भारतातही होते. दक्षिण भारतात गोदावरी नदीच्या काठावर त्याने आपली एक उपराजधानी वसवलेली होती. डॉ. आर. के. मुखर्जीच्या मते, नवनंदडेरा या गावाची नंदाची एक उपराजधानी गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नांदेड परिसरातच होती.

 'नवनंदडेरा' या नावावरूनच 'नांदेड' हे नाव आले असावे 'स्वनंदडेरा' नावातच 'नंद' हा शब्द असल्याने या शहराची स्थापना करून त्यास उपराजधानीचा दर्जा 'नंद' राजांनी दिला असावा, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. 

शिलालेख व ताम्रपटांतून मात्र नांदेडचा अशा स्वरूपाचा उल्लेख अद्याप आढळून आला नाही.

'अश्वकसूत्रात' तसेच 'महाबोधी वंश' या बौद्ध ग्रंथात नंदांच्या ९ राजांचा उल्लेख आला आहे. 

१) उग्रसेन, २) पांडुक, ३) पांडुगती ४) भूतपाल, ५) राष्ट्रपाल, ६) गोवीशौणक, ७) दशसिद्ध, ८) कैवर्त, ९) धनानंद

 यापैकी उग्रसेन (महापद्मनंद) व धनानंद या दोघांचा अपवाद वगळता इतर नंद राजांची माहिती मिळत नाही. 

हे नऊ राजे एकमेकांचे भाऊ होते का? एकाच वेळी नंदांच्या साम्राज्यात विविध भागांत ते राज्य करीत होते का? हे नऊ राजे एकमेकांचे वंशज होते का? त्यांच्यातील नाते पिता-पुत्राचे होते का? आदी प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. कारण त्याबाबतची निर्विवाद उत्तरे अद्याप उपलब्ध नाहीत.


धनानंद:

धनानंद हा नंद वंशातील शेवटचा राजा होय. नंद राजा धनानंद हा महत्त्वाकांक्षी, परंतु जुलमी राजा होता. तो पैशाचा अत्यंत लोभी होता म्हणूनच 'धनानंद' हे नाव त्याला पडले.

 त्याने प्रजेवर प्रचंड कर बसविला होता. अमाप संपती जमा करून गंगा नदीच्या खडकात गुहा खोदून सोन्याच्या नऊ राशी त्याने दडवून ठेवल्या अशी त्यांच्याबद्दल आख्यायिका होती. 

फक्त धनानंदच नव्हे तर सर्वच नंद राजे संपत्तीचे लोभी असल्याने जनता नंद राजवटीवर असंतुष्ट होती. 

ह्यु-एन-संगच्या प्रवासवर्णनातही धनानंदने दक्षिण भारतातील आपल्या उपराजधानीच्या जवळून वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्रात धन साठवून ठेवल्याच्या आख्यायिकेची नोंद आहे. 

पाटलीपुत्रातील ५ प्रमुख स्तुपांतूनही त्याने धनसंचय केला असावा अशीही आख्यायिका ह्यु-एन-स्संग नोंदवितो.

 धनानंदाचा वध त्याचा एक दासीपुत्र चंद्रगुप्त मौर्य याने करून मगधची गादी बळकावली.

नंद वंशाचा अस्त झाला, पण नंदांचे महत्व नाकारता येत नाही. 

बिंबीसारच्या कार्यकर्तृत्वातून उदयास आलेले मगधचे साम्राज्य हे पुन्हा एकदा उत्तर भारतात प्रसिद्धीस आले. 

मगधच्या साम्राज्याला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचे कार्य नंदांनीच केले, नंदांनी मगध साम्राज्याच्या रूपाने फार मोठा वारसा आपल्या मागे ठेवला होता. 

समेचा केंद्रबिंद नंदांच्या काळात मगध परिसरात स्थिरावला व तेथेच तो ६००-७०० कायम राहिला. 

प्राचीन भारतातील सर्व वैभवशाली साम्राज्ये मगधच्याच परिसरात उदयास आली.

 मगधंचा परिसर हा अनेक अर्थानी महत्त्वाचा ठरतो, वैदिक धर्म व परंपरा नाकारणारे जैन व बौद्ध धर्म हे याच परिसरातले. 

नंद-मौर्य यांच्या रूपाने शूद्रांने राज्य निर्माण करणारे, गणराज्याची भरभराट पाहणारे राजे याच परिसरातले होते,

प्राचीन भारतातील पहिले प्रबळ साम्राज्य नंदांनीच निर्माण केले. 

दक्षिणेत नांदेडपर्यंत त्यांनी सत्ता होती. पाटलीपुत्र व राजगृह या दोन शहरांना नंदांनी वैभव प्राप्त करून दिले. 

नंदांनी जे साम्राज्य निर्माण केले होते त्यांच्याच आधारावर मौर्याना आपल्या साम्राज्याची इमारत उभी करणे शक्य झाले.

सम्राट अजातशत्रू : मगधच्या विशाल साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ संस्थापक सम्राट

 

सम्राट अजातशत्रू : मगधच्या विशाल साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ संस्थापक सम्राट

(इ. स. पू. ४९३ ते ४६२) 

postsaambhar :Dr Sitaram Ingole 



अजातशत्रू (इ. स. पू. ४९३ ते ४६२) मगधच्या विशाल साम्राज्याचा संस्थापक म्हणूनही अजातशत्रूचा उल्लेख केला जातो.

 बिंबिसारनंतर अजातशत्रू मगधच्या गादीवर आला. त्याने मगधच्या साम्राज्यात भर घातली. मगध राज्यातला तो सर्वश्रेष्ठ सम्राट होय.


अजातशत्रूचा साम्राज्यविस्तार :

 कोसलशी संघर्ष : 

कोसल राजा प्रसेनजित याने त्याची बहीण कोशलदेवीचा विवाह बिंबिसारशी करून काशी या शहराचे उत्पन्न आंदण म्हणून कोसलदेवीला दिले होते. परंतु अजातशत्रूने त्याचा पिता बिंबिसारचा खून केल्याने व कोशलदेवी ही मृत्यू पावल्याने काशीचे उत्पन्न देणे बंद केले. 

प्रसेनजितने अजातशत्रूशी संघर्ष उभा कला. या संघर्षात कधी प्रसेनजित तर कधी अजातशत्रु विजयी होई. निश्चित विजय कोणाचाही होत नव्हता. 

परंतु प्रसेनजितचे अजातशत्रुबाबतचे गैरसमज दूर झाल्यानंतर त्याने आपली कन्या वजिराचा विवाह अजातशत्रूशी लावला व पुन्हा काशीचे उत्पन्न अजातशत्रूला दण्याचे मान्य केले. 

याचा परिणाम म्हणून अजातशत्रू व पर्यायाने मगधचे राजकीय वर्चस्व वाढण्यास मदत झाली. 


 वैशालीशी संघर्ष : 

अनेक लहान लहान गणराज्यांचा एक संघ बनवून लिच्छवी हे त्या राज्यसंघाचे पुढारी बनले होते. लिच्छवीची राजकन्या चेल्लनाचा  विवाह बिंबिसारशी झाला होता. म्हणजे चेल्लना ही अजातशत्रूची सावत्र आई होती. 

बिंबीसारच्या मृत्यूनंतर चेल्लना दोन मुले व काही संपत्ती घेऊन वैशालीला आपल्या पित्याकडे गेली. 

अजातशत्रूने वैशालीचा नरेश चेटक यास आपले दोन भाऊ व संपत्ती परत करावी असे सुचविले. पण ती सूचना फेटाळून लावल्याने अजातशत्रू व वैशालीचे राज्य यांच्यात संघर्षाला प्रारंभ झाला. 

लिच्छवीचे गणराज्य हे प्रबळ असल्याने त्याचा पराभव करणे अशक्य होते. म्हणून अजातशत्रूने पूर्वतयारी म्हणून गंगेच्या काठावर लष्करी ठाणे व किल्ला असलेले 'कुसुमपूर' (हेंच ठिकाण पाटलीपुत्र या नावाने पुढे ओळखले गेले व मौर्याची ती राजधानी होती.) हे शहर वसवले. 

चेटकासारखा शक्तिशाली शत्रूचा पाडाव करता यावा म्हणून ३६ राज्यांचा एक संघ त्याने उभा केला. तसेच लिच्छवीच्या गणराज्याचा पाडाव करता यावा म्हणून त्या. गणराज्यात दुहीचे राजकारण करण्यासाठी हेर पाठवले. 

आम्रपाली नावाच्या गणिकेकडून वैशालीच्या गुप्त स्थानांची माहिती करून घेतली. एवढी भक्कम तयारी केल्यामुळेच अजातशत्रू वैशालीच्या लिच्छवी गणराज्यास पराभूत करू शकला.

 परिणामी अजातशत्रूचे वर्चस्व लिच्छवी गणराज्यावर प्रस्थापित झाले त्यामुळे मगध साम्राज्यात फार मोठी भर पडली.


अवंतीशी संघर्ष : 

अजातशत्रू वैशालीशी संघर्ष करण्यात गुंतला असता अवंतीच्या चंडप्रद्योत राजाने अजातशत्रूची राजगृहावर आक्रमण करण्याची तयारी चालविली. 

तेव्हा अजातशत्रूने राजगृह या राजधानीची मजबूत तटबंदी करून घेतली. मगधाची सुरक्षाव्यवस्था त्याने मजबूत केली त्यामुळेच अवंतीशी झालेल्या सत्तासंघर्षात अजातशत्रू विजयी झाला. 

काही इतिहासकारांच्या मते, अवंती मगध असा संघर्ष अजातशत्रूच्या काळात झालाच नाही. तो अजातशत्रूच्या मृत्यूनंतर झाला.


अजातशत्रूचे धार्मिक धोरण : 

अजातशत्रू हा धर्मसहिष्णू सम्राट असावा. जैन परंपरेनुसार त्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता तर बौद्ध परंपरेनुसार त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता.

 'औपत्तिक सूत्र' या जैन ग्रंथात त्याने महावीर वर्धमानपुढे आपल्या धार्मिक निष्ठा व्यक्त केल्या होत्या असा उल्लेख आहे.

 विनयपिटिका व दीर्घनिकायातून अजातशत्रूचे बौद्ध धर्मीयांशी असलेले संबंध स्पष्ट होतात. 

प्रारंभी अजातशत्रूच्या मनात गौतम बुद्धाबद्दल द्वेष, अनादर होता. गौतम बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त याच्या मनात गौतम बुद्धाबद्दल असूया असल्याने व त्याची अजातशत्रूशी मंत्री असल्याने त्याने अजातशत्रूच्या मनात गौतम बुद्धाबद्दल गैरसमज करून दिले होते.

 'जीवक' या अजातशत्रूच्या पदरी असलेल्या वैद्याच्या सूचनेवरून अजातशत्रू गौतमाच्या भेटीसाठी आम्रवनात गेला. तेव्हा १२०० बौद्ध भिक्षू अत्यंत शिस्तीत ध्यानस्थ बसलेले त्याला दिसले. हा प्रसंग भारहूतच्या शिल्पकारांनी कोरून ठेवला आहे. या घटनेचा परिणाम होऊन तो बौद्ध धर्माकडे आकर्षित झाला. 

बुद्धाच्या भेटीत त्याला परमआत्मशांती लाभल्याने त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

गौतम बुद्धाच्या मृत्यूची वार्ता ऐकून अजातशत्रू कुशीनगर येथे पोहोचला व बुद्धाचे अस्थि अवशेष प्राप्त व्हावेत व त्या अवशेषांवर मी एक स्तूप बांधेल असे त्याने म्हटले. 

त्यानुसार त्याच्याकडे अस्थि अवशेष सुपूर्द करण्यात आले. त्यानुसार त्याने राजगृह येथे बौद्ध स्तूप बांधला. एवढेच नव्हे तर राजगृह येथे वर्णमहाविहार तयार केले. 

अजातशत्रूने गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर इ. स. पू. ४८७ मध्ये राजगृह येथे पहिली बौद्ध धर्म परिषद भरवली. या धर्म परिषदेला ५०० भिक्षू हजर होते. 

महाकश्यप, आनंद, उपाली या बुद्धाच्या ख्यातनाम शिष्यांनी त्यात भाग घेतला. बुद्धाची शिकवण, संदेश यावर परिषदेत चर्चा होऊन त्याचे व्यवस्थित संकलन करण्यात आले. ही परिषद भरवून अजातशत्रू बौद्ध धर्माच्या इतिहासात अमर ठरला आहे. 

याच परिषदेत 'सुत्तपिटक' व 'विनयपिटक' या बुद्ध वचनांचे संकलन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पडले.


अजातशत्रूचा मृत्यू व त्याचे उत्तराधिकारी : 

अजातशत्रूने नेमके किती व राज्य केले हे निश्चित सांगता येत नाही. पुराणानुसार त्याने २४ वर्षे राज्य केले तर बौद्ध साहित्यानुसार ३२ वर्षे राज्ये केले. 

अजातशत्रू इ. स. पू. ४५९ मध्ये मृत्यु पावला. त्याच्या मृत्यूनंतर ‘दर्शक' हा मगधचा राजा झाला असे पुराणात म्हटले आहे तर जैन व बौद्ध साहित्यानुसार अजातशत्रूनंतर उदायीन हा राजा झाला असे म्हटल आहे. 

अजातशत्रूचा मुलगा दर्शक याने २४ वर्षे राज्य केले असे आहे. अजातशत्रूनंतर उदयभद्र, अनिरुद्ध, मुंड व नागदशक ही चार राजे होऊन गेली. पुराणात त्यांचा कार्यकाळ निश्चित सांगता येत नाही; परंतु या चौघांनीही आपल्या पित्याचा खून करून गादी मिळवली होती. 

त्यांच्या काळात मगध सत्तेचा विकास झाला नाही. उलट अंतर्गत कलहामुळे मगधचे राज्य दुबळे झाले. 

नागदशकच्या अस्तावरोबरच हर्षक वंशाची सत्ता संपली.


 शिशुनाग वंश: 

मगधचे अमात्य व मंत्री हर्षक वंशाचा शेवटचा राजा नागदशक याला सत्तेवरून हटवले व त्याच्या जागी अमात्य शिशुनाग यास मगधच्या  गादीवर बसवले असे 'दीपवंश' व 'महावंश' या ग्रंथात म्हटले आहे. 

शिशुनाग हा वैशालीचा लिच्छवी राजाचा पुत्र होता. शिशुनाग हाच शिशुनाग वंशाचा संस्थापक होता. बौद्ध वाङ्मयात शिशुनाग वंशासंबंधी गौरवपर मजकूर आहे. 

शिशुनागाने विस्तारवादी धोरणाचा पुरस्कार करून अजातशत्रूच्या मृत्यूनंतर जी अस्थिरता निर्माण झाली होती ती दूर केली. 

अवंती, मत्स, कोसल या राज्यांवर पुन्हा त्याने मगधचे वर्चस्व प्रस्थापित केले. जवळजवळ संपूर्ण उत्तर भारतावर त्याने मगधचे वर्चस्व व सार्वभौमत्व निर्माण केले.

शिशुनागाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र कलाशोक हा गादीवर आला. त्याने मगधची राजधानी राजगृह येथून पाटलीपुत्र येथे हलवली. त्याने बौद्ध धर्माच्या प्रसाराचे मोठे काम केले. त्याच्या काळातच दुसरी बौद्ध धर्म परिषद बोलावली गेली. 

कलाशोक हा 'काकवर्णी' या नावानेही ओळखला जातो. कलाशोकाचा मृत्यू व शिशुनाग वंशाचा अस्त यासंबंधी काही आख्यायिका, लोककथा असून तत्कालीन साहित्यात त्या नोंदवल्या आहेत. 

राजघराण्यातील एका नाभिकाने कलाशोकच्या पत्नीशी संबंध ठेवून कलाशोकाचाही विश्वास संपादन केला. शेवटी कलाशोकचा वध त्याच्या पत्नीनेच केला. 

अशा प्रकारे शिशुनाग वंशाची सत्ता अस्त पावली अशी माहिती 'क्युरोटियस' या ग्रीक इतिहासकाराने नोंदविली आहे. 

पुराणग्रंथात तसेच बाणभट्टाच्या 'हर्षचरित" मध्येही अशाच प्रकारची माहिती आहे. शिशुनाग वंशानंतर मगधवर नंद राजांची सत्ता प्रस्थापित झाली.

मगध : प्राचीन भारतीय पहिले प्रबळ व बलाढ्य साम्राज्य राजा बिंबिसार

 मगध : प्राचीन भारतीय पहिले प्रबळ व बलाढ्य साम्राज्य 

राजा बिंबिसार (इ. स. पू. ५४३ ते ४९१) 

postsaambhr ::Dr Sitaram Ingole  



आधुनिक बिहारमधील पाटणा व गया परिसरात हे गणराज्य उदयास आले. 

वैदिक आर्याच्या काळात मगध प्रदेश वैदिक संस्कृतीच्या बाहेर होता. 

सोळा महाजनपदांत श्रेष्ठत्वाचा जो लढा झाला त्यात मगध विजयी झाले. मगधचे श्रेष्ठत्व व सार्वभौमत्व सर्व छोट्या-मोठ्या संतांनी मान्य केले होते. 

भारताच्या राजकीय इतिहासातील पहिले प्रबळ साम्राज्य म्हणून मगध पुढे आले. 

पुराणग्रंथ, जैन व बौद्ध ग्रंथातून मगध महाजनपदांचा इतिहास व मगधवर राज्य केलेल्या राजवंशांच्या वंशावळी दिल्या आहेत.

 जैन ग्रंथात मगधला पवित्र जनपद मानले आहे. मगधामध्ये जैन ज्ञान व जैनाचार यांचे रक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असे महावीर वर्धमानने म्हटले होते. 

मगधवर नंद वंशाचे राज्य येण्यापर्वी ८ राजवंश सत्तेवर आले होते असे पुराणात म्हटले आहे. 

त्यापैकी इतिहासाला ज्ञात वंश खालीलप्रमाणे आहेत.

१) ब्रहद्रथ वंश

२) हर्षक वंश 

३) शिशुनाग वंश (इ. स. पू. ५४३ ते ४२३

४) नंद वंश ( इ. स. पू. ४२३ ते ३२३)

५) मौर्य वंश (इ. स. पू. ३२३ ते इ. स. पू. १८७) श.


बलाढ्य राजकीय शक्ती म्हणून मगधचा उदय :

महाजनपदातील सत्तासंघर्षात यशस्वी होऊन मगधचे राज्य एक बलाढ्य राजकीय शक्ती म्हणून पुढे आले. 

त्याची कारणमीमांसा,

१)  मगधची भूमी सुपीक असल्याने अन्नधान्याचा तुटवडा भासला नाही. 

२) आर्थिक वैभवामुळे लोकसंख्या वाढली. त्यामुळे महाजनपदाच्या सत्तासंघर्षात आवश्यक असलेले सैनिक मगधला मिळू शकले. 

(3) मगध राज्यात लोखंडाचे साठे प्रचंड असल्याचे शस्त्रास्त्रांची अडचण भासली नाही. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी तेथे लोखंड उपलब्ध होते. 

४) मगधचे व्यापारावर वर्चस्व प्रस्थापित झाले होते. 

५) मगधला ब्रहद्रथ हर्षक, शिशुनाग, नंद व मौर्य या वंशांतील कर्तबगार राजांचे नेतृत्व लाभले म्हणूनच मगध एक बलाढ्य राजकीय सत्ता म्हणून पुढे आले.


१) ब्रहद्रथ वंश : 

कुरू वंशाचा राजा वसूने मगध राज्य जिंकून आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य ५ पुत्रांत विभागले गेले. 

पाच पुत्रांपैकी एक पुत्र ब्रहद्रथ याने मगधला स्वतंत्र राज्य स्थापन केले. तोच मगधचा संस्थापक मानला जातो.

 त्याच्याच नावावरून त्याच्या वंशाला 'ब्रहद्रथ वंश' असे नाव पडले. याच वंशात पुढे महाभारत काळात जरासंध हा शक्तिशाली सम्राट होऊन गेला. जरासंध हा एका युद्धात मारला गेला. त्यानंतर पुलिक वंश मगधवर सत्तेवर आला.


२) हर्षक वंश:

पुलिक वंशाचा राजा बालक हा दुबळा असल्याने त्याची हत्या भहिय या त्याच्या महत्त्वाकांक्षी सम्राटाने केली व आपला पुत्र बिंबिसार याला मगधच्या गादीवर बसवले.


राजा बिंबिसार (इ. स. पू. ५४३ ते ४९१) : 

राजा बिंबिसारच्या वडिलांचे नाव विविध ग्रंथांत वेगवेगळे दिले आहे. पुराणात त्याच्या वडिलांचे नाव हेमजित क्षेत्रोज होते असे पुराणात म्हटले आहे तर तिबेटी ग्रंथात 'महापद्म' असे नाव दिले आहे. 

बिंबिसार हा हर्षक वंशातील पहिला शक्तिशाली सम्राट होता. 

तो हर्षक वंशातील होता की शिशुनाग वंशातील होता हा इतिहासकारांतील वाद आहे. परंतु तो शिशुनाग वंशापूर्वीच होऊन गेल्यामुळे तो हर्षक वंशातील होता असे समजले जाते.


१) बिंबीसारचे वैवाहिक संबंध : 

बिंबीसारने कोसल, वैशाली, भद्र वगैरे देशांच्या राजकन्यांशी विवाह करून त्या सत्तांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले.

 'महावंश' या बौद्ध ग्रंथात त्याने ५०० विवाह केले अशी नोंद आहे. अर्थात, त्यात अतिशयोक्ती आहे. 

तरीही अनेक राजकुमारीशी विवाह करून साम्राज्यविस्तार करणे हे त्याच्या परराष्ट्र धोरणाचे सूत्र असावे. 

कोसलची कोसलदेवी, लिच्छवीची चेलना, मद्रदेशाची क्षेमा या राजकन्यांशी त्याचे झालेले विवाह विशेष महत्त्वाचे होते.

 कोसलचा राजा प्रसेनजित याने आपली बहीण कोसलदेवी हिला खर्चासाठी म्हणून काशी नगराचे उत्पन्न बिंबिसारला दिले होते. विदेहच्या राजकन्येशीही त्याचा विवाह झाला होता.


२) अंग राज्यावर ताबा: 

बिंबिसारने 'अंग' या राज्याचा राजा ब्रह्मदत्तचा पराभव करून अंग साम्राज्याचा काही भाग व अंगची राजधानी, हे शहर जिंकले व मगध साम्राज्यात समाविष्ट केले.

 चंपा हे त्या काळातील अत्यंत प्रसिद्ध व्यापारी केंद्र होते. अंग राज्याची प्राप्ती व काशीची प्राप्ती यामुळे मगधच्या संपूर्ण भारतावरील वर्चस्वाचा पाया घातला गेला असे मत डॉ. आर. के. मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.


३) बिंबिसार - जैन व बौद्ध धर्म: 

जैन व बौद्ध धर्माच्या साहित्यानुसार तो दोन्ही धर्माचा पुरस्कर्ता होता असे दिसते.

 उत्तराध्ययनसूत्रात बिंबिसार व महावीर वर्धमान या दोघांच्या भेटीचा उल्लेख केलेला आहे. बिंबीसारची एक पत्नी चेलना ही जैन धर्मअनुयायी होती व तिच्याच प्रभावामुळे तो जैन धर्माकडे आकर्षिला गेला. 

त्याने आपली पत्नी चेलनाबरोबर महावीराची पूजा केली व जैन धर्म स्वीकारला, अशी नोंद तत्कालीन जैन ग्रंथात आहे.

बौद्ध साहित्यात बिंबीसार हा बौद्ध होता असे म्हटले आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धाशी त्याचे स्नेहाचे संबंध होते. 

भगवान बुद्धाच्या मधुर वाणीचा व संन्याशी जीवनाचा प्रभाव बिंबिसारवर पडला होता. 

बुद्धाच्या निर्वाणप्राप्तीच्या अगोदर ८ वर्षे व निर्वाणप्राप्तीनंतर पुन्हा दोघांची भेट झाल्याची नोंद तत्कालीन बौद्ध साहित्यात आहे. 

बिंबिसारने बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याने आपला वैद्यक जीवक यास गौतम बुद्धाच्या वैद्यकीय चिकित्सेसाठी पाठवले होते. 

बिंबिसारने सर्व बौद्ध भिक्षूंना मगधच्या राज्यात गंगा पार करण्यासाठीचा कर (नौकाचालकाचे पैसे) माफ केला होता.

 बौद्ध धर्माचे उत्सव त्याने साजरे केले. रोगग्रस्त लोकांना भिक्षू होण्यास त्याने मज्जाव केला होता. 

बुद्धाच्या पायाच्या नखाच्या तुकड्यावर त्याने एक स्तूप बनवला होता. 

त्या स्तुपाची पूजा राजघराण्यांतील स्त्रिया करीत असत. बुद्ध जिवंत असतानाच बिंबिसारने बौद्ध धर्मप्रसारास चांगलीच मदत केली होती. 


४) बिंबिसारची प्रशासनव्यवस्था :

मगध राज्याला बिंबिसारने शक्तिशाली केले. बिंबिसारच्या काळात मगध साम्राज्यात ८०,००० गावे होती. 

बिंबिसारने आपल्या राज्याचे प्रांतात विभाजन करून प्रत्येक विभागाचा कारभार हा राजपुत्रांकडे सोपवला होता.

 राज्यकारभाराच्या सोयीसाठी विविध खाती होती. प्रत्येक खात्यावर स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जात.

 गावाचा कारभार हा ग्रामसमितीमार्फत चाले. न्यायादानासाठी स्वतंत्र न्यायादानाची व्यवस्था केली होती. गुन्हेगारास कठोर शासन केले जाई. अवयव विच्छेदन, जाहीर फटके मारणे, दंड, तुरुंगवास वगैरे स्वरूपाच्या शिक्षा दिल्या जात. 

बिंबीसारचा सर्व अधिकाऱ्यांवर वचक होता. सभाजक, व्यावहारिक आणि सेनानायक हे तीन प्रमुख अधिकारी होते.

 बिंबिसारने 'गिरीव्रज' हे नैसर्गिकृष्ट्या सुरक्षित स्थळ निवडून त्यास राजधानीचा दर्जा दिला. पण हे स्थळ गैरसोयीचे वाटल्यामुळे त्याने राजगृह येथे राजधानी हलविली. गौतम बुद्धाने नंतर राजगृहाला भेट दिली होती.


५) बिंबिसारचा अस्त : 

बिंबिसारचा अस्त किंवा मृत्यू याबद्दल निश्चित पुरावा उपलब्ध नाही. 

इ. स. पू. ४९३ मध्ये बिंबीसारचा पुत्र अजातशत्रू याने त्यास ठार केले असे बौद्ध मत आहे तर पुत्रांनी कैदत टाकल्याने जीवन असह्य झाल्याने त्याने आत्महत्या केली असे जैन मत आहे. 

बिंबिसारने ५० वर्षे राज्य केले होते. त्याच्या वृद्धापकाळात त्याच्या पुत्रात गादीसाठी वारसायुद्धे सुरू झाली. 

प्रत्येकाला त्यांच्या आजोळचा (कोसल, वैशाली, मद्र) पाठिंबा होता. 

त्या सर्व राजपुत्रांत अजातशत्रू हा पराक्रमी असल्याने तो वारसायुद्धात विजयी झाला.

जनपद व महाजनपदे भाग 4

 जनपद व महाजनपदे 

भाग 4

पोस्तसंभार : DR Sitaram Ingole 



'जनपद' व 'महाजनपद' असा उल्लेख तत्कालीन साहित्यात येतो. अनेक गावे व शहरे मिळून जनपद तयार होई. 

अनेक लहान लहान जनपदे मोठ्या जनपदांत विलीन होत असत. 

मोठ्या 'जनपदाला'च 'महाजनपद' असे म्हणत असत, जैन भगवती सूत्रात १६ महाजनपदांची नावे आहेत तर 'महागोविंद सूत्र' या ग्रंथात ७ महाजनपदांच्या राजधानीचे संदर्भ आहेत. 

'अंगुत्तरनिकाय' या बौद्ध ग्रंथात १६ महाजनपदांची माहिती आहे. या १६ महाजनपदांच्या भौगोलिक सीमा, राजांची नावे इ. त्यांच्यातील सत्तास्पर्धा व संबंध आदींबाबतचा इतिहास जुळवण्याचे काम इतिहासकारांनी केलेले आहे. 

१६ महाजनपदांचा अभ्यास खालीलप्रमाणे करता येईल. 


११) पांचाल : 


आजच्या रोहिलखंडात हे महाजनपद होते. त्याचे उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल असे दोन भाग होते व त्याच्या अनुक्रमे 'अहिछत्रा' व 'काम्पिल्या' या दोन राजधाल्या होत्या, उत्तर व दक्षिण पांचाल यांच्यातही सत्तेसाठी संघर्ष होता. 

उत्तर पांचाल व कुरू यांच्यातही वर्चस्वाचा लढा चालू होता. महाभारतातील अर्जुनाची पत्नी द्रौपदीचा "पांचाली' असा उल्लेख आहे. बौद्ध कालखंडात मात्र पांचाल हे प्रभावशून्य राज्य बनले होते.


१२) अश्मक:


अवंतीच्या दक्षिणेला व गोदावरी नदीच्या खोऱ्यात नांदेड व आंध्र प्रदेशातील निझामाबाद जिल्हा या प्रदेशात हे जनपद होते. 

 अश्मकांचा उल्लेख पाणिनीने केला. त्यांची राजधानी 'पोतन' महणजे निझामाबाद जिल्ह्यातील बोधन होय असे मत डॉ. बी. सी. लॉ यांनी व्यक्त केले आहे. 

महाभारतातील उल्लेखानुस्सर राजर्षी अश्मकने पोतनानगरीची स्थापना केली. 

महाभारतात तसेच बौद्ध व जैन वाङ्मयात अश्मकांचा 'अस्सक' असा उल्लेख आहे.


१३) गांधार:


आधुनिक काश्मीर व तक्षशिलेच्या परिसरात गांधाराचे राज्य होते. गांधारची राजधानी तक्षशिला होती. 

तक्षशिला हे व्यापारी केंद्र व विद्येचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. प्रारंभीच्या काळात तक्षशिला हे वैदिक विद्येचे केंद्र होते तर कालांतराने बौद्ध विद्येचे केंद्र असा तक्षशिलेचा लौकिक होता. 

डॉ. रायचौधरी यांच्या मते, गांधारचे राजे धार्मिकदृष्टया उदारमतवादी होते. कारण जैन साहित्यात गांधारचे राजे जैन धर्माचे अनुयायी आहेत असे म्हटले होते. 

ब्राह्मण साहित्यात ते ब्राह्मण धर्माचे अनुयायी आहेत असा त्यांचा उल्लेख आहे. तक्षशिला येथील उत्खननात बौद्ध अवशेष सापडले आहेत. 

इ. स. पू. ६ व्या शतकात पुष्कर सारिन हा राजा तेथे राज्य करीत होता. त्याने मगधचा राजा बिंबीसार याच्या दरबारी आपला वकील पाठवला होता.


१४) शूरसेन :


 मत्स्यालगतच शूरसेन सेनी याचे राज्य होते. मथुरा हि राज्याची राजधानी होती. 

वैदिक साहित्यात शूरसेन किंवा मथुरेचा उल्लेख सापडत नाही, परंतु महाभारत व पुराणग्रंथात मात्र या महाजनपदांचे उल्लेख सापडतात.


१५) कंबोज:

 आधुनिक पाकिस्तान व गुजरातचा काही प्रदेश यात कंबोजचे राज्य होते. द्वारका ही कंबोजची राजधानी होती. 

वैदिक काळात कंबोज हे वैदिक शिक्षणाचे केंद्र होते. कंबोज हे व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. 

ह्युएनत्संगच्या प्रवासवर्णनात कंबोजचा उल्लेख आला आहे.

 महाजनपदाच्या सत्तासंघर्षात कंबोज फारसे सक्रिय नव्हते. इतर राज्यांप्रमाणे हे राज्यही मगधच्या अधिपत्याखाली गेले असावे.


१६) मगध : 

आधुनिक बिहारमधील पाटणा व गया परिसरात हे गणराज्य उदयास आले. 

वैदिक आर्याच्या काळात मगध प्रदेश वैदिक संस्कृतीच्या बाहेर होता. 

सोळा महाजनपदांत श्रेष्ठत्वाचा जो लढा झाला त्यात मगध विजयी झाले. मगधचे श्रेष्ठत्व व सार्वभौमत्व सर्व छोट्या-मोठ्या संतांनी मान्य केले होते. 

भारताच्या राजकीय इतिहासातील पहिले प्रबळ साम्राज्य म्हणून मगध पुढे आले. 

पुराणग्रंथ, जैन व बौद्ध ग्रंथातून मगध महाजनपदांचा इतिहास व मगधवर राज्य केलेल्या राजवंशांच्या वंशावळी दिल्या आहेत.

 जैन ग्रंथात मगधला पवित्र जनपद मानले आहे. मगधामध्ये जैन ज्ञान व जैनाचार यांचे रक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असे महावीर वर्धमानने म्हटले होते. 

मगधवर नंद वंशाचे राज्य येण्यापर्वी ८ राजवंश सत्तेवर आले होते असे पुराणात म्हटले आहे. 

त्यापैकी इतिहासाला ज्ञात वंश खालीलप्रमाणे आहेत.

१) ब्रहद्रथ वंश

२) हर्षक वंश

३) शिशुनाग वंश (इ. स. पू. ५४३ ते ४२३

४) नंद वंश ( इ. स. पू. ४२३ ते ३२३

५) मौर्य वंश (इ. स. पू. ३२३ ते इ. स. पू. १८७).).).श.श.

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...