Monday, 18 April 2022

अश्मयुग भाग ४ आंतराश्मयुग

 

अश्मयुग

भाग ४ 

पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886




आंतराश्मयुग : ह्याचा पंधरा हजार वर्षांपूर्वी आरंभ होऊन दहा हजार वर्षांपूर्वी त्याचे पूर्ण प्रगल्भावस्थेत रूपांतर झाले. तथापि त्याचे अस्तित्व अत्यंत मर्यादित होते. चौथ्या हिमयुगाच्या तिसऱ्या प्रसरणाच्या काळात ह्यास सुरुवात झाली. थंड हवेऐवजी पर्जन्यमानात हळूहळू वृद्धी होऊ लागली व त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ झाली आणि जीवसृष्टी सध्यासारखी निर्माण झाली. क्रोमॅग्‍नन मानवाच्या वंशाचा सर्वत्र प्रसार झाला. त्याविषयीचा पुरावा यूरोप व पश्चिम आशिया या भागांत प्रामुख्याने आढळतो. इतर खंडांतील या विशिष्ट सांस्कृतिक स्तबकाचे स्वरूप व विस्तार यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. अझिलियन, टार्डेनोइशिअन, ॲस्टुरियन, एर्टेबोल, पॅलेस्टाइन (यूरोप) नाटुफियन (उत्तर ईजिप्त) हे प्रमुख समाजगट येथे होत. मुख्यत: हे उघड्यावर वा तळ्यांच्या काठी कातडी तंबूंतून निवास करीत. मात्र त्यांपैकी काही गुहांतही राहत असावेत. काही भागांत जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून त्यांचा त्यांनी राहण्यासाठी उपयोग केला होता. ‘सूक्ष्मपाषण’ नावाने ओळखली जाणारी गारगोटीच्या दगडाची त्रिकोण, चंद्रकोर इ. विविध आकारांची पाती वापरून ते संयुक्त हत्यारे बनवीत. मांस व आपोआप उगवणाऱ्या धान्याचेही ते भक्षण करीत. ह्या काळात प्राणी माणसाळविण्यास आरंभ झाला असावा.

नवाश्मयुग : ह्या काळास इ.स.पू. आठ हजारांच्या पुढे आरंभ झाला. इ.स.पू. पाच हजारांच्या आसपास त्याची विशेष प्रगती झाली. त्या वेळी हवामान, प्राणी व वनस्पतिसृष्टी सध्यासारखीच होती. मानववंशही बहुधा आज असणारेच होते. बारीक दगडी पात्यांची उपकरणे, घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या यांची निर्मिती व वापर ह्या काळात होऊ लागला. चीन व आग्नेय आशिया या भागांतील हत्यारांचे आकार भिन्न आहेत. या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीही अनेक दृष्ट्या पश्चिमेकडील तत्कालीन संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. या वेळी गाय, बैल, डुक्कर, मेंढी व शेवटी शेवटी घोडा हे प्राणी माणसाळले होते. पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय सुरू झाला होता. याबरोबरच धान्य पिकविण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. या व्यवसायाचा आरंभ पॅलेस्टाइनमध्ये झाला असावा. कारण आतापर्यंत हाती आलेले याबाबतचे सर्वांत प्राचीन नवाश्मयुगीन अवशेष या भागातीलच आहेत. मानवास शेतीसाठी बराच काळपर्यंत एकाच ठिकाणी राहण्याची जरूर भासू लागली आणि त्यामुळे उपजीविकेला एक प्रकारची शाश्वती आली. म्हणून स्थिर स्वरूपाच्या वसाहतींना प्रारंभ होऊन पहिली खेडी निर्माण झाली. गवत, लाकूड, कच्च्या विटा, दगड यांनी ही घरे बांधलेली असत. काही भागांत (पूर्व आशिया) भूमिगत घरांचाही वापर होता. शेकडो वर्षांच्या वाटचालीतून ह्या स्थिरपद जीवनाचा लाभ झाला. त्या पायावरच नागरी संस्कृतीची कालांतराने उभारणी झाली. धातूंचा शोध लागल्यावर वरील प्रक्रियेला गती मिळाली आणि अश्मयुगाचा अस्तही होऊ लागला. अश्मयुगाचा अस्त प्रथम इ.स.पू. ३०००च्या सुमारास मेसोपोटेमिया व ईजिप्त या ठिकाणी झाला.

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...