Location: Banashankari Temple Amargol
कर्नाटकातील देवलयाबाबत माझा एक अनुभव आहे. अगदी दाट गजबजलेल्या वस्तीत असली तरी ती बऱ्याचदा अतिशय नीटनेटकी राखलेली आढळतात. हे देवालय अर्थात अपवाद नाही..वस्तीतील घरांच्या तुलनेत मजबूत अशा 15 फूट उंचीच्या प्रशस्त चौथऱ्यावर हे देवालय उभे आहे.भर वस्तीत असूनही शांत, निवांत. धारवाड - हुबळी हम रस्त्यापासून अगदी शे दोनशे यार्डवर....
द्विकुट प्रकारचे हे देवालय अकराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात उभारलेले आहे. दोन्ही गर्भगृह एकमेकास काटकोनात असून ती पूर्व आणि दक्षिणमुखी आहेत. प्रत्येकास अंतराळ , अर्धमंडप आहे ,जे पुढे एक महा मंडपात उघडतात.महा मंडपात चार अतिशय सुंदर सालंकृत स्तंभ असून त्यावर अतिशय नाजूक कलाकृती करण्यात आली आहे. याच स्तंभांवर अप्रतिम अशी उग्र नृसिंह , शिव,वराह ,भैरव ,भैरवी ,गणेश ,नटराज , विष्णु , बैताली , आदी शिल्पे कोरलेली आहेत.हीच शिल्पे या देवालयाचे वैशिष्ठ्य आहे.
पूर्वाभिमुख गर्भात नंतर केंव्हातरी स्थित केलेले भैरवी शिल्प असून दक्षिणमुखी गर्भगृहात शिवपिंडी आहे. देवालयाच्या बाहेरील भिंतीवर फारशी शिल्पे नसून कळस एकच आणि खूपच जीर्ण अवस्थेत आहे...
मंदिरातील शिल्पावरून हे देवालय केशव आणि भैरवास समर्पित होते असे आढळते . एकूणच मुख्य रस्त्याच्या जवळ असल्याने आणि अगदी तासाभराचा अवधी असला तरी ते आपणास नीटनेटके पाहता येते.
क्रमशः
सुधीर निगडे
पुणे
१० फेब्रवारी २०२२
No comments:
Post a Comment