Monday, 18 April 2022

अश्मयुग भाग १० उपकरणे, भांडे इ.

 

अश्मयुग

भाग १०

पोस्तसांभार :: लक्ष्मण काटेकर @ 7588020886

उपकरणे, भांडे इ.





: पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील अत्यंत अस्थिर आणि भटके जीवन लक्षात घेता, मानवाला काही साठवणाची गरज भासली असेल, असे वाटत नाही. साठवून ठेवण्यासाठी वेळ अथवा निकड त्याला भासावी असे पदार्थही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हते. उत्तरपुराणाश्मकालीन गुंफांतील चित्रकारांनी वापरलेले दगडी दिवे सोडले, तर अन्य कसलेही भांडे ज्ञात नाही. पुढे नवाश्मयुगाच्या पूर्वार्धात जेरिको, जार्मो येथील माणूसही फक्त दगडीच भांडी वापरीत होता. यांत कटोरे, पेले असे काही प्रकार आढळतात. दगडी भांड्यांच्या घडणीत व सजावटीत थोडा फरक स्थलकालपरत्वे आढळतो. उदा., सायप्रसमधील खिरोकिटिया येथील भांडी घासून घासून झिलईदार करण्यात येत. परंतु त्यांच्या आकारात फारसे वैविध्य नाही. दगडाप्रमाणेच लाकडी ठोकळे कोरून त्यापासून भांडी तयार करण्यात येत असतीलही, परंतु त्यांचे आज अवशेष नाहीत.

नवाश्युगाच्या पूर्वार्धापर्यंत मृत्पात्रे करण्याची विद्या मानवाला हस्तगत झालेली नव्हती. नवाश्मयुगाच्या मध्यापासून अशी भांडी बनविण्याला आरंभ झाला. निदान पश्चिम आशिया व भूमध्य समुद्राभोवतालचा प्रदेश यांपुरते तरी हे विधान निश्चित पुराव्यांवर आधारलेले आहे. मृत्पात्रे तयार करण्याची विद्या केवळ याच लोकांना साध्य झाली, असे समजण्याचे कारण नाही. तिचा उगम निरनिराळ्या ठिकाणी स्वतंत्रपणेही झाला असेल. तद्वतच ती याआधीही कोणा समाजाला साध्य झाली असेल. पण प्रत्यक्ष आधाराने सांगता येते, ते फक्त पश्चिम आशियाविषयी. या कलेचा उगम कसा झाला याविषयी जी अनेक मते प्रचलित आहेत, त्यांत जास्त ग्राह्य अनुमान असे, की आधीपासून वापरात असणाऱ्या बांबूच्या टोपल्यांना माती लिंपण्यास आरंभ झाला. एखादी अशी टोपली केवळ योगायोगाने जळाली असावी व लिंपलेल्या मातीचे झालेले तुकडे हाती लागले. अशा अपघातातून मातीच्या दोन गुणांचा शोध लागला. ते म्हणजे–मनाजोगता आकार देता येणे व

भाजूण काढले तर तो आकार पक्का होणे. याच माहितीचा उपयोग करून मृत्पात्रे करण्यास आरंभ झाला. भांडी करताना, त्यांना आधीपासून दगडी-लाकडी भांड्यांना देण्यात येणारे वाडगे, कुंडे यांसारखे आकार तर दिलेच पण ठेवरेवीला, विशेषत: पाणी व तत्सम द्रवपदार्थ यांच्या ने-आणीला, जास्त उपयुक्त अशी लहान तोंडाची भांडीही तयार करण्यात येऊ लागली. भोपळा, नारळ अशांसारख्या फळांवरून हे आकार सुचले असावेत. कदाचित या फळांच्या कवचांचा असा उपयोग यापूर्वीही केला जात असावा. लवकरच या भांड्यांना रंग लावून व त्यांवर नक्षी उमटवून ती सुशोभित करण्यासही सुरुवात झाली असावी. यापुढे निरनिराळे आकार, भांडी घडविण्याच्या पद्धती यांचे शोध लागत गेले. चाकाचा शोध लागला अधिक प्रमाणबद्ध व डौलदार भांडी तयार होऊ लागली. भांडी भाजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्याही वापरात आल्या. परंतु हा सर्व पसारा नवाश्मयुग व ⇨ताम्रपाषाणयुग यांच्या संधिकालातीलच आहे.

बांबू, लव्हाळे व वेत एकत्र गुंफून, मासे पकडण्यासाठी खूप मोठाल्या टोपल्या आंतराश्मयुगीन यूरोपात (डेन्मार्क – एर्टेबोल संस्कृती) वापरीत. याच्या पुढची पायरी म्हणजे चटया विणणे आणि शेवटी घरगुती उपयोगाच्या लहानमोठ्या टोपल्या, दुरड्या विणणे ही होय. पॅलेस्टाइनमधील जेरिको व जार्मो आणि ईजिप्तमधील फायूम यांसारख्या ठिकाणच्या नवाश्मयुगीन थरांत मातीवर उमटलेल्या ठशांच्या स्वरूपात टोपल्या व दुरड्या यांचे अवशेष पाहावयास सापडतात. यांग-शो या चिनी नवाश्मयुगीन समाजास बुरूडकाम अवगत होते. अमेरिकेतील बुरूडकामाचा पुरावा साधारण पॅलेस्टाइनइतकाच इ.स.पू. सातव्या सहस्रकातील असून दक्षिण अमेरिकेतील बुरूडकाम अत्युकृष्ट दर्जाचे समजले जाते.

No comments:

Post a Comment

हिराबाई पेडणेकर:

  हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली "पुरुषानेही स्त्रीवर...